शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लेकराप्रमाणे वागवावे : यजुवेंद्र महाजन

रत्नागिरी : ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या लेकराची पदोपदी काळजी घेते, शिकविते अगदी त्याप्रमाणे मास्तरांची अर्थात सर्व शिक्षकांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन यजुवेंद्र महाजन यांनी केले.

येथील शिक्षक आणि सुजाण पालक प्रेरणा कार्यशाळेत ते प्राथमिक शाळेतील शिक्षकांना आणि पालकांना उद्देशून बोलत होते. विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची असते. याच अनुषंगाने रत्नागिरी शहरातील इन्फिगो आय हॉस्पिटलच्या वतीने शिक्षक आणि सुजाण पालक प्रेरणा कार्यशाळा अंबर हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत जिल्हाभरातून प्राथमिक शिक्षक आणि पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, इन्फिगो आय हॉस्पिटलचे डॉ. श्रीधर ठाकूर, तरुण भारत रत्नागिरी आवृत्तीप्रमुख सुकांत चक्रदेव उपस्थित होते.

देशाच्या उभारणीत पुढे युवक बनून योगदान करणाऱ्या लहान मुलांसाठी शिक्षक एक प्रकारे माता आहे. म्हणूनच नेहमी मास्तर शब्दाचा अर्थ मातेच्या स्तरावर जाऊन शिकविणारा असाच सांगितला पाहिजे, असे सांगून श्री. महाजन यांनी आपला चेहरा चांगला ठेवणे, छान बोलणे, जोश, शिक्षणात उत्साह, मुलांमध्ये रुची निर्माण करणे असे पाच मंत्र उपस्थित शिक्षकांना दिले. याशिवाय त्यांनी हसतखेळत विविध छोट्या छोट्या उदाहरणातून आपण मुलांना कशा रीतीने शिकवले पाहिजे, हेदेखील सांगितले. आपल्या भारतीय संस्कृतीत शिकवणेऐवजी शिकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मुलांना शिकवण्याऐवजी त्यांनी शिकणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले की शिक्षण क्षेत्र खूप महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना योग्य वळण देण्याचे काम शिक्षक करत असतात. शिक्षकांचे अनुकरण करून मुले शिकत असतात. डॉ. जाखड म्हणाल्या, विद्यार्थ्यांना शाळेत काय शिकवले जाते, ते पालकांनी वेळोवेळी जाणून घेणे गरजेचे आहे. शाळेत होणाऱ्या पालक सभांना वेळोवेळी पालकांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. त्यातून आपल्या मुलांची प्रगती लक्षात येते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply