रत्नागिरी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने येत्या १७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात ते अकरा या वेळेत रत्नागिरी जिल्ह्यातील ४७ किनाऱ्यांवर एकाच वेळी सफाई मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेत सागर किनारी आणि खाडी किनारी स्वच्छता केली जाणार असून सर्वांनी सहभाग नोंदवून किनारे प्लास्टिक, पॉलिथीन घनकचरा मुक्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले आहे. या स्वच्छता मोहिमेमध्ये सागरी सीमा मंच या स्वयंसेवी संस्थेमार्फत तालुक्यातील प्रत्येक सागरी किनारे स्वच्छ करण्यासाठी त्यांच्या स्वयंसेवकांमार्फत मदत करण्यात येणार आहे.
मंडणगड, दापोली, गुहागर, रत्नागिरी आणि राजापूर या पाच सागरकिनारी तालुक्यांमध्ये राबविण्यात येणार असलेल्या या मोहिमेचा तालुकानिहाय कार्यक्रम असा – मंडणगड – वेसवी, बाणकोट.
दापोली – उंबरशेत, उटंबर, आडे, लखडतर (पंचनदी), लखडतरवाडी, हर्णै-पाज, लाडघर, दाभोळ, बुरोंडी, तरीबंदर (आंजर्ले).
गुहागर – वेळणेश्वर, पालशेत, वेलदूर, असगोली, बुधल, बोऱ्या, कोंडकारूळ, साखरीआगार, हेदवतड, काताळे नवानगर, कुडली.
रत्नागिरी – मांडवी, भाट्ये, काळबादेवी, आरे, गणपतीपुळे, मालगुंड, नांदिवडे, मिऱ्या, पांढरा समुद्र, कसोप, कुर्ली, वायंगणी, रनपार, गणेशगुळे, पूर्णगड, गावखडी, जयगड, कासारवेली, पावस.
राजापूर – आंबोळगड, जैतापूर, वेत्ये, कशेळी, साखरीनाटे.
सागरी किनारे आणि खाडी किनारी स्वच्छता मोहिमेच्या दिवशी राष्ट्रीय शपथ घेऊन मोहीम सुरु करण्यात येणार आहे. या मोहिमेत नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नेहरू युवा केंद्र, महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संघटना, उद्योजक, शैक्षणिक संस्था, पोलीस दल, बचत गट, अंगणवाडी सेविका, ग्रामंपचायतींमधील ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

