तिलारी जलविद्युत प्रकल्प विस्थापितांच्या न्यायासाठी झगडणार : शांताराम नाईक

शांताराम नाईक

दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोवा राज्याच्या सीमेवर वसलेल्या तिलारी जलविद्युत प्रकल्पातील बुडीत क्षेत्र विस्थापितांच्या न्यायासाठी झगडणार असल्याचा निर्धार सामाजिक कार्यकर्ते शांताराम नाईक यांनी केला आहे.

श्री. नाईक तिलारी प्रकल्प विस्थापित मूळ मौजे पाल गावचे रहिवासी असून वसई सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्षही आहेत. गणेशोत्सवानिमित्ताने आपल्या गावी आले असता त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांची माहिती दिली. ते म्हणाले, मी गणेशोत्सवापूर्वी एक बातमी प्रसिद्ध केली होती. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या आजही प्रलंबित असलेल्या मागण्या आणि समस्यांवर सर्वपक्षीय बैठक घेऊन सर्वांनी राजकारणविरहित पद्धतीने शेतकऱ्यांच्या मागे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देऊ या, असे सुचविले होते. त्यावर अनेकांनी माझ्याशी संपर्क साधला. मी मुंबईत राहत असल्याने बैठकीच्या दृष्टीने पाल गावचे सहदेव विश्राम गवस, संजय गवस, आणि धरणग्रस्त बेरोजगार समितीचे माजी अध्यक्ष शशिकांत गवस यांच्याकडे संपर्काची जबाबदारी दिली होती. या सर्वांशी मी बऱ्याच वेळा संपर्क साधून विचारणा केली. सहदेव गवस यांनी सांगितले की, पाल पुनर्वसन, आयनोडे पुनर्वसन आणि पाट्ये पुनवर्सनमधील प्रकल्पबाधित जाणकार, तज्ज्ञ, गाव पुढारी विचारतात की, तुम्ही काय करणार? आम्हाला वेळ नाही आणि रसही नाही. संजय गवस आणि शशिकांत गवस यांनीसुद्धा बऱ्याच जणांना माहिती दिल्याचे सांगितले. मी स्वतः काही वेळा संपर्क केला. पण आधी ठरविल्याप्रमाणे याबाबतची बैठक होऊ शकली नाही.

श्री. नाईक म्हणाले, त्यानंतर गणेशोत्सव पार पडला. गणेशोत्सवात मी गावी असतो. त्याच काळात पहिली सभा व्हावी, असे माझे प्रयत्न होते. पण ते पूर्णत्वास जाऊ शकले नाहीत. मी आता मुंबईत परतलो आहे. पण प्रयत्न सोडणार नाही. शेतकरी, बेरोजगार, भूमीहीन लोकांच्या समस्या मी माझ्या पद्धतीने सरकारपुढे ठेवणार आहे आणि त्यांना न्याय मिळेपर्यंत लढा चालू ठेवणार आहे.

अधिक माहिती देताना श्री. नाईक यांनी सांगितले की, प्रकल्पाकरिता जमिनी दिल्याने विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांना एक एकर, दोन एकर जमिनी मिळाल्या. पण त्या जमिनीत जाण्यासाठी स्थानिक रहिवाशांकडून रस्ता मिळत नाही. त्यामुळे त्या जमिनीचा उपयोग प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना करता येत नाही. सरकारने त्या जमिनीत जाण्यासाठी रस्त्याची सुविधा करून द्यावी, असा अर्ज दोडामार्गचे तहसीलदार, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी, खासदार विनायक राऊत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना पाठविला आहे. शिक्षण मंत्री आणि स्थानिक आमदार दीपक केसरकर, कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनाही त्या अर्जाची प्रत पाठविली आहे. नियमानुसार २१ दिवस वाट पाहिल्यानंतर मी मंत्रालयात जाऊन संबंधित मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहे.

या प्रश्नाबाबत ज्यांना आस्था असेल, त्यांनी साथ देतील, अशी अपेक्षा व्यक्त करून श्री. नाईक यांनी सांगितले की, याशिवाय इतर सार्वजनिक समस्यांचे निवेदनसुद्धा लवकरच सर्व मान्यवरांना पाठविणार आहे. या साऱ्या बाबतीत प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि इतर नागरिकांनी आपल्याला साथ द्यावी, असे आवाहन श्री. नाईक यांनी केले आहे.
(संपर्क क्रमांक : ९१६८०१९१७७)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply