रत्नागिरीतील (कै.) फणसेकर यांच्या नाटकाची दुसरी आवृत्ती ६ डिसेंबरला

रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रथितयश नाट्यकर्मी आणि लेखक (कै.) अविनाश फणसेकर यांच्या भगवान गौतम बुद्ध या नाटकाची दुसरी आवृत्ती ग्रंथालीतर्फे येत्या ६ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.

शिवगंधार आणि ग्रंथाली प्रकाशनातर्फे रत्नागिरीचे दिवंगत नाटककार, दिग्दर्शक अविनाश फणसेकर लिखित ‘भगवान गौतम बुद्ध’ या नाटकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मान्यवर साहित्यिक डॉ. प्रज्ञा दया पवार, डॉ. राजेंद्र गवई आणि सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. नितीश भारद्वाज यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती शिवगंधारच्या योजना शिवानंद यांनी दिली.

हा कार्यक्रम मुंबईत वांद्रे (पश्चिम) येथील ग्रंथाली प्रतिभांगण येथे होणार आहे. यानिमित्ताने ‘भगवान गौतम बुद्ध – स्वरवंदना’ ही गायन मैफिल रंगणार आहे. या मैफिलीची संकल्पना, संहिता, निरूपण, लेखन आणि गायन योजना शिवानंद यांचे आहे. त्यांच्यासोबत कुमारी अनन्या गोखले हिचे गायनही होणार आहे. डॉ. मृण्मयी भजक निवेदन करणार आहेत.

सुमारे ४० वर्षांपूर्वी योजना प्रतिष्ठान निर्मित या नाटकाचा प्रथम प्रयोग नागपूर येथे झाला होता. जगाला अहिंसा आणि शांततेचा महान संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांच्या जीवन तत्त्वज्ञानावरील या नाट्यकृतीला रसिकांनी भरपूर प्रतिसाद दिला. भगवान गौतम बुद्ध या नाटकाच्या पन्नासाव्या प्रयोगाला १९८३ साली योजना प्रकाशनतर्फे या नाटकाचे पुस्तक मुंबईत दादर येथील शिवाजी मंदिरात प्रकाशित झाले होते. अनोख्या विषयावरील हे वेगळे नाटक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथावर आधारित आहे.

योजना प्रतिष्ठाननिर्मित भगवान गौतम बुद्ध या नाटकात प्रसिद्ध गायिका योजना शिवानंद यांनी नायिका यशोधरेची, तर डॉ. नितीश भारद्वाज यांनी या नाटकात नायक सिद्धार्थाची भूमिका केली होती. पुढे दूरदर्शनवरील महाभारत या अफाट गाजलेल्या मालिकेतून त्यांनी भगवान कृष्णाची भूमिका केली. त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. या नाटकाच्या पुस्तकाला प्रतिभावान लेखक प्रल्हाद जाधव यांनी प्रस्तावना लिहिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी भगवान गौतम बुद्ध या नाटकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे, याचा आनंद आहे, असे योजना शिवानंद यांनी सांगितले

योजना शिवानंद यांनी रत्नागिरीतील तीन कलाकारांना हे पुस्तक अर्पण केले आहे. ४० वर्षांपूर्वी अशोकराज भाट्ये, अविनाश फणसेकर आणि अरुणोदय भाटकर हे तिघे मित्र कलाकार त्यावेळी एकत्र आले. त्यांनी योजना प्रतिष्ठानच्या टीमसोबत ही नाट्यकृती घडवली. दुर्दैवाने तिघेही हयात नाहीत. त्यातील अशोकराज भाट्ये हे कवी, लेखक, कीर्तनकार, गझलकार, कथाकथनकार असे हरहुन्नरी कलावंत होते. रत्नागिरीतील खेड्यातून आलेले म्हणजे मुक्काम उमरे, हरचेरी येथून. त्यांनी कलाकामासाठी मुंबई गाठली होती. अविनाश फणसेकर जसे लेखक होते, तसेच ते उत्तम कवी, नट, दिग्दर्शक, रंगकर्मी होते. त्यांच्या अप्रतिम संवादांनी हे नाटक फुलले आहे. तिसरे अरुणोदय भाटकर देखील मूळचे रत्नागिरीचे. अत्यंत बुद्धिमान असलेले भाटकर हे विविध विषयांतील जाणकार संशोधक, अभ्यासक होते. विशेषतः गझल हा त्यांचा आवडता विषय होता. त्यासाठी त्यांनी खूप कार्य केले आहे. ते एसआयडब्ल्यूएस ज्युनिअर कॉलेजमध्ये उपप्राचार्य होते.

सिद्धार्थच्या भूमिकेत डॉ. नितीश भारद्वाज आणि यशोधरेच्या भूमिकेत योजना शिवानंद

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply