रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी ‘२ सिल्व्हर ओक’ पुस्तकाची भेट रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाला दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीच्या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व शरद पवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारे पुस्तक “२, सिल्वर ओक” हे पुस्तक भेट म्हणून दिले. नगर वाचनालय १९५ वर्षांचे महाराष्ट्राततील सर्वांत जुने वाचनालय आहे. अशा वाचनालयात संग्रही असावे, अशी वाटणारी पुस्तके श्री. लिमये वेळोवेळी स्वतः वाचनालयाला भेट स्वरूपात देत असतात. त्यांचे पुस्तकरूपी योगदान वाचनालयासाठी अत्यंत मोलाचे आहे.
शरद पवार यांच्या विविध क्षेत्रातील कर्तृत्वसंपन्न वाटचालीचा आणि योगदानाचा आढावा घेणाऱ्या १०० व्यासंगी लेखांनी साकारलेल्या ‘२, सिल्व्हर ओक’ या मौलिक संदर्भ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत झाला. शरद पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाला फक्त राजकीयच नव्हे तर इतर विविध क्षेत्रांतील योगदानाचेही अनेक पैलू आहेत. हे पैलू उलगडणारे अनेक लेख या पुस्तकात समाविष्ट केले आहे. संरक्षण क्षेत्रात महिलांची नेमणूक, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, नामांतर यासारख्या अनेक निर्णयांची विस्तृत माहिती दिली आहे. राजकारण, औद्योगिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, माध्यमविद्या आदी क्षेत्रातील व्यासंगी व्यक्तिमत्त्वांनी यात आपले लेख लिहून त्यांचे बहुमूल्य कार्य लेखांच्या माध्यमातून मांडले आहे. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. विजय भटकर यांच्या लेखांमधून शरद पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक महत्त्वाचे पैलू समोर येतात.
एकाच महिन्यात या पुस्तकाची सहावी आवृत्ती प्रसिद्ध झाली. असा हा मौलिक ग्रंथ वाचनालयात असावा या उद्देशाने श्री. लिमये यांनी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात स्वतः येऊन वाचनालयाचे अध्यक्ष मा. ॲड. दीपक पटवर्धन यांच्याकडे तो सुपूर्द केला.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

