समजून घ्या मणक्यांचा आजार

सर्वसाधारणत: दर दहा व्यक्तींपैकी आठ व्यक्तींनी आयुष्यात मानदुखी आणि कंबरदुखी कधी ना कधी अनुभवली असते. दैनंदिन जीवनातील बदलती जीवनशैली आणि चुकीच्या पद्धतीने हाताळलेल्या शारीरिक हालचाली ही प्रामुख्याने या व्याधींच्या प्रमाणात वाढ होण्यास कारणीभूत आहे. मात्र सांधेरोपणाप्रमाणे मणक्यांचे रोपण होऊ शकत नाही. म्हणूनच मणक्यांच्या आजारावरील उपाययोजना समजून घेणे गरजेचे आहे.
………..

मानवी पाठीचा कणा म्हणजे मणके आणि दोन मणक्यांमधील गादी अशा पद्धतीने एक मालिका असते. एकूण ३३ मणक्यांनी ही मालिका बनलेली असते. त्यात मानेचे ७ मणके (सर्व्हायकल), पाठीचे १२ मणके (थोरॅसिक), ५ कंबरेचे (लंबार), ५ जोडलेले सेक्रम आणि ४ जोडलेले मणके (कॉसीक्स) असे असतात. हे मणके एकत्र जोडले जाऊन एक पोकळी निर्माण होते. त्यातून नसांचा जुडगा बंडल डोक्यापासून कंबरेपर्यंत जातो. त्याला मज्जारज्जू संस्था अर्थातच स्पायनल कॉर्ड म्हणतात. दोन मणक्यांच्या मधून असलेल्या पोकळीतून क्रमश: डावी आणि उजवी नस निघते. या नसा स्नायूंना ताकद आणि त्वचेला संवेदना देतात. ज्यावेळी या नसांवर ताण येतो, त्यावेळी वेदना होतात.

ज्या ठिकाणी या नसांवर दबाव येतो जसे मानेतील मणक्यांजवळ अथवा कंबरेच्या मणक्यांजवळ त्याप्रमाणे क्रमश: वेदना होतात. तळहातात तसंच पायात, पोटरीत आणि तळपायापर्यंत वेदना होतात. त्याचप्रमाणे हातापायाला येणाऱ्या मुंग्या यामुळेच जाणवतात. अतीव दाबामुळे क्वचित रुग्णांना स्नायूंची ताकद कमी झाल्याचे जाणवते. मणक्यांना आधार देण्यासाठी आणि सुयोग्य हालचालींसाठी ही मणक्यांची रचना लिगामेंटस आणि स्नायूंनी सक्षम असते.
९० टक्के मानदुखी आणि कंबरदुखी ही यांत्रिक स्वरूपाची अर्थातच मेकॅनिकल असते.

मानदुखी आणि कंबरदुखीचे प्रमुख कारण म्हणजे उठण्याच्या आणि बसण्याच्या चुकीच्या पद्धती जसे की,
१) खूप वेळ बसणे, २) जास्त वेळ वाकून काम करणे, ३) पुन्हा पुन्हा वाकावे लागणे, ४) जड वस्तू उचलणे, ५) चुकीचा ताण पडेल अशा स्थितीत झोपणे.

सर्वसाधारण गैरसमज
१) मी दररोज व्यायाम किंवा योगासने करतो/करते. त्यामुळे मला मानदुखी किंवा कंबरदुखी होऊ शकत नाही.
२) जर मला तरुणपणी मणक्यांचा त्रास सुरू झाला, तर तो जसे वय वाढणार तसतसा वाढतच जाणार आहे.
३) मणक्यांच्या समस्यांचे निदान करण्यासाठी एमआरआय आणि इतर चाचण्यांची गरज असतेच.
४) मानदुखी आणि कंबरदुखी घालवण्यासाठी बेडरेस्ट हा एकमेव योग्य उपाय आहे.
५) मानेचा पट्टा आणि कंबरेचा पट्टा वापरलाच पाहिजे.
६) खूप काळापासून दुखणे असेल, तर सर्जरी हाच एकमेव पर्याय आहे.

अशा प्रकारचे समज आणि गैरसमज पसरलेले असतात. त्यामुळे योग्य उपचारपद्धती मिळण्यास विलंब होतो आणि अर्थातच तेवढाच जास्त काळ रिकव्हरीला लागतो. तसेच यामुळे निष्क्रियता वाढते. दैनंदिन जीवनातील कार्यशील जीवनशैली मंदावते. त्यामुळे नैराश्य, चिडचीड होणे, कोणावर तरी आपण निर्भर असल्याची भावना, न्यूनगंड निर्माण होणे, सामाजिक कार्यात सहज सहभागी होण्यास स्वारस्य न राहणे असे प्रकार घडतात. थोडक्यात काय, तर या वेदना रुग्णाचे दैनंदिन जीवन विस्कळित करतात.

उपचार पद्धती
योग्य तो उपचार आणि मार्गदर्शन यातून अशा प्रकारची कंबरदुखी आणि मानदुखीवर सहज मात करता येऊ शकते. केवळ उद्भवणाऱ्या लक्षणांना बरे करणे हा तज्ज्ञ स्पाइन सर्जनचा मुख्य उद्देश नसून मुळापासून त्याचे कारण शोधून त्यावर योग्य उपचार करणे हाच असतो किंवा असावा लागतो. तज्ज्ञ स्पाइन सर्जनद्वारे एकदा पूर्ण तपासणी झाल्यानंतर रुग्णांना योग्य ती उपचार पद्धती सुचवली जाते. त्यात मुख्यत: रुग्णांच्या त्रासाचे योग्य निदान करून त्याप्रमाणे व्यायाम सुचवले जातात. त्याचबरोबर रुग्णांना योग्य पद्धतीने उठणे, बसणे याविषयी मार्गदर्शन केले जाते. तसेच व्यावसायिक कामाच्या पद्धतीत त्यानुसार करावे लागणारे सुयोग्य बदल सुचविले जातात.

महत्त्वाचे म्हणजे ८० ते ९० टक्के मणक्यांच्या सर्जरी टाळणेदेखील शक्य आहे.

अर्थातच त्यासाठी रुग्णांनी काही बाबींकडे लक्ष दिले पाहिजे. रुग्णांना वेदनामुक्तीसाठी महत्त्वाची टीप म्हणजे होणाऱ्या वेदना दोन दिवसांपेक्षा अधिक काळ असतील, तर त्वरित योग्य मार्गदर्शन घ्यावे. तज्ज्ञ ऑर्थोपेडिक (स्पाइन स्पेशालिस्ट) आणि तज्ज्ञ फिजिओथेअरपिस्ट (स्पाइन स्पेशालिस्ट) यांच्या एकत्रित मार्गदर्शनाने आणि उपचाराद्वारे वेदनामुक्ती सहज शक्य आहे. आपल्या मणक्यांचे आरोग्य आपल्या हातात, हे लक्षात ठेवावे.

  • डॉ. नोमान अत्तार
    (ऑर्थोपेडिक अँड स्पाइन सर्जन)
    MBBS, MS ( Orthopaedic), FISS, FESS, FMISS (Mumbai)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply