चिंदर गावची गावपळण सुरू : एक अनोखी परंपरा

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील चिंदर (ता. मालवण) येथील गावपळण आज, १८ नोव्हेंबर रोजी सुरू झाली. तीन दिवस चालणारी एक अनोखी परंपरा आहे.
…………

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चिंदर, आचरे आणि वायंगणी या गावांमध्ये “गावपळण” ही परंपरा पिढ्यान् पिढ्या चालू आहे. गावपळण म्हणजे गावातील देवतेच्या हुकमाने गावातील सर्वधर्मीय, सर्व समाजबांधव आपल्या कुटुंबकबिल्यासह पाळीव प्राणी, जनावांना घेऊन गावाच्या वेशीबाहेर तीन दिवस-तीन रात्री थांबतात. गावात कोणीही वस्ती करत नाही.

अशी ही अनोखी परंपरा असलेली चिंदर गावची गावपळण सुरू झाली. गेल्या ८ नोव्हेंबर २०२२ रोजी चिंदर गावातील श्री देव रवळनाथ मंदिरात बारा/पाच मानकरी आणि ग्रामस्थ एकत्र जमून त्यांनी देवतेला यावर्षी गावपळण करावी का, याबाबत कौल (प्रसाद) लावला. देवतेने त्यासंदर्भात हुकूम दिल्यानंतर ग्रामपुरोहितांकडे जाऊन पंचांग पाहून त्यांनी दिलेल्या मुहूर्तावर म्हणजेच १८ नोव्हेंबरपासून पुढे तीन दिवस, तीन रात्री गावपळण पाळण्याचे ठरले. त्यानुसार गावातील सर्व लोक गाव, घरदार सोडून गुरेवासरे, पाळीव प्राणी,कोंबडी, कुत्री, मांजरे यांच्यासह वेशीबाहेर निघाले. आता या सर्व सगळ्यांना अंधश्रद्धा वाटतील, परंतु या अंधश्रद्धा नसून कोकणी लोकांचा तो सुज्ञपणाच म्हणावा लागेल. विज्ञानाशी सांगड घालत या परंपरेकडे पाहताना असे दिसते की, आपली भारतीय संस्कृती निसर्गाशी एकरूप झालेली आहे. त्यामुळे त्याकाळी विज्ञान-तंत्रज्ञान या गोष्टी सर्वसामान्य लोकांना समजण्यापलीकडे असल्याने प्रत्येक गोष्टीत देव-धर्म आणला गेला. त्यामुळे प्रत्येक भारतीय मनुष्य त्याचे नक्कीच अनुकरण करेल आणि करतोच. त्यामुळे भूत-पिशाच्च यांच्यासाठी तीन दिवस गाव सोडून बाहेर जावे, त्यासाठी देवाचा हुकूम घ्यावा, अशी परंपरा पडली असावी.

गावपळणीमागे जुनी जाणकार मंडळी अशी कथा सांगतात की, चिंदर गावात पूर्वी एक म्हातारी तिच्या घरात राहत होती. बाकी संपूर्ण गाव ओसाड होते. कुठेही मनुष्यवस्ती नसलेले ते गाव होते. गावात एक वराह (डुक्कर) माजला होता. एके दिवशी मामा आणि त्याचा भाचा फिरत असताना जंगलात दूरवर त्यांना एक दिवा मिणमिणताना दिसला. तेव्हा ते दोघे तिथे गेले. तेथे असलेल्या त्या म्हातारीने त्यांचे आदरातिथ्य केले. या गावात एक वराह (डुक्कर) माजला असून तो खूप त्रास देतो, असे त्यांना सांगितले. त्यावर त्या दोघांनी त्या डुकराचा कायमचा बंदोबस्त केला. तेव्हापासून त्यांनी या गावात वस्ती केली आणि हा गाव वसवला म्हणून चिंदर गावाला ‘मामा-भाच्यांचा गाव’ असेही म्हणतात. त्यानंतर भूतपिशाच्च गावातील देवतेला शरण गेली आणि आता आम्ही बाहेरच्या गावात वस्ती करतो, परंतु तुझ्याकडे आम्हाला वस्ती करायची संधी कशी मिळेल, असे त्यांनी विचारले. तेव्हा तीन वर्षांनंतर या गावातील सर्व लोक पाळीव प्राणी, जनावरांसह गाव सोडून वेशीबाहेर जाऊन संसार थाटतील. त्यावेळी तुम्ही गावात संचार करावा, असे ग्रामदेवतेने सांगितले. तेव्हापासून गावपळणीची ही परंपरा सुरू झाली.

या परंपरेनुसार आज, १८ नोव्हेंबर रोजी दुपारी श्रीदेव रवळनाथ मंदिरात सर्व मानकरी, ग्रामस्थ जमले. देवतरंग यांचे अवसारी घडीवर (घोंगडीची बैठक) बसून त्यांना धूप दाखविण्यात आला. त्यांच्या अंगात संचार झाल्यानंतर त्यांनी देवस्वरूपात बोलून सर्व ग्रामस्थ मानकरी यांना आश्वस्त केले. जसे तुम्ही सर्व लोक गावाच्या बाहेर जाल, तसेच सर्वांना सुखरूप मी गावात पुन्हा घेऊन येईन. या काळात गावातील प्रत्येक घराचे रक्षण मी करेन, असा आशीर्वाद मिळाला. त्यानंतर ढोल वाजवून सर्वांना गाव सोडण्याचा इशारा देण्यात आला. तसे प्रत्येक जण आपले साहित्य, गुरे-जनावरे, पाळीव प्राणी घेऊन घराला कुलूप लावून दरवाजावर माडाचे सावळ (सापळा) आणि काटेरी शिरड (काटेरी झाडाची फांदी) लावून गाव सोडून गावाबाहेर निघू लागले.

आजवर इतक्या वर्षांची परंपरा असलेल्या या गावपळण काळात गावात एकही चोरी झालेली नाही. कारण तशी कोणाची हिंमत होत नाही. सर्व सरकारी कार्यालये मात्र चालू राहतात. त्याला कोणी बाधा आणत नाही. पोलीस आपली ड्युटी बजावताना गावात फेरफटका मारत लक्ष ठेवून असतात. गाव निर्मनुष्य असल्यामुळे थोडे भीतीचे वातावरण तयार झालेले असते. या गावपळण उत्सवामध्ये सर्व समाजबांधव, सर्वधर्मीय सहभागी होतात. गाव सोडून जाण्याची कोणावरही सक्ती केली जात नाही. प्रत्येक जण उत्स्फूर्तपणे यात सहभागी होतो, हे विशेष आहे.

या ‘गावपळणीनंतर’ चिंदर गावात अजून एक वेगळी परंपरा आहे, ती म्हणजे गावपळणीचे तीन दिवस आणि तीन रात्री पूर्ण झाल्यावर बारा/पाच मानकरी आणि ठरावीक ग्रामस्थ श्री रवळनाथ मंदिरात काहीही न बोलता आवाज न करता एकत्र जमून देवतेला गाव पुन्हा भरण्यासंदर्भात (गावात परतण्यासंदर्भात) कौल लावतात. देवाने होकार दिला, तर त्या दिवशी संध्याकाळी सर्व लोक पुन्हा पाळीव प्राणी, जनावरे, साहित्य यासह आपापल्या घरी परततात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गावातील देव, तरंग यांचे अवसारी बारा/पाच मानकरी आणि ग्रामस्थ यांच्यासह चिंदर तलावाच्या वरील बाजूस बसकी ब्राह्मण या ठिकाणी पळून जातात. याला “देवपळण” असे म्हणतात. त्या ठिकाणी तीन दिवस तीन रात्र सर्वांचा मुक्काम असतो. सकाळी (पहाटे), संध्याकाळी (कातरवेळी) आणि रात्री अशा तीन वेळा देवतेला धूप घालून अवसारी यांच्या अंगात संचार येऊन ते गाव-रहाटी आणि एकंदर गावातील समस्या सोडवतात.

सध्याच्या विज्ञान युगाशी या परंपरेची सांगड घालताना काही गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. त्या म्हणजे सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वाढते प्रदूषण, रोगराई यातून मुक्तता व्हावी याकरिता तीन-चार दिवस निसर्गाच्या सान्निध्यात सर्वांनी राहावे, यासाठी कदाचित ही परंपरा पडली असावी. चंद्रावर आणि मंगळावर पोहोचणाऱ्या मानवाला या पृथ्वीवर स्वतःचे अस्तित्व शोधण्याची वेळ आली आहे. अलीकडेच जगाने करोना महामारी अनुभवली. या काळात दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नसताना घरामध्ये स्वतःला बंद करून घेणे हा एकच पर्याय जगासमोर होता आणि त्याचे सर्वांनी पालन केले त्याला लॉकडाउन म्हटले गेले. परंतु दर तीन वर्षांनंतर पूर्ण गाव रिकामे करून वेशीबाहेर संसार थाटून गावपळण करणे ही कोकणी लोकांची अंधश्रद्धा नसून सुज्ञपणा आहे, एक प्रकारचे लॉकडाउनच आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

या गावपळणीदरम्यान सर्व चाकरमानी पावणे-सोयरे गावाकडे येतात. गावाच्या वेशी बाहेर जाऊन नैसर्गिक साधनसामग्रीपासून तयार केलेले खोपटे बांधून प्रत्येक कुटुंब आपला संसार थाटतात. या काळात बाकी काहीही कामे नसल्याने फक्त मज्जा मस्ती असते. घरातील महिला भगिनी जेवणाचे नवनवीन पदार्थ करतात. त्यावर लहानथोर मंडळी यथेच्छ ताव मारतात. या दिवसांत पत्त्यांचे डाव रंगतात. विटी – दांडू, लगोरी, क्रिकेट, कबड्डी, खो-खो, पोहणे असे शारीरिक खेळ खेळले जातात. रात्री बैठे खेळ, भजने, वारकरी दिंडी नृत्य, भेंड्या लावणे अशी विरंगुळ्याची विविध साधने उपलब्ध असतात. गावातील मंडळी एकत्र गुण्यागोविंदाने राहत असल्यामुळे एकमेकांची सुख-दुःखे वाटली जातात. यातून “एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!” या उक्तीचा प्रत्यय येतो. गावातील वृद्ध, मोठी माणसे पुराणातील कथा, त्यांच्या बालपणीच्या आठवणी सगळ्यांना सांगतात. यातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे विचारप्रवाह वाहत जातो. आपल्या संस्कृतीचा एक एक धागा उलगडत जातो. या अशा रूढी का आणि कशा पडल्या, त्या का पाळाव्यात, याची प्रत्येकाला जाणीव होते. सध्या सर्वत्र वाढते प्रदूषण, रोगराई यापासून मुक्तता मिळविण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात राहणे केव्हाही चांगलेच. तेथे ऑक्सिजन वायूचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत असल्याने शरीरप्रकृतीसाठी त्याचा लाभ होतो. सध्याच्या युगात हवापालट या नावाखाली अनेक जण पिकनिकला जातात, तसाच हासुद्धा एक हवापालटच म्हणावा लागेल. सकाळचे चहा-न्याहारी, दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा, रात्रीचे जेवण सर्वजण एकत्र बसून झाडाखाली निसर्गाच्या सान्निध्यात करतात. हे वनभोजन म्हणावे लागेल. एकमेकांकडे तयार केले जाणारे जेवण, विविध पदार्थ सगळ्यांना वाटले जातात. त्यामुळे नवीन पिढीसह सर्वांमध्येच आपल्याकडे असलेले इतरांना द्यावे किंवा वाटून घ्यावे, अशी वृत्ती वाढीस लागते.

चिंदर गावातील गावातील माहेरवाशिणी या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपापल्या माहेरी येतात. आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतात. या काळात सर्व लोक एकत्र आल्याने आपापसातील हेवेदावे, मतभेद, तंटे यांचे निरसन होते. एकमेकांबद्दल प्रेम, जिव्हाळा, आपुलकी निर्माण होण्यास मदत होते. या काळात काही लोक आपल्या पाहुण्यांकडे, मामा, आत्या यांच्याकडे जातात. काही महिला आपल्या माहेरी जातात. त्यानिमित्ताने त्यांना आपल्या माणसांमध्ये वेळ घालवता येतो. या काळात वेशीबाहेर शेतावर, रानावनात वास्तव्य असल्यामुळे वीज उपलब्ध नसते. त्यामुळे टीव्ही, मोबाइल अशा साधनांपासून काही काळ तरी माणूस दूर होऊन आपल्या माणसांमध्ये मिसळतो. रात्री तेलाचे/रॉकेलचे दिवे, मेणबत्ती, कंदील, गॅसबत्तीच्या उजेडात जेवण, गप्पा, खेळ रंगतात. लहान मुलांना या काळात शाळेला सुट्टी असते. त्यामुळे त्यांच्या आनंदाला सीमा राहत नाही. परंतु ही मिळालेली सुट्टी नंतरच्या काळात भरून काढली जाते. लहान मुले दिवसभर मजा करून रात्री आजी-आजोबांकडे गोष्टी ऐकत झोपी जातात. यावेळी कोणा हिंस्र श्वापदांची, सरपटणाऱ्या प्राण्याची कोणालाही भीती वाटत नाही. हे थंडीचे दिवस असल्यामुळे निसर्गतःच वातावरणात गारवा असतो. डासांचा त्रास कमी असतो. त्यामुळे पंखा, कूलर, एसी याशिवाय शांत झोप लागते.
हे सगळे उद्देश ठेवून पूर्वजांनी ही परंपरा चालू केली असावी. वैज्ञानिकदृष्ट्या विचार करता ही कारणे असू शकतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता याला कोणीही अंधश्रद्धा म्हणू नये. भारतीय माणूस त्यात करून विशेषतः कोकणी माणूस अंधश्रद्धाळू नक्कीच नाही. तो सुज्ञ आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी ही ‘गावपळण’ नक्कीच अनुभवावी.

या झोपडीत माझ्या,
भूमीवरी पडावेss आकाश पांघरावेs
ताऱ्याकडे पाहावेs या.. झोपडीत माझ्या…ss

या ग्रामगीतेच्या ओळींचा प्रत्यय यानिमित्ताने येतो.
मुळात गावपळण हा अलौकिक सोहळा सांगून, वाचून, व्हिडीओ बघून आनंद घेता येणार नाही. त्यासाठी ती प्रत्यक्षात अनुभवावीच लागते

  • मकरंद केळकर,
    चिंदर, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग
    (9420308427)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply