मुंबई : कोकणातील रेल्वे स्थानकांना जोडणारे सर्व प्रमुख रस्ते त्वरित मजबूत करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकांच्या बाहेरील सर्व प्रमुख रस्ते मजबूत करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावेत, तसेच कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी आणि कणवकवली येथे सुसज्ज रेल्वे पोलीस ठाणे उभारण्याच्या प्रक्रियेला वेग द्यावा, अशा सूचनाही श्री. चव्हाण यांनी दिल्या.
कोकण रेल्वे स्थानक ते मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचे मजबुतीकरण, नूतनीकरण, तसेच स्थानकांचे सुशोभीकरण आदी विविध विषयांसंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झालेल्या बैठकीला कोकण रेल्वचे वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वे पोलीस अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुंबईसह देशातील प्रमुख विमानतळांचे उत्कृष्टरीत्या सुशोभीकरण आणि अत्याधुनिकीकरण करण्यात आल्यामुळे प्रवाशांना उत्तम सोयीसुविधा उपलब्ध होतात. याच धर्तीवर कोकण रेल्वेमार्गावरील स्थानकांचे सुशोभीकरण, आधुनिकीकरण करावे. कोकण रेल्वे प्रशासनाने त्यासाठी पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे, असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.
कोकणातून दररोज हजारो प्रवासी कोकण रेल्वेने प्रवास करतात. परंतु त्यांना रेल्वे स्थानकांवर तसेच या परिसरात कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांचे हाल होतात. काही प्रमुख रेल्वेस्थानकांचा अपवाद वगळता कोकण रेल्वेमार्गावरील रेल्वे स्थानकांची अवस्था अतिशय वाईट आहे. ती सर्व स्थानके लवकर सुसज्ज करावीत. ही प्रक्रिया येत्या सात दिवसांत सुरू करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
कोकण रेल्वे स्थानकांकडे जाणाऱ्या अनेक रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. हे रस्ते मजबूत करण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाची तयारी असून त्याकरिता सुमारे १०० कोटीचा खर्च अपेक्षित आहे. कोकणवासी व मुंबईच्या चाकरमान्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे रस्ते तयार करण्याची आमची पूर्ण तयारी असून यादृष्टीने कोकण रेल्वे प्रशानाने लवकरात लवकर ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर रस्त्यांचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात येईल, असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले. मडुरे, सावंतवाडी, झाराप, कुडाळ, सिंधुदुर्गनगरी, कणकवली, नांदगाव, खारेपाटण रोड, वैभववाडी रोड, आचिर्णे, राजापूर रोड, सौंदळ, आडवली, विलवडे, रत्नागिरी, भोके, सावर्डे, कामथे, चिपळूण, दिवाणखवटी, कळंबणी, आयनी, खेड या कोकण रेल्वे मार्गावरील प्रमुख स्थानकांना जोडणाऱ्या रस्त्यांचे काम हाती घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
कोकण रेल्वे मार्गावर वारंवार अनेक अपघात होतात. तसेच, दरडी कोसळण्याच्या अनेक दुर्घटनाही होतात. त्यामुळे अशा आणीबाणीच्या परिस्थितीत अपघातग्रस्तांना तातडीने उपाययोजना आणि मदत करण्याच्या दृष्टीने सुसज्ज पोलीस ठाणे आणि पोलीस चौकीची मागणी सातत्याने रेल्वे पोलिसांकडून करण्यात आली आहे. कोकण रेल्वे प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याबाबत मंत्री चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. आता रत्नागिरी आणि कणकवली येथे दोन स्वतंत्र आणि सुसज्ज पोलीस ठाणी बनविण्यात यावीत, तसेच याच परिसरात ८ पोलीस चौक्या नव्याने तयार करण्याकरिता कोकण रेल्वेने सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने योग्य जागा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना श्री. चव्हाण यांनी यावेळी उपस्थित कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली.
रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी दिवा जंक्शनच्या ऐवजी दादर स्थानकापर्यंत, तसेच दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेसला नांदगाव स्थानकावर थांबा देण्याच्या दृष्टीने, तसेच करोनाच्या काळात बंद पडलेली नांदगाव रेल्वे स्थानकावरील रो-रो सुविधा पुन्हा सुरू करण्याबाबत सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील, असे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
बैठकीला कोकण रेल्वेचे मुख्य अभियंता नागदत्त राव, वरिष्ठ अभियंता जे. एस. थोरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस. एन. राजभोज, एस. एन. गायकवाड, ए. ए. ओटवणेकर, ए. एम. रमेश, अजयकुमार सर्वगोड, अनामिका जाधव, मध्य रेल्वेचे डीसीपी मनोज पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगत, कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य विजय केनवडेकर आदी उपस्थित होते.


