रत्नागिरीत ११ डिसेंबरला आनंद प्रभुदेसाई स्मृती अभंग गायन स्पर्धा

रत्नागिरी : प्रसिद्ध गायक-संगीतदार, नाट्यअभिनेते गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त संतरचित अभंग गायन स्पर्धा येत्या ११ डिसेंबर रोजी होणार आहे. स्पर्धेचे आयोजन स्वराभिषेक-रत्नागिरी आणि पपू गगनगिरी महाराज भक्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील स्पर्धक यामध्ये सहभागी होऊ शकतात. १५ वर्षांवरील सर्वांसाठी स्पर्धा खुली असून ती दोन फेऱ्यांमध्ये पार पडेल.

गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई स्मृतिदिनानिमित्त सलग पाचव्या वर्षी ही स्पर्धा होत आहे. प्राथमिक निवड फेरीसाठी तीन मिनिटांपर्यंतची संतरचित अभंगाची ऑडिओ फाइल पाठवायची आहे. हा अभंग स्टुडिओ रेकॉर्डिंग किंवा एडिटिंग केलेला नसावा. ऑडिओच्या सुरवातीला नाव, गाव, वय, ऑडिओ केल्याची तारीख, अभंगाचे आणि संतकवींचे नाव सांगायचे आहे. तीन मिनिटांच्या ऑडिओमध्ये ध्रुवपद आणि किमान एक अंतरा असावा. त्यामध्ये संतकवींचा नामोल्लेख असलेला एखादा अंतरा असणे आवश्यक आहे. संगीतसाथीला हार्मोनियम, तबला, पखवाज, टाळ, तानपुरा ही वाद्ये वापरता येतील.

प्राथमिक फेरीकरिता ऑडिओ पाठवण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. या फेरीतून १५ स्पर्धकांची निवड परीक्षकांतर्फे अंतिम फेरीकरिता केली जाईल. निवडलेल्या १५ स्पर्धकांची अंतिम स्पर्धा ११ डिसेंबरला सकाळी नऊ वाजता रत्नागिरीतील थिबा पॅलेसशेजारील परमपूज्य गगनगिरी महाराज आश्रमाच्या रंगमंचावर पार पडेल. यावेळी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि २ उत्तेजनार्थ क्रमांक काढले जातील. त्यांना रोख पारितोषिके, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात येईल.

प्राथमिक फेरीत सहभागासाठी १०० रुपये प्रवेशशुल्क असून ते अमित भागवत (9422656724) यांच्याकडे गुगल पेद्वारे पाठवायचे आहे. ऑडिओ आनंद पंडित (9422432617) किंवा अमित भागवत (9422656724) यांच्याकडे व्हॉट्सअॅप किंवा टेलिग्रामवर पाठवावेत. ऑडिओसोबत प्रवेशशुल्काची पावती, नाव, पत्ता ३० नोव्हेंबरपर्यंत पाठवणे आवश्यक आहे.

अंतिम फेरीकरिता दोन अभंगांची यादी सादर करून त्यापैकी परीक्षकांच्या निवडीचा एक अभंग पाच ते सात मिनिटांमध्ये सादर करायचा आहे.

अधिक माहिती आणि नावनोंदणी तसेच ऑडिओ पाठवण्याकरिता अमित भागवत किंवा आनंद पंडित यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन गगनगिरी महाराज आ़श्रमाचे व्यवस्थापक राम पानगले आणि स्वराभिषेक संगीत वर्गाच्या संचालिका विनया परब यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply