लांजा : येथील शिवगंध प्रतिष्ठान या संस्थेने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय किल्ले बांधणी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या आणि स्पर्धेतील मोस्ट यू ट्यूबर व्ह्यू अॅवॉर्ड पटकाविणाऱ्या मावळा ग्रुपच्या बालकलाकारांनी स्पर्धेत पारितोषिक म्हणून मिळालेली तीन हजार ३३३ रुपयांची रक्कम महिलाश्रम संस्थेतील सर्व मुलांना खाऊसाठी दिली. त्यांच्या या सामाजिक भानातून नवा आदर्श निर्माण केला आहे.
शिवगंध प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या किल्ले बांधणी स्पर्धेत मावळा ग्रुपच्या राज संजय बावधनकर, पार्थ जितेंद्र कुरतडकर, अर्जुन संजय बावधनकर, कुमारी तेजल संजय बावधनकर, अर्णव पांडुरंग साळुंखे, श्रेयस बावधनकर आदी बालसदस्यांनी पद्मदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती साकारली होती. या प्रतिकृतीला तालुकास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. यावेळी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्रासह रोख ३ हजार ३३३ रुपयांची रक्कम देऊन शिवगंध प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू जाधव, आश्विनी जाधव, मोहन तोडकरी, विजय हटकर, महेश लांजेकर यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. ही रक्कम लांज्यातील महिलाश्रमातील सर्व मुलांना आणि भगिनींना आनंद साजरा करण्यासाठी सुपूर्द करीत आहोत, असे प्रतिष्ठानच्या वतीने कु. तेजल संजय बावधनकर हिने सांगितले.
महिलाश्रमाचे श्री. शिवगण मावळा ग्रुपचे हे सत्कार्य पाहून भारावून गेले. त्यांनी या बालकलाकारांचे मनमोकळेपणाने कौतुक केले. लहानग्यांनी दाखविलेल्या या अनुकरणीय कृतीचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे मत व्यक्त केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

