रत्नागिरी : मतिमंदांसाठी कार्यरत आविष्कार संस्थेच्या सौ. सविता कामत विद्यामंदिर आणि श्यामराव भिडे कार्यशाळेतील विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन येथील स्वा. सावरकर नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडले.
स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक राजन मलुष्टे, सौ. राधिका मलुष्टे उपस्थित होते. मलुष्टे यांचा सन्मान विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आकर्षक पुष्पगुच्छाने संस्थाध्यक्ष सीए बिपीन यांनी केला. आविष्कार संस्थेत विश्रांतीदेवी शेरे स्मृती पुरस्कारांचे वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यंदाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार सौ. ज्योती पवार आणि गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार करीना कृष्णा गवाणकर यांना दिला.
श्री. मलुष्टे म्हणाले की, मतिमंदांसाठी कार्यरत असलेल्या आविष्कार संस्थेचे कार्य हे देवाचे कार्य आहे. हे काम करणारे संस्थेतील शिक्षक, कर्मचारी हे देवदूत आहेत. याला दुसरी काही उपमा देऊ शकत नाही. हिमालयाएवढ्या कार्याला माझाही खारीचा वाटा देत असून संस्थेकरिता २५ हजार रुपयांची देणगी देत आहे.
यावेळी संस्थेच्या सचिव संपदा जोशी, कोषाध्यक्ष डॉ. शरद प्रभुदेसाई उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी स्वागतगीत, वृक्षसंवर्धनाचे नाट्य, देशभक्तिपर गीत सादर केले. उत्सव सणांचा उत्सव महाराष्ट्राचा हा सुरेख कार्यक्रम सौ. सविता कामत विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी सादर करून वाहव्वा मिळविली. गुढीपाडव्यापासून श्रावणातील सण, गणपती, दिवाळी, शिमगोत्सव या सणांवर नृत्य सादर केले. फ्युजन डान्सने मने जिंकली. घे भरारी – मुलीला शिकवा हा अनोखा नृत्याविष्कार विद्यार्थ्यांनी सादर केला. मुलीच्या जन्माचे स्वागत करा, तिला शिकवा, ती यशस्वी होईल, उच्च शिक्षण घेईल, असा संदेश यातून देण्यात आला.
गण बाई मोगरा या गीतावर पोटॅटो डान्सने तर सर्व प्रेक्षकांना डोलायला लावले. ए मेरे वतन के लोगो या देशभक्तिपर गीताने सैनिकांविषयी आदर आणि त्यांचे देशासाठी योगदान यावर प्रकाशझोत टाकण्यात आला. ढोलकीच्या तालावर ही लावणी विद्यार्थ्यांनी गायली आणि त्याला विद्यार्थ्यांनीच वाद्यसाथ केली. नृत्यदेखील मुलांनीच केले. हा कार्यक्रमही अप्रतिम झाला. विद्यार्थ्यांनी म्हटलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सौ. सविता कामत विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका वैशाली जोशी यांनी शाळेची माहिती सांगितली आणि सूत्रसंचालन केले. सचिन चव्हाण यांनी कार्यशाळेच्या उपक्रमांची माहिती दिली. शामराव भिडे कार्यशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर यांनी आभार मानले.




कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

