राजापूर : स्वतः केलेला अभ्यासच स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्याला वाचवू शकेल, असा विचार सेवानिवृत्त सिव्हिल इंजिनिअर आणि माय राजापूर संस्थेचे अध्यक्ष जगदीश पवार यांनी मांडला.
जुवाठी (ता. राजापूर) येथील आनंदवनमध्ये अक्षरमित्र स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक बी. के.गोंडाळ यांनी जुवाठी परिसरातील दहावी-बारावीतील विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी श्री. पवार बोलत होते.
ते पुढे म्हणाले, कोणताही विषय समजून घेत वाचणे आणि त्यानंतर आकलन होऊन तो विषय स्वतःच्या भाषेत व्यक्त करणे हीच खरी शिक्षण घेण्याची प्रक्रिया आहे. शिक्षणाने आपल्यातील आत्मविश्वास जागृत झाला पाहिजे. तरच कोणत्याही क्षणी निर्माण झालेल्या प्रश्नांची सोडवणूक आपण आपल्या स्वतंत्र विचाराने करू शकतो. त्यामुळे आपल्या विषयाची व्याप्ती विद्यार्थ्याला वाढवता आली पाहिजे. ज्या विषयाचा अभ्यास करताना कंटाळा येत नाही, ज्यात फार अभ्यास न करता चांगले गुण पडतात, तो विषय आपल्या आवडीचा असतो. या अनुषंगाने आपल्या करिअरची दिशा ठरवावी. यासाठी स्वतःचा शोध घ्यावा. निवडलेल्या क्षेत्राची परिपूर्ण माहिती मिळवावी. यासाठी इंनरनेटप्रणालीचा सुयोग्य वापर करावा आणि स्वीकारलेच्या व्यवसाय किंवा नोकरीत आनंद मिळवत जगावे. त्याचबरोबर आपल्या स्वप्नांसाठी कष्ट उपसलेल्या आई-वडिलांची सदोदित आठवण ठेवावी, असा मोलाचा सल्ला श्री. पवार यांनी दिला.
कार्यक्रमाला राजापूरचे इंजिनिअर संदीप देशपांडे, राजापूरचे कृषी सहाय्यक सुधीर तावडे, प्रभाकर गुरव, संतोष राऊत, सौ. मालती गोंडाळ आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत पुस्तकभेट देऊन करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांना विविध शिक्षण शाखांची माहिती सांगणारी पुस्तके मान्यवरांच्या हस्ते वाचनासाठी देण्यात आली.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

