… त्याला अंधारात माझे बाबा दिसतायत!

देवरूख (संगमेश्वर) येथील हरहुन्नरी पत्रकार संदेश सुरेश सप्रे यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्याविषयी ज्येष्ठ बंधूने व्यक्त केलेल्या भावना.

………….
शनिवार, दिनांक १२ सप्टेंबर १९८१ चा दिवस आमच्या जुन्या घरातील (देवधामापूर, ता. संगमेश्वर) काळोख्या खोलीत पहाटे एका बाळाचा जन्म झाला…. मला आजही तो दिवस चांगला आठवतोय. शनिवार असल्याने सकाळी शाळेत जायची गडबड आणि तेवढ्यातच माजघरातून या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला….. आमच्या सर्वांच्याच आनंदाला अक्षरशः पारावर उरला नाही….

पुढे नामकरण विधी होऊन बाळाचे नाव संदेश ठेवण्यात आले. परंतु शेंडेफळ असल्याने त्याला बाबा लाडाने मन्या म्हणायचे….. मग केवळ आई-बाबांचा नव्हे तर कुटुंबातील प्रत्येकाचा तो लाडका झाला, मन्या झाला…. त्याचे बालपण छान लाडात आणि मजेत गेले….

पुढे मोठा झाल्यावर त्याचा खरा स्वभाव समजू लागला…. मिश्किल, खोडकर पण मितभाषी असा आमचा मन्या…. भविष्यात काहीतरी मोठे करेल याची खात्री वाटू लागली. शाळेत आणि महाविद्यालयीन जीवनात मन लावून अभ्यास करत त्याने पदवी संपादन केली. पुढे पत्रकारितेचे शिक्षण घेत स्वतःचा मार्ग स्वतः निवडला…. ओघवत्या भाषेतील लिखाण हे त्याचे वैशिष्ट्य!! साधारणपणे २००० सालापासून त्याने पत्रकारितेतील आपली कारकीर्द सुरू केली…. दै. सकाळच्या संगमेश्वर तालुक्यातील वाचकसंख्येत वाढ करण्यात त्याने मोठा वाटा उचलला. शिवप्रसाद देसाई, प्रमोद कोनकर आणि शिरीष दामले यांच्या हाताखाली काम करण्याची संधी त्याला मिळाली. या मोठ्या लोकांकडून तो खूप काही शिकला आणि त्याने संधीचे सोने केले. त्यापूर्वी त्याने चिपळूणच्या दै. सागरमध्ये काही काळ काम केले. परंतु त्याची पत्रकारिता खऱ्या अर्थाने बहरली ती दै. सकाळमध्येच! त्याच्या नावाचे सकाळमधील लेख वाचून त्याचा नेहमी अभिमान वाटायचा. त्याने स्वतःच्या तत्त्वांशी कधी तडजोड केली नाही. तो एखाद्या आघाडीच्या वृत्तवाहिनीत असावा, अशी माझी इच्छा होती. त्यादृष्टीने मी प्रयत्नही केले, परंतु तो गाव सोडून मुंबईत यायला तयार झाला नाही. कधीही कुणाशी भांडण केले नाही. कुणाशी मारामारी केली नाही किंवा कोणत्याही वादग्रस्त प्रकरणात अडकला नाही. पत्रकारिता हे कार्ड वापरून कधीही व्यक्तिगत काम करून घेतले नाही किंवा पैशाच्या मागे लागून कुणाची सुपारी घेतली नाही. त्याने आपली स्वप्ने मर्यादित ठेवली. कमीतकमी गरजा, साधे आणि सरळ वागणे यामुळे तो अल्पावधीतच एक लोकप्रिय पत्रकार झाला. त्याने स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व तयार केले.

काळ बदलत होता. समाजमाध्यमांचे दिवस सुरू झाले. मुळातच अत्याधुनिकतेची कास धरणाऱ्या संदेशने स्वतःमध्येही बदल केले… त्या काळात लॅपटॉपवरून बातम्या टाइप करून थेट वृत्तपत्र कार्यालयात पाठवणारा संदेश हा तालुक्यातील एकमेव पत्रकार होता.

काही वर्षांपूर्वी संगमेश्वर न्यूज नावाची संकल्पना त्याने मांडली आणि समाजमाध्यमातून कोणत्याही ताज्या बातम्या एका क्षणात २०-२५ हजार वाचकांपर्यंत पोहोचेल, अशी व्यवस्था केली. आज संगमेश्वर न्यूजचे ५० हजाराहून अधिक वाचक आहेत. संयम, जिद्द आणि चिकाटी या जोरावर त्याने चांगले यश संपादन केले…. पण कुठे माशी शिंकली माहिती नाही…

महिनाभरापूर्वी त्याला कावीळ झाल्याचे निमित्त झाले…. आणि त्याचा खऱ्या अर्थाने वाईट काळ सुरू झाला.. त्या काविळीतून तो सावरत असतानाच ५ एप्रिल रोजी दुपारी ३ च्या सुमारास त्याच्यावर काळाने झडप घातली आणि आमचा सोन्यासारखा भाऊ आमच्यापासून हिरावून नेला. जाताना कोणालाही त्याच्या सेवेची संधीसुद्धा त्याने दिली नाही. सकाळी ८-३० पर्यंत व्यवस्थित असणारा संदेश पुढील दोन तासांत आमच्यापासून खूप दूर निघून गेला होता. दुपारी ३ वाजेपर्यंत त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु परमेश्वराने ती संधीच दिली नाही.

संदेशच्या जाण्याने आमच्या आयुष्यात कायमस्वरूपी एक पोकळी निर्माण झाली आहे. सर्वांत वाईट म्हणजे त्याच्या दोन मुली आणि बायको यांनी आपला हक्काचा माणूस गमावला आहे. माझी देवावर निश्चितच श्रद्धा आहे… पण कधी कधी तो इतका निष्ठूर का वागतो, हा प्रश्न उरतोच…. एखाद्या अजातशत्रू व्यक्तीच्या संसारात अशी पोकळी निर्माण करून परमेश्वराने काय साध्य केले हे फक्त त्यालाच ठाऊक…. !! आमची आई…. तिने काय कुणाचे वाईट केले की तिला आपल्या धाकट्या मुलाचा मृत्यू आपल्या डोळ्यांनी पाहावा लागला…

परवा रात्री संदेशची छोटी मुलगी माझ्याजवळ आली आणि म्हणाली, “समीरकाका, अरे ज्युनियर अंगणात बसून खूप भुंकतोय; त्याला काय दिसत असेल?”

मला तिच्या प्रश्नाचा रोख कळलाच नाही. मी म्हटले, “अग, त्याला गावची सवय नाही. तो अंधारात काहीतरी पान झाडावरून पडले म्हणून भुंकत असेल; तू लक्ष देऊ नको.”

अवघ्या दहा वर्षांच्या त्या चिमुरडीने-शुभ्राने माझे बोलणेच बंद केले. ती म्हणाली, “अरे, त्याला अंधारात माझे बाबा दिसतायत; म्हणून तो भुंकतोय. ज्युनियर म्हणतोय, बाबांना घरात घ्या!” माझ्या तोंडातून शब्दही फुटला नाही!

आम्ही एकत्र कुटुंबात वाढलो, मोठे झालो. आजही एकत्र आहोत. भविष्यातही एकत्रच असू. त्यामुळे संदेशच्या कुटुंबाची आम्ही काळजी घेऊच, पण मुलांच्या डोक्यावरील बापाचे छत्र हरवले आहे, ते कितीही पैसे खर्च केले तरीही आम्ही नाही परत करू शकत… आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी सांगण्यासाठी हक्काचा माणूस फक्त नवरा असतो.. त्या धनश्रीने काय करावे? हा देव एक माणूस घेऊन जातो, पण पाठीमागे अनेक अनुत्तरित प्रश्न ठेवून जातो. त्याचे काय?

असे म्हणतात की एखाद्या माणसाची कमाई बघायची असेल तर त्याच्या अंत्ययात्रेला होणारी गर्दी पाहावी. आम्ही याचा अनुभव गुरुवारी घेतला…. संदेशची अंत्ययात्रा आमच्या मूळ घरातून जेव्हा निघाली, तेव्हा समोर जमलेली गर्दी पाहून संदेशच्या जनसंपर्काची कल्पना आली. स्वभावाने अबोल असूनही लेखणीने त्याने स्वतःचा असा वेगळा वाचकवर्ग तयार केला. तो कायम टिकवून संदेशच्या इच्छा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करूच.

संदेशला भावपूर्ण श्रद्धांजली!!

  • समीर सप्रे, पनवेल
    (94209 99666)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply