रत्नागिरी पालिका कर्मचाऱ्यांचा व्यापारी महासंघाकडून सत्कार

रत्नागिरी : घरात गणेशोत्सव असताना दिवसरात्र मेहनत करून शहराला पाणी देणाऱ्या रत्नागिरी पालिका कर्मचाऱ्यांचा रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाकडून सत्कार करण्यात आला.

रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाची जॅक वेल ऐन गणेशोत्सवात कोसळली. ऐन उत्सवात नागरिकांसमोर पाणी संकट उभे राहिले. घरात गणपती असताना देखील नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र काम करत ४८ तासांत शहराला पाणी दिले. त्यांच्या या कार्याची रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाने दखल घेत त्यांचा सत्कार सोहळा नगरपालिकेत आयोजित करण्यात आला होता. पाणी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व्यापारी महासंघाकडून नवीन कपडे शिवण्यात आले. पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला मुख्याधिकारी तुषार बाबर उपस्थित होते. ते म्हणाले, जॅकवेल कोसळल्याची बातमी हार्ट अॅटॅक आल्यासारखी होती. पालकमंत्री उदय सामंत यांच्यामुळे शहराला लवकरात लवकर पाणी देणे शक्य झाले. माझा अंदाज होता की आपण शहराला १५ दिवसात पाणी देऊ. मात्र कर्मचाऱ्यांनी अवघ्या १२ दिवसांत शहरातील पाणी व्यवस्था सुरळित केली. करोनाच्या कालावधीत स्वतःचे व्यवसाय बंद असतानादेखील रत्नागिरीतील व्यापाऱ्यांनी रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाच्या माध्यमातून समाजासाठी काम केले. आज व्यापाऱ्यांच्या याच संघटनेच्या माध्यमातून माझ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे, याचा मला आनंद आहे.

भर पावसात भिजत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल आज रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाने घेतली आहे. त्यांचे मी आभार मानतो, असे माजी नगरसेवक निमेश नायर यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाला रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे, तालुकाध्यक्ष निखिल देसाई, नगरपालिका अधिकारी भोईर, माने व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply