रत्नागिरी : साप्ताहिक कोकण मीडियाने दिवाळी अंकासाठी आयोजित केलेल्या ‘आठवणीतलं कोकण’ या विषयावरच्या डॉ. अशोक प्रभू स्मृती लेख स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. किरण आचार्य यांच्या लेखाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. सौ. चिन्मयी बर्वे यांच्या लेखाला दुसरा, तर सौ. स्वानंदी जोगळेकर यांच्या लेखाला तिसरा क्रमांक मिळाला आहे. या व्यतिरिक्त आणखी तीन जणांची उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी निवड झाली आहे. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार-लेखक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या लेख स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. विजेत्यांच्या लेखांसह ‘आठवणीतलं कोकण’ या विषयावरच्या अन्य निवडक लेखांचा समावेश असलेला साप्ताहिक कोकण मीडियाचा यंदाचा दर्जेदार दिवाळी अंक सात नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होत आहे. स्पर्धेचा सविस्तर निकाल, तसेच अंकासाठी नोंदणी करण्याविषयीचा तपशील बातमीच्या शेवटी दिला आहे. साप्ताहिक कोकण मीडियाचा हा आठवा दिवाळी अंक आहे.
‘आठवणीतलं कोकण’ या विषयावरच्या लेख स्पर्धेला वाचकांचा अत्यंत भरभरून प्रतिसाद मिळाला. कोकणातील वाचकांनी तर या स्पर्धेत भाग घेतलाच; पण मूळच्या कोकणातील असलेल्या आणि आता बाहेरगावी असलेल्या अनेकांनी कोकणाविषयीच्या आपल्या समृद्ध आठवणी शब्दबद्ध केल्या. तसेच, कोकणाबाहेरच्या असलेल्या, मात्र काही कारणाने कोकणात येऊन गेलेल्या, वास्तव्य केलेल्या अशा व्यक्तींनीही या स्पर्धेसाठी लेख पाठवले.
‘स्पर्धेसाठी आलेले सगळेच लेख सरस आहेत. हा चांगला, तो वाईट म्हणण्यासारखा एकही नाही. परीक्षकांचा कसच लावणारे हे लेख आहेत; पण स्पर्धा म्हटली की सर्वोत्कृष्ट कामगिरी कोणाची हा प्रश्न येतोच. आयुष्यातील निम्म्याहून अधिक वर्षं मास्तरकीत घालवल्यामुळे लेखनाकडे, भाषणाकडे, चित्राकडे निरनिराळ्या अंगांनी पाहण्याची सवय लागलेली. त्यामुळेच यातून उत्तमातील उत्तम पहिले सहा क्रमांक काढण्याचा प्रयत्न करता आला. सर्वाधिक आणि सर्वांत कमी गुणांमध्ये फक्त बाराचा फरक आहे. तिसऱ्या श्रेणीत कोणताही स्पर्धक नाही, काठावर पास तर नाहीच नाही,’ अशा शब्दांत परीक्षक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी स्पर्धकांचे कौतुक केले आहे.
चित्रकला स्पर्धेविषयी…
दर वर्षीप्रमाणेच या वर्षीही ‘आठवणीतलं कोकण’ या दिवाळी अंकाच्या मुख्य विषयावरील लेख स्पर्धेसोबतच चित्रकला स्पर्धाही आयोजित केली होती. जिल्ह्यातील कला महाविद्यालये, तसेच शाळा-महाविद्यालयांशीही स्पर्धेबाबत संपर्क साधण्यात आला होता; मात्र चित्रकला स्पर्धेला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. काही चित्रकारांनी स्पर्धेसाठी पाठविली. त्यांची दखल घेण्यात आली असून, त्यापैकी निवडक चित्रे अंकात समाविष्ट करण्यात आली आहेत. सागर जाधव यांनी काढलेले चित्र अंकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. अन्य चित्रकारांची चित्रे या विषयाच्या लेखांसोबत अंकात प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
अंकात काय काय?
या अंकात ‘आठवणीतलं कोकण’ या विषयावरच्या स्पर्धेतल्या विजेत्यांचे लेख, याच विषयावरचे अन्य लेखकांचे लेख, कोकणातल्या कलाकारांनी काढलेली चित्रे, संगीत क्षेत्रातल्या दिग्गजांवरचे दोन विशेष लेख, कथा, कविता, मालवणी बोलीतील साहित्य, व्यंगचित्रे, राशिभविष्य, शब्दकोडे, असा दर्जेदार साहित्यिक फराळ आहे. त्याशिवाय सुमारे ८५ वर्षांपूर्वीच्या कोकणातील आठवणीविषयीचा, जुन्या काळातल्या स्वयंपूर्ण गावाविषयीचा लेख अंकात असून, आणखीही वेगवेगळ्या विषयांच्या लेखांचा समावेश आहे. एकंदरीत, स्मरणरंजनात रमवणारा आणि जुन्या कोकणातील महत्त्वाच्या गोष्टींची नोंद करणारा असा हा संग्राह्य दिवाळी अंक आहे.
या १०० पानी अंकाचे मूल्य १५० रुपये असून, सात नोव्हेंबरपर्यंत पूर्वनोंदणी केल्यास १५० रुपयांत अंक घरपोच मिळेल. सात नोव्हेंबरनंतर नोंदणी केल्यास १५० रुपये अधिक कुरिअर चार्जेससह अंक घरपोच मिळेल. पूर्वनोंदणीसाठी आपले पूर्ण नाव आणि पिनकोडसह पूर्ण पत्ता पाठवावा. व्हॉट्सअॅप आणि गुगल-पे क्रमांक 9822255621 हा आहे.
गुगल प्ले बुक्स, बुकगंगा डॉट कॉम आणि मॅग्झटर डॉट कॉम या वेबसाइट्सवर हा अंक ई-बुक स्वरूपातही उपलब्ध होणार आहे.
लेख स्पर्धेचा सविस्तर निकाल सोबत देत आहोत.
प्रथम क्रमांक : किरण आचार्य, बदलापूर, ठाणे
द्वितीय क्रमांक : सौ. चिन्मयी ओंकार बर्वे, पुणे
तृतीय क्रमांक : सौ. स्वानंदी स्वरूप जोगळेकर, कोंडगाव-साखरपा, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
उत्तेजनार्थ १ : जयंत फडके, जांभूळआड, मेर्वी, ता. जि. रत्नागिरी
उत्तेजनार्थ २ : सौ. सुजाता मिलिंद मिराशी, पुणे
उत्तेजनार्थ ३ : रमेश नागेश सावंत, सांताक्रूझ, मुंबई
खालील चित्रकारांची चित्रे अंकात समाविष्ट करण्यात आली आहेत.
मुखपृष्ठावरील चित्र : सागर जाधव, कनकाडी, संगमेश्वर, जि. रत्नागिरी
आतील चित्रे :
प्रवीण शंकर हर्डीकर, देवरुख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
सौ. रूपाली पाटील, खेड, रत्नागिरी
श्वेता संदीप केळकर, कुवारबाव, रत्नागिरी
शमिका विश्वनाथ मेस्त्री, नाखरे, जि. रत्नागिरी

