रत्नागिरी : शिरगाव (रत्नागिरी) येथे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे तिसरे नवीन नर्सिंग कॉलेज शैक्षणिक या शैक्षणिक वर्षापासून सुरू होत आहे. यासाठी प्रवेशाची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर २०२३ आहे.
याबाबतची माहिती प्रकल्पाचे प्रमुख मंदार सावंतदेसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, आधुनिक विचारांप्रमाणे परिचर्या सेवा फक्त रुग्णालयापुरत्या मर्यादित न राहता सर्व समाजापर्यंत पोहोचून आरोग्यविषयक माहिती पुरवण्याचे काम परिचर्या करतात. या हेतूनेच संस्थेची पुणे व नागपूर येथे २ नर्सिंग महाविद्यालये आहेत. यामधून एएनएम, जीएनएम, बीएस्सी, पीबीबीएस्सी, एमएस्सी, पीएचडी नर्सिंग हे अभ्यासक्रम शिकवले जातात.
रत्नागिरीत सुरू होणारे संस्थेचे तिसरे महाविद्यालय आहे. त्यामध्ये एएनएम नर्सिंग हा दोन वर्षांचा शासनमान्य डिप्लोमा कोर्स सुरू करत आहोत. या नर्सिंग कॉलेजला महाराष्ट्र राज्य शुश्रूषा आणि परावैद्यक शिक्षण मंडळ आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेची मान्यता आहे. नर्सिंग कॉलेजची स्वतंत्र इमारत व स्वतंत्र वसतिगृहाची सोय आहे. तसेच प्रशस्त वर्गखोल्या व अत्याधुनिक प्रात्यक्षिक वर्ग आहेत. तेथे विद्यार्थिनी नर्सिंग प्रात्यक्षिकांचा सराव करू शकतात. विद्यार्थिनींना वाहतुकीची सुविधा आहे. या नर्सिंग कॉलेजमध्ये नर्सिंगच्या चारशे पुस्तकांचे स्वतंत्र ग्रंथालय आहे. या कोर्ससाठी विद्यार्थिनींना दहा अधिक दोन उत्तीर्ण कोणत्याही शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
कॉलेजमध्ये अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर उपक्रमदेखील राबविण्यात येणार आहेत. विद्यार्थिनींना प्रात्यक्षिक अनुभवासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, चिंतामणी हॉस्पिटल, चिरायू हॉस्पिटल तसेच शहर व ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पाठवण्यात येणार आहे. यासाठी वाहतुकीची सोय कॉलेजने केली आहे.
या कॉलेजची प्रवेशप्रक्रिया सुरू असून प्रवेशासाठी २८ नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. प्रवेशासाठी कॉलेज ऑफ नर्सिंग, शिरगाव, साखरतर रोड, रत्नागिरी येथे तसेच ७६६६५०४२४३ किंवा ९४०३२१४११९ या क्रमांकावर संपर्क करावा, असे सूचित करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

