रत्नागिरी : आपण मिळवलेला पैसा कष्टाचा असल्याचे सांगण्याची धमक वेद, शास्त्रांच्या अभ्यासातून येते, असे प्रतिपादन रिवण (गोवा) येथील श्रीविद्या पाठशाळेचे ब्रह्मर्षि महामहोपाध्याय डॉ. देवदत्त पाटील यांनी केले.
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे चार विशेष पुरस्कारांचे वितरण रविवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
डॉ. देवव्रत पाटील यांनी सुरेख पद्धतीने वेद आणि शास्त्रांचा अभ्यास का केला पाहिजे, याचे विवेचन अनेक उदाहरणे देऊन केले. ते म्हणाले की, पूर्वीच्या पिढीने हालअपेष्टा सहन केल्या. वाहने नसल्याने मैलोन् मैल चालत जाऊन शिक्षण घेतले. रहाटाने पाणी काढले, शेतात काम केले. परंतु आपल्या मुलांना असा त्रास होऊ नये, म्हणून पालक सजग झाले. त्यामुळे मुलांचा शारीरिक व्यायामच होत नाही. साधारण १९९० च्या दशकानंतर ही परिस्थिती दिसू लागली. आपल्या ज्यात करिअर करायचे आहे, तसे शिक्षण घेण्याची प्रथा सुरू झाली. मोबाइलमुळे मुले आळशी बनली आहेत. डॉक्टर्स, इंजिनिअर्स या क्षेत्रात जाणाऱ्यांना घरातूनही प्रोत्साहन मिळते. तसेच संस्कृत, वेद, शास्त्राचा अभ्यास करण्याकडे कल वाढू लागला आहे. आता तरुण मुले येऊ लागली आहेत. माझ्याकडे शिकलेल्या विद्यार्थ्यांनी संस्कृत पाठशाळा सुरू केल्या आहेत, काहीजण अध्यापन करत आहेत.
डॉ. पाटील म्हणाले की, वेद आणि शास्त्र जगावे कसे हे शिकवतात. येथे आपण कुटुंबाला न्याय देतो. माझ्याकडे शिकायला मुले येतात, त्यांना विचारतो तुम्ही का येता, इथे नोकरीची निश्चिती नाही, भरपूर पैसा नाही. मुलांनी सांगितले की, बाहेर भरपूर विविध मार्गांनी किंवा चुकीच्या पद्धतीने पैसे मिळवावे लागतात. खोटे बोलावे लागते. आम्हाला प्रामाणिक जगायचे आहे. पैशाची शुद्धता हवी आहे. मी मिळवलेला कष्टाचा पैसा आहे, हे सांगण्याची धमक प्रत्येकात यायला हवी. मला माझ्या आजोबांनी सांगितले की गोव्यात वेद, शास्त्रांचा अभ्यास पाटील आणि उपाध्ये करतात. मी ठरवले आणि पुण्यात अध्ययन करून रिवणला पाठशाळा सुरू केली. आपले मूळ सोडू नये. मुलांना आपण उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवतो. ती तेथेच स्थायिक होतात. या मुलांच्या बुद्धिमत्तेचा आपल्या देशाला उपयोग होतो का, याचा विचार करावा. इकडे पालकांना वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येते. वेद, शास्त्रांच्या अभ्यासाने मुले पालकांना कधीच सोडणार नाहीत. कॉर्पोरेट जगतातील नोकरदार मंडळी ऑफिसमध्ये जुळवून घेतात, पण घरात पती-पत्नीचे जमत नाही. यामुळे घटस्फोट वाढत आहेत. परमेश्वराची भक्ती करा, पण प्रत्येक वेळी काहीतरी हवे म्हणून मागू नका.
श्रीविद्या पाठशाळेच्या विदुषी डॉ. सौ. अपर्णा पाटील म्हणाल्या की, अनेक ठिकाणी ब्राह्मण एकत्र येतात. जेव्हा ब्राह्मण एकत्र येतात, तेव्हा युगपरिवर्तन होते, हा इतिहास आहे. आई पहिला गुरू असतो. त्यामुळेच घरामध्ये आईने संस्कार केले पाहिजेत. आई अंतःकरणातून मुलाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचते आणि आईनेच मुलाला संस्कृतीचे शिक्षण दिले पाहिजे. आई-बाबा जर मोठ्यांचा मान ठेवत असतील, तिन्हीसांजेला देवाचे स्मरण करत असतील, तर मुलेही तेच करतात. ब्राह्मणांनी वेदाध्ययन करावे आणि आपला वेशही तसा ठेवावा.
यावेळी लहान वयात कांची कामकोटी मठाची तेनाली महापरीक्षा उत्तीर्ण झालेला प्रियव्रत पाटील, जिल्ह्यातील पहिले आयर्नमॅन डॉ. तेजानंद गणपत्ये, राज्य संगीत नाट्य स्पर्धेत तबलावादनात प्रथम विजेते प्रथमेश शहाणे आणि दहा वर्षे कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्या कीर्तनसंध्या परिवाराचा सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्रियव्रत पाटील याने सांगितले की, आई-वडील हेच माझे गुरू असून गुरू तेच माझ्या यशाचे रहस्य आहे. घरात वातावरण चांगले असेल तर माझ्यासारखे यश कोणीही मिळवू शकतो. त्यामुळेच अवघड परीक्षा कमी वयात उत्तीर्ण झालो.
डॉ. गणपत्ये म्हणाले की, ध्येय ठरवा, अथक मेहनत घ्या, अनेक गोष्टींचा त्याग करा आणि गुरूवर निष्ठा ठेवा. तर यश आपलेच आहे. प्रथमेश शहाणे यांनी गुरूंना वंदन करून गुरुकृपेमुळेच यश मिळाल्याचे सांगितले. आजचा सत्कार पाहण्यास आई-वडील, भाऊ आले असून हा आजचा घरचा सत्कार म्हणजे भाग्याचा क्षण आहे, असे सांगितले.
कीर्तनसंध्या परिवाराचे अध्यक्ष अवधूत जोशी आणि सहकाऱ्यांनी पुरस्कार स्वीकारला. त्यानंतर परिवारातर्फे मनोगत व्यक्त करताना उमेश आंबर्डेकर यांनी सांगितले की, हभप चारुदत्त आफळेबुवांच्या अमोघ वाणीतील कीर्तने आणि रत्नागिरीकरांच्या उदंड प्रतिसादामुळे कीर्तनसंध्या संस्थेचा उपक्रम सुरू आहे. कऱ्हाडे ब्राह्मण संघाने कौतुक केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
समारंभात पाचवी, आठवी, दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेत यशस्वी झालेल्या ७० विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. मान्यवरांचा सन्मान संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केला. सौ. प्रतिभा प्रभुदेसाई, तेजश्री जोशी आणि सचिव सौ. शिल्पा पळसुलेदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. मानस देसाई यांनी आभार मानले. या कार्यक्रमाकरिता इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांचे बहुमोल योगदान लाभले.
यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्तींसह संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत हळबे, अॅड. प्रिया लोवलेकर उपस्थित होते. कार्यक्रमास वेदमूर्ती पोखरणकर गुरुजी, वेदमूर्ती मुरवणे गुरुजी, वेदमूर्ती तन्मय हर्डीकर आणि सौ. कल्याणी हर्डीकर यांच्यासमवेत विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि ज्ञातिबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


परिचय मान्यवरांचा

पुरस्कार वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रिवण (गोवा) येथील श्रीविद्या पाठशाळेचे ब्रह्मर्षि महामहोपाध्याय डॉ. देवदत्त पाटील उपस्थित होते. डॉ. पाटील यांनी संस्कृत ग्रंथांचे अध्ययन केले आहे. रिवण येथे पाठशाळेत त्यांच्याकडे ३० विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकत आहेत. लालबहाद्दूर शास्त्री विद्यापीठात सर्वांत लहान वयात महामहोपाध्याय पदवी मिळवणारे डॉ. पाटील यांना बादरायण व्यास सन्मान, स्वर्णाङगिलीयक शृंगेरी जगद्गुरू महास्वामी सन्मान, पीठारोहण स्वर्णमहोत्सव पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी पुण्यात १६ वर्षे श्री नृसिंहसरस्वती पाठशाळेत अध्यापन केले. त्यांच्या १० विद्यार्थ्यांनी शृंगेरी पीठ येथे कांची वेदवेदांतशास्त्र सभेत महापरीक्षा दिली असून दोन विद्यार्थ्यांनी समग्र शास्त्रांचा अभ्यास केला आहे. पुण्यात त्यांनी श्रीसुब्रह्मण्य आर्ष विद्या परिषदेची स्थापना केली. मासिक सभांसह महासभांचे आयोजन ते करतात.
प्रमुख पाहुण्या डॉ. अपर्णा पाटील न्यायशास्त्राच्या अभ्यासक आहेत. गीता व बालशिक्षण, गीता दैनंदिन जीवनासाठी, शास्त्रपरिचय आणि विस्तार, शास्त्र काय सांगते या विषयांवर त्यांनी व्याख्याने दिली आहेत. त्यांनी वेदातील देवीसूक्त, पातंजल योगशास्त्र आणि भगवद्गीतेतील सहावा अध्याय आदींवर शोधनिबंध सादर केले आहेत. श्री सुब्रह्मण्य वाङ्मयीन परिषदेच्या त्या सचिव असून गुरुकलमध्ये अध्यापन करत आहेत.
डॉ. तेजानंद अनिल गणपत्ये यांनी कझाकिस्तानमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत आयर्नमॅन बनण्याचा मान मिळवला. ते रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले आयर्नमॅन ठरले. अत्यंत खडतर समजली जाणारी स्पर्धा दिलेल्या वेळेच्या आत त्यांनी पूर्ण केली. पोहणे ३.८ किमी (१ तास ४५ मि.), सायकलिंग १८० किमी (७ तास ४४ मि.) आणि धावणे ४२.२ किमी (५ तास २९ मि.) हे तिन्ही क्रीडा प्रकार १५ तास १७ मिनिटांत त्यांनी पूर्ण केले. ते एमबीबीएस, एमडी (पॅथॉलॉजी) असून चिपळूणमध्ये पॅथॉलॉजी लॅबोरेटरी चालवतात. गेल्या तीन वर्षांपासून ते रनिंग, सायकलिंग आणि स्विमिंगची प्रॅक्टिस करत आहेत. त्यांनी या खेळांमधील अनेक स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. डॉ. गणपत्ये यांनी कर्करोगावर मात करून सलग २ वर्षे कठोर प्रयत्न केले आणि फुल आयर्नमॅन बनले.
दुसरे सत्कारमूर्ती प्रियव्रत पाटील यांनी वयाच्या आठव्या वर्षी न्यायशास्त्राचा अभ्यास केला. तेव्हा ते श्रीमद्भगवद्गीतेची स्मरण परीक्षा शृंगेरी श्रीचरणी उत्तीर्ण झाले. तेनाली महापरीक्षेच्या निमित्ताने त्यांनी सिद्धांतकौमुदी, परिभाषेन्दुशेखर असे महान ग्रंथ अभ्यासले. सर्वांत कठीण समजली जाणारी तेनाली महापरीक्षा कमी वयात म्हणजे सोळाव्या वर्षी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे अभिनंदन करणारे ट्विट केले होते. ऑगस्ट २०२२ मध्ये शृंगेरी श्री चरणासमोर व्याकरणाची महापरीक्षा घेण्यात आली. तेथे त्यांना शास्त्रात सांगितलेल्या प्रयत्नांनुसार सर्वोत्तम दर्जा दिला आणि त्यांना व्याकरण अलंकार ही पदवी मिळाली. त्यानंतर त्यांनी न्यायरत्न पदवी प्राप्त श्री श्री विजया विठ्ठल चंदन यांच्याकडे मुक्तावली ते सिद्धांत लक्षणांपर्यंत ज्ञानशास्त्राचा अभ्यास केला. राष्ट्रीय संस्कृत संस्थेने आयोजित केलेल्या स्पर्धेत व्याकरण भाषणात रौप्य पदक आणि वेदभाष्य भाषणात सुवर्णपदक जिंकले.
संगीत राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणारे प्रथमेश शहाणे तबलाविशारद असून त्यांनी वडील रविकांत शहाणे, चंद्रकांत देसाई, हेरंब जोगळेकर, गोवा कला अकादमीचे शैलेश गावकर यांच्याकडून तबलावादनाचे शिक्षण घेतले आहे. यापूर्वी २०२० आणि २०२२ च्या संगीत राज्य नाट्य स्पर्धेत त्यांनी तबलावादनात द्वितीय क्रमांक, तर यंदा मंदारमाला नाटकासाठी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी आतापर्यंत दिग्गज कलाकारांना साथसंगत केली असून संगीत नाटकांतून भूमिकाही केल्या आहेत.
रत्नागिरीतील अवधूत जोशी आणि सहकाऱ्यांनी २०१२ मध्ये कीर्तनसंध्या परिवाराची स्थापना केली. त्यामार्फत दरवर्षी हिंदुत्वाचा अंगार फुलवणारी कीर्तने आयोजित केली. राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्तबुवा आफळे यांची हिंदुत्व व राष्ट्रभक्तीवरील कीर्तने सादर झाल्यामुळे रत्नागिरीत कीर्तनप्रेमींची संख्या वाढली. उमेश आंबर्डेकर, नितीन नाफड, गुरुप्रसाद जोशी, मोरेश्वर जोशी, योगेश हळबे, योगेश गानू, मिलिंद सरदेसाई, मकरंद करंदीकर, गौरांग आगाशे, महेंद्र दांडेकर, अभिजित भट, रत्नाकर जोशी यांचे कीर्तनसंध्या परिवारात योगदान आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

