मालवण : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि लेखक सुरेश ठाकूर यांच्या हस्ते साप्ताहिक कोकण मीडियाच्या यंदाच्या (२०२३) दीपोत्सव विशेषांकाचे मालवणला थाटात प्रकाशन झाले. बॅ. नाथ पै सेवांगणाच्या शिखरे सभागृहात सात नोव्हेंबरला झालेल्या या कार्यक्रमात दिवाळी अंकाच्या ई-बुकचेही प्रकाशन करण्यात आले. रत्नागिरीतील कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेसतर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या कोकण मीडिया साप्ताहिकाचा यंदाचा दिवाळी अंक आठवा असून, तो ‘आठवणीतलं कोकण’ या विषयाला वाहिलेला आहे.
‘अंकातील विविध लेख म्हणजे वाचकांसाठी एक मेजवानी आहे,’ असे मत या वेळी सुरेश ठाकूर यांनी व्यक्त केले. या वेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, केंद्रीय सदस्य रुजारिओ पिंटो, कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर, माधव गावकर, अनिरुद्ध आचरेकर, नवनाथ भोळे, गुरुनाथ ताम्हणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेसअंतर्गत सत्त्वश्री प्रकाशनातर्फे ‘ये गऽ ये गऽऽ सरी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मालवण येथे कवी केशवसुत यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून सात नोव्हेंबर रोजी करण्यात आले. याच समारंभात कोकण मीडियाच्या दीपोत्सव विशेषांकाचेही प्रकाशन करण्यात आले.

अंकात काय काय?
या अंकात ‘आठवणीतलं कोकण’ या विषयावरच्या स्पर्धेतल्या विजेत्यांचे लेख, याच विषयावरचे अन्य लेखकांचे लेख, कोकणातल्या कलाकारांनी काढलेली चित्रे, संगीत क्षेत्रातल्या दिग्गजांवरचे दोन विशेष लेख, कथा, कविता, मालवणी बोलीतील साहित्य, व्यंगचित्रे, राशिभविष्य, शब्दकोडे, असा दर्जेदार साहित्यिक फराळ आहे. त्याशिवाय सुमारे ८५ वर्षांपूर्वीच्या कोकणातील आठवणीविषयीचा, जुन्या काळातल्या स्वयंपूर्ण गावाविषयीचा लेख अंकात असून, आणखीही वेगवेगळ्या विषयांच्या लेखांचा समावेश आहे. एकंदरीत, स्मरणरंजनात रमवणारा आणि जुन्या कोकणातील महत्त्वाच्या गोष्टींची नोंद करणारा असा हा संग्राह्य दिवाळी अंक आहे.
या १०० पानी अंकाचे मूल्य १५० रुपये असून, सात नोव्हेंबरनंतर नोंदणी केल्यास १५० रुपये अधिक कुरिअर चार्जेससह अंक घरपोच मिळेल. पूर्वनोंदणीसाठी आपले पूर्ण नाव आणि पिनकोडसह पूर्ण पत्ता पाठवावा. व्हॉट्सअॅप आणि गुगल-पे क्रमांक 9822255621 हा आहे.
बुकगंगा, गुगल प्ले बुक्स, तसेच मॅग्झटरवर दिवाळी अंक ई-बुक स्वरूपात उपलब्ध आहे.
बुकगंगा : https://www.bookganga.com/R/8TAUO
गुगल प्ले बुक्स : https://play.google.com/store/books/details?id=eX7gEAAAQBAJ
मॅग्झटर : https://www.magzter.com/IN/Kokan-Media-Consultancy–Services/Kokan-Media-/News/1492183
तसेच, बुकगंगावरून अंक घरपोचही मागवता येऊ शकतो.


