अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला बालमेळावा

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि. जळगाव) : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या २ ते ४ फेब्रुवारी या काळात अमळनेर येथे होणार असून त्याच्या पूर्वसंध्येला, १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी बालमेळावा होणार आहे.

अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात पू. साने गुरुजी साहित्य नगरीमध्ये हे संमेलन होणार आहे. त्यानिमित्ताने १ फेब्रुवारी बाल मेळावा होणार आहे. मेळाव्याच्या आयोजनासंदर्भात बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठी वाङ्‌मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी होते.

बाळमेळावा समिती प्रमुख संदीप घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. बालमेळावा संपूर्ण विद्यार्थीकेंद्रित असेल. तसेच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी बहुमूल्य ठरेल, असे मत बाल मेळावा प्रमुख संयोजक एकनाथ आव्हाड यांनी व्यक्त केले. भैय्यासाहेब मगर यांनी सूत्रसंचलन केले. वसुंधरा लांडगे व स्नेहा एकतारे यांनी आयोजनातील प्रमुख मुद्दे मांडले. त्यानंतर बैठकीत बालमेळावा आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व विविध समित्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली.

बैठकीला मराठी वाङ्मय मंडळाचे उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, मंडळाचे सदस्य बन्सीलाल भागवत, बजरंग अग्रवाल, दिनेश नाईक, सतीष देशमुख, मुकेश पाटील, रमेश सोनवणे, डॉ. कुणाल पाटील, के. पी. बागुल, राहुल ब्रह्मे, वैभव आढाव, तृप्ती खैरनार, विद्या पाटील, मनोहर नेरकर, जी. एस. चौधरी उपस्थित होते.

बाल मेळाव्याचे उद्घाटक म्हणून एक मुलगा एक मुलगी यांची निवड करण्यासाठी ज्यांचे साहित्य क्षेत्रात कविता कथा किंवा इतर साहित्य प्रकाशित झाले असेल त्या साहित्याला कोणी नामवंतांनी गौरविले असेल अथवा एखादा साहित्यिक पुरस्कार मिळालेला असेल अशा दहावीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपले प्रस्ताव सविस्तर माहितीसह पुराव्यासह मंडळाकडे पाठवावेत. ज्या विद्यार्थ्यांना नाटिका, नाट्य प्रवेश सादर करावयाचे असतील त्यांनी मंडळ सांगेल त्या वेळेस उपस्थित राहून आपले प्रवेश सादर करावेत. त्यातून निवड चाचणी होऊन बाल मेळाव्यास सादरीकरणासाठी संधी मिळेल. ज्यांना बालमेळाव्यात मंच व्यवस्थापनात सहभाग घ्यायचा असेल त्यांनी आपापली नावे मंडळाकडे ठरावीक तारखेपर्यंत पाठवावीत. त्यांची कार्यशाळा घेतली जाईल व त्या कार्यशाळेतून निवड करून बालमेळाव्याच्या मंच व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या बालकांवर सोपविण्यात येतील. बालमेळाव्यातील विविध सत्रांचे अध्यक्षदेखील आलेल्या साहित्यिक प्रस्तावातूनच निवडण्यात येतील त्यासाठी मंडळाकडे प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे.

बालमेळाव्यातील उद्घाटन आणि समारोप सत्रातील समूहगीतांसाठी गायनाची निवड चाचणी मंडळ सांगेल, त्या दिवशी त्या ठिकाणी घेण्यात येईल. त्यातूनच निवडक मुलांना बाल मेळाव्यात समूहगीतात खरा तो एकची धर्म व बलसागर भारत होवो या गाण्यांवर समूहगीत सादर करण्यासाठी संधी मिळेल. इतर अधिकार बाल मेळावा आयोजन समितीकडे राखून ठेवण्यात आले असून अधिक माहितीसाठी बालमेळावा समिती प्रमुख तसेच मराठी वाङ्‌मय मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply