कोकणातील उत्पादकांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध होण्याची संधी

रत्नागिरी : कोकणासह महाराष्ट्रातील उद्योजक आणि उत्पादकांना जागतिक पातळीवर आपला व्यवसाय पोहोचविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

गल्फ महाराष्ट्र बिझिनेस फोरम या संस्थेने दुबईत येत्या २४ आणि २५ फेब्रुवारीला महाबिझ संमेलन आयोजित केले आहे. त्याद्वारे ही संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती जीएमबीएफच्या सदस्यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली.

गल्फ महाराष्ट्र बिझिनेस फोरम ही संस्था २००४ साली स्थापन झाली. त्यामध्ये प्रामुख्याने मूळचे महाराष्ट्रातील आणि कोकणातील उद्योजक कार्यरत आहेत. त्यापैकी अशोक सावंत आणि दिलावर दलवाई हे संयुक्त अरब अमिरातीत राहणारे दोघे उद्योजक तसेच फोरमचे भारतातील सदस्य नितीन सस्तकार आज रत्नागिरीत आले होते. त्यांनी याविषयीची माहिती दिली. महाराष्ट्रातील आणि मूळचे कोकणातील असलेले दोघे उद्योजक असूनही आपण कोकणात प्रथमच या संस्थेचे कार्य आणत आहोत, असे सावंत आणि दलवाई या दोघांनी सांगितले. पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यापूर्वी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील काही स्थानिक उद्योजक-उत्पादकांशी संवाद साधला. प्रामुख्याने कृषी उत्पन्नावर आधारित प्रक्रिया उद्योग करणारे हे उद्योजक होते. मासे, काजू, आंबा तसेच विविध स्थानिक पदार्थांवर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग या उद्योजकांनी चालविले आहेत. मात्र त्यांचे पुरेसे मार्केटिंग होत नसल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. याच काजूवर प्रक्रिया केलेल्या उत्पादनांना परदेशात मोठी मागणी असते. हापूस आंबा असे नाव घेतले तरी तेथे विक्रीसाठी गेलेला माल सहजी विकला जातो.

दर दोन वर्षांनी महाबिझचे आखाती देशांमध्ये आयोजन केले जाते, अशी माहिती यावेळी देण्यात आली. महाराष्ट्रातील सुमारे ८०० उद्योजक तेथे येतात. त्यांना मोठे व्यासपीठ उपलब्ध होते. जागतिक स्तरावरील बाजारपेठ त्यांना उपलब्ध होत असते. यावर्षीच्या व्यवसाय परिषदेला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कोकणातील उद्योजकांनीही त्यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. दुबई येथे होणार असलेल्या या परिषदेत कोणत्याही मालाची विक्री करता येणार नाही. मात्र भविष्यात विक्री करण्याच्या दृष्टीने संयुक्त करार केला जाऊ शकतो. मालाला थेट बाजारपेठही उपलब्ध होऊ शकते, असेही यावेळी सांगण्यात आले. दुबईतील दोन दिवसांच्या या परिषदेचे शुल्क भारतीय चलनात सुमारे २२ हजार रुपये असून इच्छुक व्यावसायिकांनी व्यापाराचे जागतिक व्यासपीठ मिळविण्यासाठी या परिषदेत सहभागी व्हावे. त्याकरिता अशोक सावंत, (यूएई – 971 50 4570349), दिलावर दलवाई (यूएई – 9971 50 7566256), दिलीप खेडेकर (भारत, 9920157927) किंवा नितीन सस्ताकार (भारत, 9545499002) यांच्याशी संपर्क साधावा.

ब्राझील आणि अन्य देशांमधून येणाऱ्या काजूपेक्षा महाराष्ट्रातील आणि त्यातही कोकणातील काजूची चव अत्यंत अप्रतिम आहे. जगभरातील इतर ठिकाणच्या काजूपेक्षा दहापट चविष्ट असलेल्या या काजूला जगभरात मागणी येऊ शकते. त्यामुळे कोकणातील स्थानिक उद्योगांचीही भरभराट होऊ शकते. त्यांना जागतिक पातळीवरील व्यासपीठ निर्माण होऊ शकते. याच उद्देशाने या उद्योजकांना रत्नागिरीत आमंत्रित केल्याची माहिती नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी दिली.

पत्रकार परिषदेत माहिती देताना गल्फ महाराष्ट्र बिझिनेस फोरमचे अशोक सावंत, दिलावर दलवाई, नितीन सस्तकार

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply