साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि. जळगाव) : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या येथील संमेलनासाठी कविता पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या २ ते ४ फेब्रुवारी २०२४ या काळात येथील प्रताप महाविद्यालयात पू. साने गुरुजी साहित्य नगरीमध्ये होत आहे. संमेलनात कविकट्टा हा उपकम दोन दिवस आयोजित केलेला आहे. कविकट्टा व्यासपीठावर कविता सादरीकरणासाठी स्वरचित कविता मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्रातील नवोदित तसेच प्रस्थापित कवींना यामध्ये सहभागी होता येईल. या संमेलनासाठी आलेल्या कवितांपैकी २०० कवितांची निवड करून कवींना निमंत्रित केले जाणार आहे.
संमेलनाच्या कार्यालयात कविकट्टा नियोजनाबाबत बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठी वाङ्मय मंडळाचे कार्यवाह नरेंद्र निकुंभ होते तर व्यासपीठावर कविकट्टाचे प्रमुख संयोजक राजन लाखे (पुणे), मंडळाचे उपाध्यक्ष व कविकट्टा समन्वयक रमेश पवार होते. बैठकीत कविकट्टा आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध समित्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. बैठकीस बन्सीलाल भागवत, वसुंधरा लांडगे, स्नेहा एकतारे, साहित्यिक प्रा. बी. एन. चौधरी, विलास पाटील, दिनेश नाईक, भाऊसाहेब देशमुख, रमेश धनगर, डॉ. कुणाल पवार, मनोहर नेरकर, शरद पाटील, सुनीता पाटील, प्रतिभा पाटील, विवेक जोशी, रत्नाकर पाटील, विजय पाटील, प्रकाश पाटील, दत्तात्रय सोनवणे, रामकृष्ण पाटील, पूनम साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत ठरल्यानुसार कविकट्टासाठी पाठविण्यात येणारी कविता स्वरचित असावी व प्रत्येक कवीने एकच कविता पाठवावी. कविता २० ओळीपेक्षा जास्त नसावी. निवड समितीने निवडलेली कविता अंतिम असेल. कवीने स्वतःचा पत्ता, संपर्क क्रमांक, ईमेल पानाच्या वरच्या बाजूला स्पष्ट अक्षरात लिहावा. कविता पोस्टाने पाठविताना पाकिटावर कविकट्टा असा स्पष्ट उल्लेख असावा. कविता फक्त पोस्टाने अथवा ईमेलने पाठवावी, व्हॉटसअॅपवरची कविता स्वीकारली जाणार नाही. कविता ईमेलने पाठविताना युनिकोड फॉन्टमध्येच पाठवावी. कविता कार्यालयात पोहोचण्याची अतिम दिनांक २० डिसेंबर २०२३ असेल. ईमेलने कविता kavikatta97amalner@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावी. तसेच पोस्टाने कविता पाठविण्यासाठी, मराठी वाङ्मय मंडळ, नांदेडकर सभागृह, न्यू प्लॉट, अमळनेर, जि, जळगाव ४२५४०१ येथे पाठवाव्यात असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी राजन लाखे (कविकट्टा प्रमुख) ९८९२६५५५२६, प्रसाद देशपांडे (समन्वयक), ९६८७६९८२७१, रमेश पवार (समन्वयक) ९४२१५९०५१ यांच्याशी संपर्क साधावा.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

