आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कार्यक्षम होण्याची सुरुवात म्हणजेच एनएसएस – कुलकर्णी

रत्नागिरी : नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कार्यक्षम होण्याची सुरुवात म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष निवासी शिबिर आहे, असे प्रतिपादन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले.

महाविद्यालयाचे विशेष निवासी शिबिर चांदेराई (ता. रत्नागिरी) येथे होत आहे. त्याच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, विद्यार्थी व्यक्तिमत्त्व घडविण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष निवास शिबिरात होत असते. शिक्षण-प्रशिक्षणाच्या बहुविध संधी विशेष निवासी शिबिरातून प्राप्त होत असतात. गावातील विविध समस्यांचे अध्ययन करून ग्रामविकासात योगदान करण्याचे कार्य स्वयंसेवकांमार्फत होत असते. आपल्यातील कौशल्य, ज्ञान, तंत्रज्ञान, नेतृत्व यांना संधी अशाच शिबिरातून प्राप्त होत असते.

सरपंच सौ. संजना शिवगण यांनी शिबिराला शुभेच्छा देऊन शिबिरासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. ग्रामपंचायत सदस्य योगेश दळी यांनी ग्रामविकासात युवकांचे योगदान किती महत्त्वपूर्ण आहे याची माहिती दिली. दादा दळी यांनी मागील दोन वर्षांतील शिबिरांचा आढावा घेतला. राष्ट्रीय विकासात युवकांचे योगदान महत्त्वाचे असून शिबिरात सर्वतोपरी कार्यरत राहण्याचा संदेश दिला. प्रा. निनाद तेंडुलकर यांनी श्रमप्रतिष्ठा, सत्रांमधील सहभाग, स्वयंशिस्त, स्वतःसोबत सहकाऱ्यांची काळजी घ्यावी आणि सोबतच कामाचा आनंद घ्यावा, असे सांगून स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या.

कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. गोसावी यांनी ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी शिबिराचा उपयोग करून घ्यावा, असे सांगितले. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचा दुवा म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी काम करावे, असे त्यांनी सांगितले. वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे म्हणाल्या, सकारात्मक कार्य करण्याची ऊर्जा विद्यार्थ्यांनी वापरावी. विशेष निवासी शिबिर विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दानिश गनी यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. उमा जोशी यांनी केले.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply