गोपाळबाबा वलंगकर साहित्यनगरी (रत्नागिरी) : हिंदूराष्ट्र हा भारतातील नवफॅसिझमचा आविष्कार आहे. त्यामुळे ज्यांना भारतात समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय, मैत्री आदी मूल्यांवर आधारित जाती, वर्ग, लिंग, भेदविरहित शोषणमुक्त, उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक भारत निर्माण करायचा आहे, त्या सर्वांनी अशा नवफॅसिझमविरुद्ध वैचारिक भूमिका घेऊन खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केला.
प्रगतिशील लेखक संघ (महाराष्ट्र) आणि रत्नागिरीतील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथे पहिले प्रगतिशील साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. डॉ. मुणगेकर पुढे म्हणाले की, ज्यांना भारतात समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय, मैत्री आदी मूल्यांवर आधारित जाती, वर्ग, लिंग, भेदविरहित शोषणमुक्त, उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक भारत निर्माण करायचा आहे, त्या सर्वांनी अशा नवफॅसिझमविरुद्ध वैचारिक भूमिका घेऊन खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, त्यात प्रगतिशील लेखकांची भूमिका फार महत्त्वाची आहे. त्यांनी सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनमरणाचे प्रश्न हा त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू केला पाहिजे. ते तसे ऐतिहासिक योगदान करतील आणि स्वातंत्र्यप्रिय भारतीय जनता या युद्धात नक्की विजयी होईल, असा मला विश्वास आहे. साहित्य हा संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. एका कालखंडातून दुसऱ्या कालखंडाकडे संस्कृतीचा प्रवाह सुरू ठेवण्याचे काम जी माध्यमे करतात, त्यापैकी साहित्य हे एक प्रभावी माध्यम आहे. संस्कृतीचे वाहक म्हणून साहित्य प्रत्येक कालखंडातील समाजाचे भौतिक जीवन, उत्पादन संबंध व उत्पादनपद्धती, वितरण व्यवस्था, भाषा, वेश, कला, आहारपद्धती, उत्सव, विविध प्रसंगी आलेले यशापयश, आशा-आकांक्षा आदी अनेक गोष्टींचा अंतर्भाव असलेली संस्कृती विविध कलाकृतींच्या माध्यमाद्वारे प्रभावीपणे पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करते. किंबहुना साहित्याकडून तशी अपेक्षा असते. समाज व साहित्य यांचे नाते द्वंद्वात्मक असते. स्वाभाविकपणे समाज संस्कृतीचे प्रतिबिंब जसे साहित्यामध्ये पडते तसे साहित्यातून अभिव्यक्त होणारे विचार समाजमन प्रभावित करण्याचे काम करतात.
डॉ. मुणगेकर पुढे म्हणाले, “अगदी किरकोळ अपवाद वगळता मराठी ललित साहित्यात ते प्रतिनिधित्व करत असलेल्या समाजघटकांचे एकूण सांस्कृतिक जीवन, त्यांचा भूतकाळातील वारसा, वर्तमानकाळातील त्यांचे जीवन, भविष्य काळातील त्यांच्या आशा-आकांक्षा, त्यांची सफलता वा नैराश्य, त्यांचे एकूण भावविश्व, त्यांच्या भावनांची गुंतागुंत यांचेच प्रतिबिंब पडले. गेल्या ७०-८० वर्षांतील महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक घटनांचे प्रतिबिंब मराठी ललित साहित्यात पडल्याचे दिसत नाही. याचे कारण बहुसंख्य मराठी लेखक व कवी ज्या सामाजिक आणि सांस्कृतिक स्तरातून आले, त्यातून त्यांच्या भावना व संवेदनशीलता घडल्या होत्या. त्यांच्या आजूबाजूला असलेले दैन्य, दारिद्र्य, दलितांचे बहुमुखी शोषण अस्पृश्यतेची दाहकता, स्त्रियांची अवहेलना, आदी गोष्टी त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या भाग नव्हत्या. त्यांना सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठा होती. एक वेळ आर्थिक परिस्थितीचा विचार बाजूला ठेवू, परंतु त्यांचे सामाजिक व सांस्कृतिक जीवन सुरक्षित होते. त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या दाहक वास्तवाची दखल घेण्याची त्यांना गरज नव्हती. त्यामुळे त्यांचे काहीच बिघडणार नव्हते.
राजकीय भाष्य करताना ते म्हणाले की, “२०१४ मध्ये पूर्ण बहुमत न मिळातही भाजपप्रणीत एनडीएचे सरकार आणि प्रामुख्याने २०१९ मध्ये पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर भाजप सरकारने राज्यघटनेच्या चौकटीवरच आघात करायला सुरुवात केली आहे, गेल्या सुमारे दहा वर्षांतील सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक घटनांचा एकत्रित विचार करता, भारतात लोकशाहीचे ऱ्हासपर्व सुरू झाले आहे. हे ऱ्हासपर्व म्हणजे भारताची नवफॅसिझमकडे सुरू झालेली वाटचाल होय. राजकीय विचारधारा म्हणून राजकीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासातील फॅसिझम हा सर्वांत शेवटी उदयास आलेला सिद्धांत आहे. बाबुराव बागुल यांनी आपल्या ‘दलित साहित्य : आजचे क्रांतिविज्ञान’ या ग्रंथात भारतात फॅसिझमची बीजे आहेत, असे नमूद केले आहे. दलित साहित्याने १९७० पूर्वीच्या उच्चवर्णीय अभिजनवादी सांस्कृतिक वर्चस्वाला प्रथमच थेट आव्हान दिले. हे दलित साहित्याचे ऐतिहासिक कार्य म्हणावे लागेल. प्रगतिशील साहित्य सामाजिक अन्यायाविरुद्ध किती स्फोटक कार्य करू शकते, याचा दलित साहित्य हा ज्वलंत आविष्कार होता. त्यामुळे दलित पँथर हे आंबेडकरी चळवळीतील एक सुवर्णपान ठरले आहे.
डॉ. मुणगेकर यांनी भारताची फॅसिझमकडे वाटचाल याचे विश्लेषण करताना त्यात पंतप्रधानांकडून संसदेचे अवमूल्यन, संघराज्यावर आघात, राज्यसभेचे अवमूल्यन, रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता धोक्यात, सर्वोच्च न्यायालय नामोहरम, नियंत्रित निवडणूक आयोग, मणिपूरमधील यादवी संघर्ष, प्रसारमाध्यमांची गळचेपी, राज्यपालांचा पक्षपाती कारभार, संसदेचे खास अधिवेशन, शिक्षणक्षेत्रातील पुनरुज्जीवनवाद, उच्च शिक्षणातील जातीभेद, आर्थिक प्रश्नांकडे दुर्लक्ष, मुस्लिम समाजाची कोंडी यांवर प्रकाश टाकला.
यावेळी संमेलनाचे उद्घाटक आणि सुप्रसिद्ध हिंदी कवी, कथाकार कुमार अम्बुज, स्वगाताधाक्ष आणि नवनिर्माण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, प्रगतिशील लेखक संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. जी. के. ऐनापुरे, कार्याध्यक्ष येशू पाटील, महासचिव राकेश वानखेडे, नवनिर्माण हायच्या संचालिका सीमा हेगशेट्ये, एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या आशा जगदाळे, नवनिर्माण हायच्या प्राचार्या नजमा मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वागताध्यक्ष हेगशेट्ये म्हणाले, प्रगतिशील साहित्य संमेलन रत्नागिरीत आयोजित करताना त्याला रत्नागिरीचा आयाम कसा द्यावा हा मोठा प्रश्न होता; मात्र कोकणाला कवी केशवसुत, साने गुरुजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धनंजय कीर, भागोजीशेठ कीर, वि. दा. सावरकर,, पु. ल. देशपांडे यांसारख्या अनेकांचा वैचारिक वारसा आम्हाला मिळाला आहे. त्याचेच स्मरण करून हे संमेलन रत्नागिरीत घेण्याचे धाडस केले. या संमेलनाच्या निमित्ताने सदाशिव पेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराचा चेहरा नक्कीच बदलेल. नवनिर्माण संस्थेने त्याचे बीजारोपण २००१ सालीच केले होते. आज त्याला नक्की सविधान सामर्थ्याची बीजे येऊ लागतील. लेखक, कवींना नव्याने मुक्तपणे, प्रभावीपणे लिहिण्याचे धाडस आणि आत्मविश्वास हे संमेलन देईल, असा विश्वास आहे.
एका विचारातून दुसरा विचार काढता आला पाहिजे असे सांगताना कवी अम्बुज म्हणाले, अनेक प्रकारच्या अनुभवातूनच कवी अनुभवसंपन्न होऊ शकतो. सुख, प्रेम, अन्याय यांच्याकडे केवळ घटना म्हणून न पाहता त्यातला भाव समजला पाहिजे. कवी आपल्या कवितेतून भौतिक गोष्टी नाही देऊ शकत, अन्न, कपडा, घर नाही देऊ शकत. मात्र तो वैचारिक आणि स्पष्ट दृष्टी देऊ शकतो आणि हे मूल्यवान आहे. कवी कधी एकटा असूनसुद्धा एकटा नसतो. आपल्याकडे असलेले प्रश्न जुनेच असतात पण त्याच उत्तर नेहमी बदलते. त्यातूनच नवसाहित्याची निर्मिती होते. उत्तर बदलले नाही तर साहित्यही जुनेच राहते.
प्रास्ताविकात श्री. ऐनापुरे म्हणाले की, पुरोगाम्यांनी आपले पुरोगामित्व तडीस नेले नाही, म्हणून फेल्युअर विद्रोही तयार झाले. त्यांनी काही जुळण्या करणे आवश्यक होते. मात्र त्यांनी त्या केल्या नाहीत. म्हणूनच आता प्रगतिशीलकडे काय काम राहिले असेल तर ते वर्तमानकाळात करायचे आहे. वरच्या संमेलनात दिसणारे भ्रष्ट रूप आता जागोजागी दिसायला लागले आहे. या रूपाला बाजूला करण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करता येतील का हा प्रश्न समोर होता. म्हणूनच महाराष्ट्राचे अध्यक्षपद आल्यानंतर अनेक बदल करायचे ठरवले. हे संमेलन कोकणात होणे हा त्याचाच एक भाग आहे. गोपाळबाबा वलंगकर हे कोकणातले. त्यांचा फोटो शोधताना आम्हाला अनेक अडचणी आल्या. क्रांती बांदेकरांच्या बाबतीतही तेच. दुसऱ्या कोणाचा तरी फोटो आम्हाला वलंगकर यांचा असल्याचे सांगण्यात आले. ही भ्रष्ट परंपरा संपुष्टात आणण्यासाठी प्रगतिशीलतेशिवाय पर्याय नाही.
डॉ. जी. के. ऐनापुरे यांच्या “मी प्रगतीशील असण्याचे कारण” तर स्वागताध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांच्या “देवरूखच्या सावित्रीबाई – सेवावृत्ती हळबे मावशी” या दोन पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी शहरातील जलतरण तलावाच्या प्रांगणातून ग्रंथदिंडी काढण्यात आली.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

