दिव्यांग व्यक्तींच्या प्रोत्साहनार्थ दापोलीत रविवारी सायकल फेरी

दापोली : शारीरिक किंवा मानसिक त्रुटीद्वारे विकलांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घेता याव्यात, म्हणून उद्या, ३ डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिवसाच्या निमित्ताने दापोली सायकलिंग क्लबने सायकल फेरीचे आयोजन केले आहे.

समाजातील काहीजण शरीराने धडधाकट असूनही नेहमी रडत असतात किंवा नाराज असतात. याउलट काही दिव्यांग व्यक्ती अपंगत्वावर मात करून यशस्वीपणे सुखी समाधानी जीवन जगत आहेत. सहानुभूती नको, फक्त विश्वास दाखवा ही त्यांची माफक अपेक्षा असते. त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी आणि जन्मतः शारीरिक, मानसिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या व्यक्तींचे मनोबल वाढविण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही सायकल फेरी असेल. दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा तसेच समाजातील अन्य लोकांना प्रेरणा मिळावी याबाबत जनजागृती करणे हा सायकल फेरीचा उद्देश आहे.

ही फेरी दापोलीच्या आझाद मैदानातून सकाळी साडेसात वाजता सुरू होईल. ती उदयनगर, लष्करवाडी, जालगाव येथील बहुविकलांग दिव्यांग मुलांचे शिक्षण व पुनर्वसन केंद्र, बर्वे आळी, पांगारवाडी, शिवाजीनगर, इंदिराबाई वामन बडे कर्णबधीर विद्यालय मार्गाने पुन्हा आझाद मैदानावर येईल. हा मार्ग ६ किलोमीटरचा आहे. फेरीचा समारोप आझाद मैदानात सकाळी साडेनऊ वाजता होईल. या सायकल फेरी दरम्यान बहुविकलांग दिव्यांग मुलांचे शिक्षण व पुनर्वसन केंद्र आणि इंदिराबाई वामन बडे कर्णबधीर विद्यालयात जाऊन शाळेबद्दल, तेथे राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांबद्दल माहिती करून घेण्यात येईल.

या सायकल फेरीसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. सर्व वयोगटातील सायकल प्रेमी सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी ८६५५८७४४८६ किंवा ८३०८३६६३६६ या क्रमांकांवर संपर्क साधावा. सायकल संस्कृती वाढावी व सायकल बद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे सायकलविषयक अनेक उपक्रम विनामूल्य राबवले जातात. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हावे आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply