महाराष्ट्रातून आखाती देशात गेलेल्या उद्योजकांनी संघटित होऊन गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम नावाची एक संस्था स्थापन केली आहे. महाराष्ट्रातील मसाल्याच्या पदार्थांपासून खाद्यपदापर्यंत विविध पदार्थांना आणि वस्तूंना आखाती देशांमध्ये मोठी मागणी असते. तेथे या उत्पादनांचा असलेला तुटवडा दूर करण्यासाठी व्यावसायिकांनी एकत्र यावे, आपापल्या वस्तूंचे आदान-प्रदान करावे, तेथे असलेल्या ग्राहकांची मागणी पूर्ण करतानाच आपला व्यवसाय वाढवावा, या उद्देशाने फोरमचे हे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. आपल्याकडेही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, सॅटर्डे क्लब अशा विविध व्यावसायिकांच्या संघटना जशा कार्यरत आहेत, त्याच धर्तीवर या फोरमचे काम चालते. पंधरा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या फोरमतर्फे दर दोन वर्षांनी व्यावसायिकांचा मेळावा म्हणजेच बिझनेस मीट आयोजित केली जाते. पुढच्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात होणार असलेल्या या मीटमध्ये कोकणातील व्यावसायिकांनीही सहभागी व्हावे आणि कोकणातील उत्पादनांना तेथे असलेली मागणी नोंदवून घ्यावी, या उद्देशाने फोरमचे संयुक्त अरब अमिरातीत राहणारे दोघे आणि त्या फोरमचे भारतातील दोघे प्रतिनिधी अशा चौघांनी रत्नागिरीतील व्यावसायिकांच्या भेटीगाठी घेतल्या. कोकणातील नारळ, आंबा, काजू तसेच अन्य स्थानिक शेतमालावर केलेल्या प्रक्रियायुक्त वस्तू आणि पदार्थांची त्या भागात असलेली मागणी कोकणातील उद्योजकांकडून पूर्ण व्हावी, या उद्देशाने या भेटीगाठी झाल्या. उद्योजकाना फेब्रुवारीतील मीटसाठी प्रवृत्त केले.
कोकणात व्यक्तिगतरीत्या तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांवर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग सुरू झाले आहेत. मात्र त्यांची विक्री व्यवस्था उभारता आलेली नाही. मोठ्या प्रमाणावर उत्पादने तयार झाली, तरी ती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सक्षम यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे किंवा असलेल्या यंत्रणेचा योग्य तो उपयोग करता येत नसल्यामुळे उत्पादने मोठ्या प्रमाणात तयार होत असली तरी ग्राहकांची मागणी मात्र पूर्ण करता येत नाही. उत्पादक आणि ग्राहक या दोघांचा समन्वय साधला जात नाही. त्यामुळे उलाढाल होत नाही आणि ग्राहकांना त्यांच्या मागणीप्रमाणे पुरवठाही होऊ शकत नाही अशी स्थिती आहे. मुंबई-पुण्यासारख्या महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये कोकणातील जे उत्पादक थेट संपर्क साधून असतात, त्यांच्या उत्पादनांची चांगली विक्री होते, पण दर्जेदार उत्पादने तयार करणाऱ्या छोट्या उद्योजकांच्या मालाचा उठाव विक्री व्यवस्थेअभावी होऊ शकत नाही. स्थानिक स्वरूपात ही स्थिती असताना एका मीटचे २२ हजार रुपयांचे शुल्क भरून दुबईच्या मीटसाठी कोकणातून व्यावसायिक सहभागी होण्याची शक्यता फारच धूसर आहे.
मुळात ग्राहकांपर्यंत उत्पादने पोहोचविण्यासाठी स्थानिक स्वरूपातच साखळी तयार झालेली नाही. त्यामुळे त्यासाठी नेमके काय करावे लागते, याची माहिती उत्पादकांना नसते. त्यामुळे राज्य आणि देशपातळीवरही उत्पादने पोहोचू शकत नाहीत. अशा स्थितीत जागतिक पातळीपर्यंत ती कशी पोहोचणार, हा प्रश्नच आहे. दुबईतील मीटच्या निमित्ताने गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमने, तसेच त्यांच्याकरिता प्रयत्न करणाऱ्या स्थानिक उद्योजकांनी त्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसे झाले तरच दुबईसारख्या कोकणातल्या उत्पादनांना मोठी मागणी असणाऱ्या व्यावसायिक व्यासपीठावर कोकणाचा प्रवेश होऊ शकेल. कोकणातील अनेक तरुण दुबईला जातात. मात्र ते तेथे नोकऱ्या करण्यात धन्यता मानतात. तेथे मिळणारे चांगले वेतन त्यांना खुणावत असते. त्यामुळे तेथे नोकरी करण्यात काहीही गैर नाही. पण नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारेही तरुण दुबईत स्थिरावले आहेत. त्यांनी कोकणातील उद्योजकांना तेथील व्यावसायिक व्यासपीठावर येण्याचे निमंत्रण दिले आहे. ते कोकणातील उद्योजकांनी साधायला हवे.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १ डिसेंबर २०२३)
(साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

