सुंदर माझी शाळा कार्यक्रमाने घेतला बालमनाचा अचूक वेध

गोपाळबाबा वलंगकर साहित्यनगरी (रत्नागिरी) :

सर तुम्ही शाळेमध्ये
असे काही शिकवा,
पळून जावा कंटाळा,
निघून जावा थकवा…

नको मला चॉकलेट,
नको मला भेळ,
माझ्यासोबत कुणीतरी
खेळा थोडा वेळ…

या आणि अशा अनेक कवितांमधून कवी गणेश घुले यांनी बालमनाचा अचूक वेध घेतला. त्यांनी सादर केलेल्या प्रत्येक कवितेला उपस्थित बोलदोस्तांनी भरभरून प्रतिसाद दिला.

निमित्त होते ते बदलत्या काळात विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यातला दुरावत चाललेला संवाद, शिक्षणाचे होत असलेले बाजारीकरण आणि हरवत चाललेली नैतिक मूल्ये यावर नेमके भाष्य करणार्‍या ‘सुंदर माझी शाळा‘ या कार्यक्रमाचे.

प्रगतिशील लेखक संघ (महाराष्ट्र) आणि रत्नागिरीतील एस. पी. महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने येथे पहिले प्रगतिशील साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या अखेरच्या दिवशी, दि. ३ डिसेंबरला झालेल्या या कार्यक्रमाने सर्वांनाच अंतर्मुख केले.

गणिताची कधीच मला
वाटू नये धास्ती
इंग्रजीशी कुणीतरी
करून द्या ना दोस्ती

या कडव्यावर बोलदोस्तांचा एकच हशा पिकला, तर

कसे माझे बाबा,
कशी माझी आई,
कसे होईल माझे यांना
चिंता ठायी ठायी

या कवितेने मुलांचे भावविश्‍वाचा ठाव घेतला. यावेळी बोलताना घुले यांनी सांगितले की, ज्या प्रकारे तळपायाला लागलेली घाण आपण स्वच्छ करतो, तर मनाला लागलेली घाण ही स्वच्छ केली पाहिजे आणि ही घाण जो शिक्षक दूर करतो तोच खरा शिक्षक असतो.

कविता सादरीकरणादरम्यान एक चिमुकल्याने कामाला जाणार्‍या आपल्या आई-वडिलांना लिहिलेल्या तक्रारीच्या पत्राचे वाचन केले. हे पत्र वाचताना उपस्थित पालकांनाही भावले. त्यानंतर तीन पिढ्यांचा शाळांचा प्रवास ‘असा बदलत गेला फळा, अशी बदलत गेली शाळा‘ या कवितेतून उलगडला. ही कविता सादर करताना घुले यांनी आजोबांच्या शाळा कशा होत्या आणि आताच्या शाळा कशा आहेत, तेव्हाच्या शाळेत छडीने कुटले जायचे, तर आताच्या शाळेत डोनेशनच्या नावाखाली लुटले जाते, अशी टिप्पणी केली. त्याला उपस्थित लहान-थोरांनी दाद दिली. शिक्षण कसे असावे, शिक्षकांनी कसे शिकवावे, बालमनाची घालमेल, इतर मुलांची आपल्या मुलांशी केलेली बरोबरी, राजकीय खेळ खेळण्याचा मुलांचा हट्ट, आजूबाजूच्या परिस्थितीचा बालमनावर होत असणारा परिणाम या सर्वांचे चित्रण असलेल्या अनेक आशयपूर्ण कविता या कार्यक्रमात अवघ्या एका तासात सादर करण्यात आल्या.

या कार्यक्रमाचे निवेदन कवी-निवेदक गणेश घुले यांनी केले. संगीतकार, गायक श्रीराम पोतदार यांनी अतिशय सुंदररीत्या गाणी सादर केली. त्यांना संतोष लोमटे यांनी तबलासाथ केली. साइड र्‍हिदम मंगेश निरंतर, तर बासरीसाथ निरंजन भालेराव यांनी केली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply