रत्नागिरी : समाजसेवेचे व्रत जपणाऱ्या बालवाडी शिक्षिका (कै.) वासंती दांडेकर सहृदयी होत्या. त्यांच्याप्रमाणेच समाजसेवा करणाऱ्या वीणा शिरीष लेले यांना पुरस्कार देताना आनंद होत आहे, त्यांचे कार्य पाहताना आदर वाटतो. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देते, असे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या कार्यवाहिका विद्याताई पटवर्धन यांनी केले.
येथील जयेश मंगल पार्कमध्ये वासंती दांडेकर प्रतिष्ठानचा पहिला कृतज्ञता पुरस्कार स्वगृही सेवा (शिरीषालय) संस्थेच्या संस्थापिका वीणा लेले यांना प्रदान केल्यानंतर त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर प्रतिष्ठानच्या प्रमुख उमा दांडेकर, निशा अंतरकर उपस्थित होत्या. वीणा लेले यांच्या कार्याची माहिती उमा दांडेकर यांनी दिली.
सत्काराला उत्तर देताना वीणा लेले म्हणाल्या, २००८ मध्ये स्वगृही सेवा संस्था स्थापन केली. त्यानंतर वृद्धाश्रम सुरू करताना अनेक अडचणी येत होत्या. परंतु वृद्धाश्रम सुरू करा, असे सांगणारेही अनेक जण होते. आजीव सदस्य, विश्वस्त यांच्यामुळे संस्थेचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे. वृद्धाश्रमाची समाजाला गरज आहे का, असे प्रश्नही अनेकांनी विचारले. परंतु स्वतःवर वेळ आल्यानंतर अनेकांना असे वृद्धाश्रम हवेत, हे जाणवते. आजारी, वृद्ध, महिला, पुरुषांना येथे ठेवले जाते. शिरगाव येथे हा वृद्धाश्रम सुरू असून आता केळ्ये येथेही नवीन वृद्धाश्रमाचे काम सुरू आहे. महाराष्ट्र, गोव्यात संस्थेला कार्य करायचे आहे.
अनिल दांडेकर यांनी सांगितले, आई सामाजिक कार्यारत सक्रिय होती, त्यामुळे तिच्या स्मरणार्थ वासंती दांडेकर प्रतिष्ठान स्थापन केले आहे. गेल्या वर्षी काही संस्थांना आर्थिक मदत दिली. यंदा प्रथमच कृतज्ञता पुरस्कार दिला. प्रतिष्ठानतर्फे नवनवीन प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणार आहोत.
नटराजपूजनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. त्यानंतर ठाणे येथील युवा कलाकार ओम विद्वांस व तन्मय माने यांचा जगलर कार्यक्रम झाला. पूर्वा साने यांनी सूत्रसंचालन केले. माधवी फडके यांनी गीत सादर केले. कांचन जोग यांनी पसायदान सादर केले. अनिल दांडेकर यांनी आभार मानले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

