देवरूख : आधुनिक काळात भारतात कम्युनिकेशन आणि टेक्नॉलॉजीमधील प्रगती उत्कृष्ट असून ती विद्यार्थ्यांसाठी ब्रह्मास्त्रे आहेत. तिचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा, असे आवाहन निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत यांनी केले.
आंबव (ता. संगमेश्वर) येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या “आरोहण २के२४” सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. महाविद्यालयाचे सव्विसावे वार्षिक स्नेहसंमेलन दिमाखात पार पडले. महाविद्यालयीन कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा, डेज, प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील विशेष कामगिरीचा गौरव यामुळे महाविद्यालयामध्ये उल्हासाचे वातावरण होते. आठवडाभर चाललेल्या या संमेलनाच्या समारोप समारंभाला परम विशिष्ट सेवा पदक प्राप्त हेमंत भागवत, महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी एक्स्पोनस एक्स्पोर्टचे संस्थापक पल्लव दवे, जलपा दवे, गोव्याच्या टीसीपीएल पॅकेजिंगचे सिनिअर मॅनेजर अमेय खोर्जुवेकर आणि मॅट्रिक्स आर्किटेक्चरल सोल्युशनचे डायरेक्टर वैभव गुरव विशेष निमंत्रित होते.
श्री. भागवत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, स्वातंत्रोत्तर काळ आणि एकविसाव्या काळाची तुलना करता आजची पिढी फार नशीबवान आहे. स्वप्न भव्य असेल तर संधी नक्की प्राप्त होतात. भविष्यात काय बनायचे आहे, याबद्दल प्रत्येकाच्या मनात स्पष्टता असायला हवी. कोकणातील मुलांमध्ये हुशारी असून त्यांनी कम्युनिकेशन, सद्यःस्थितीबद्दल जागरूकता यावर भर देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी कर्तृत्ववान व्हावे. कारण त्यावरूनच तुमची उंची ठरणार आहे.
संस्थाध्यक्ष रवींद्र माने यावेळी म्हणाले की, जीवनात मिळविण्यासारख्या खूप उत्तम गोष्टी असून त्यासाठी तितके परिश्रम आवश्यक आहेत. हेमंत भागवत यांनी ध्यास व तीव्र इच्छाशाक्तीच्या बळावर सैन्यात उच्च स्थान प्राप्त केले. त्यांचे कर्तृत्व विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत आहे. विशेष अतिथी वैभव गुरव, अमेय खोर्जुवेकर, पल्लव दवे आणि जलपा दवे यांनी राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयापासून सुरू झालेला आपला प्रवास सांगून आजपर्यंत मिळविलेल्या यशाचे गमक स्पष्ट केले.
कार्यकारी अध्यक्षा सौ. नेहा माने, सहसचिव दिलीप जाधव, प्रद्युम्न माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत, इंदिरा फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अमोल खाडे, सर्व विभागप्रमुख, पत्रकार सचिन मोहिते, सुरेश करंडे व्यासपीठावर उपस्थित होते.
समारंभात प्राचार्यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. प्रद्युम्न माने यांनी मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाचा विद्यार्थी ओमकार काटकर याने हेमंत भागवत यांचे रेखाटलेले त्यांचे रेखाचित्र त्यांना प्रदान केले. बक्षीस वितरण समारंभाने संमेलनाची सांगता करण्यात आली. यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक नृत्याविष्कार सादर केले.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

