शस्त्रास्त्र कारखान्याच्या प्रस्तावाला चेंबर ऑफ कॉमर्सचा पाठिंबा

रत्नागिरी : पालकमंत्र्यांनी जाहीर केलेल्या संरक्षण दलाच्या शस्त्रास्त्र कारखान्याच्या प्रस्तावाचे फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने स्वागत केले आहे.

फेडरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र सावंत यांनी हा पाठिंबा जाहीर केला आहे.

महाराष्ट्राचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी याबाबतची घोषणा केली आहे. त्यानुसार रत्नागिरी एमआयडीसीमधील स्टरलाइट या उद्योगाकडे पडून असलेली ५०० एकर जमीन सर्वोच्च न्यायालयाने उद्योग विभागाकडे वर्ग केल्याने त्यापैकी २०० एकर जागा भारतीय संरक्षण दलाकडे वर्ग करून तेथे संरक्षण दलाचा शस्त्रास्त्र उत्पादनाचा मोठा कारखाना सुरू होणार आहे. तीस वर्षांपूर्वी बंद पडलेल्या स्टरलाइट कंपनीची ५०० एकर जागा पडून होती. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू असल्यामुळे जागेचा उपयोग कोणालाच होत नव्हता. परंतु न्यायालयाच्या आदेशानंतर ही जागा उद्योग खात्याकडे वर्ग झाली आहे. त्यातील २०० एकर जागेवर संरक्षणासाठी वापरण्यात येणारी हत्यारे, रणगाडे, बोटी निर्माण करणारा प्रकल्प उभारण्यात येणार असून येत्या १५ दिवसात संरक्षण दल व राज्य सरकारचा उद्योग विभाग यांच्यामध्ये रत्नागिरीत करार होणार असल्याचे (.सामंत यांनी जाहीर केले आहे.

स्टरलाइट कंपनीला स्थानिक जनतेने अल्पदरात जागा दिली होती. कंपनीची निम्मी उभारणी झाल्यानंतर प्रदूषणाच्या मुद्द्यावरून रत्नागिरीकरांनी कंपनीला विरोध केला. जनसंघर्ष समितीने कंपनीवर विराट मोर्चा काढून मोर्चेकऱ्यांनी कंपनी पेटवून दिली होती. त्यानंतर कंपनी बंद झाली. त्यानंतर अनेक वर्षे जागा पडून राहिल्यामुळे एमआयडीसीने कंपनीला नोटीस पाठवून जागा परत करण्याची सूचना दिली होती. त्या विरोधात कंपनीने उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अंतिम निर्णय देताना न्यायालयाने ही जागा उद्योग विभागाला पुन्हा दिली आहे.

सुमारे ४० वर्षांपूर्वी एकरी ५०० रुपये दराने स्थानिकांनी कंपनीला जागा दिली होती. त्या बदल्यात त्यांना कंपनीत नोकरीची संधी देण्यात येणार होती. परंतु कंपनी बंद पडल्यानंतर जागेसह नोकरीची संधी गेल्यामुळे स्थानिकांनी जागा परत करण्याची मागणी सरकारकडे केली. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर स्थानिकांनी आंदोलनही केले होते. जागा परत न देताना आताच्या बाजारभावाप्रमाणे जागेचा मोबदला देण्याचे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्यानंतर स्थानिकांनी आपले आंदोलन मागे घेतले होते.

आता तेथे शस्त्रास्त्र कारखाना होणार आहे. या प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील छोट्या मोठ्या उद्योगांना जॉब बेसिसवर काम मिळण्याची मोठी संधी मिळणार आहे. सध्या जिल्ह्याबाहेर नोकरी करणाऱ्या युवावर्गाला विशेषतः आयटी क्षेत्रातील तरुणाईला आपल्याच जिल्ह्यात चांगल्या नोकऱ्या तसेच कुशल-अकुशल कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पात रासायनिक प्रदूषण होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याने पर्यावरणाची विशेषतः सभोवतालच्या आंबा, काजू बागायतींची कोणतीही हानी होणार नाही. रत्नागिरीतील व्यापार वाढून नागरिकांचे दरडोई उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

या प्रकल्पाबाबत संघटना, व्यक्ती किंवा संस्थेची काही शंका किंवा हरकत असेल तर त्याचे निराकरण फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज करण्यास तयार असल्याचेही श्री. सावंत यांनी कळविले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply