रत्नागिरी : स्वा. वि. दा. सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज (दि. २६ फेब्रुवारी) त्यांना सकल हिंदू समाजाच्या वतीने महाआरती करून अभिवादन करण्यात आले.

स्वा. सावरकर यांच्या अठ्ठावन्नाव्या पुण्यतिथीनिमित्त सकल हिंदू समाज, पतितपावन मंदिर संस्था आणि अनुलोम सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरतीचे आयोजन करण्यात आले. स्वा. सावरकर हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. सावरकरांसारखे नररत्न आपल्या भारतभूमीत जन्माला आले, हे आपले भाग्यच म्हणायला हवे! सावरकर आपले संपूर्ण आयुष्य जगले ते केवळ आणि केवळ मातृभूमीसाठी, भारतभूमीसाठी, हिंदू धर्मासाठीच! स्वातंत्र्यवीरांनी अनेक भूमिकांमधून हिंदू धर्माची आराधना आणि भक्ती केली, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

अभिवादन कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अनुलोम रत्नागिरी-सिंधुदुर्ग उपविभाग प्रमुख रवींद्र भोवड यांनी हिंदू जनजागृतीच्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देश-विदेशात विविध प्रकारचे कार्यक्रम होत आहेत. प्रमुख मार्गदर्शक मोहन भिडे यांनी सांगितले की, स्वा. सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबद्धतेमध्ये असताना हिंदूंच्या मनातील अस्पृश्यता काढून टाकून त्यांना समाजाबरोबरचे स्थान मिळावे यासाठी पतितपावन मंदिर सर्वांसाठी खुले केले. त्यांच्यासोबतच्या सहभोजनातून हिंदू बांधवांना समरसतेचा, आपलेपणाचा, बंधुतेचा मार्ग दाखवून दिला.
स्वा. सावरकर ज्या ज्या ठिकाणी वास्तव्यास होते, अशी ठिकाणे आणि पतितपावन मंदिर येथे आपल्याकडे जे कोणी नातेवाईक-पाहुणे येतील त्यांना हिंदुत्वाची प्रेरणा मिळण्यासाठी अवश्य घेऊन यावे, असे आवाहन राजेंद्र जोशी यांनी केले. यानंतर श्री पतितपावन मंदिरात महाआरती करून स्वातंत्र्यलक्ष्मी चौकातील स्वा. सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी रत्नागिरी लोकसभा सहप्रभारीप्रमुख बाळ माने, मोहन भिडे, राजेंद्र जोशी, दादा ढेकणे, मंदार शिंदे, मंदार खेडेकर, बापू गवाणकर, सौ. माधवी सुरेंद्रनाथ माने, सौ. सुजाता साळवी, प्रवीण जोशी, प्रशांत डिंगणकर, मंदार भोळे, सचिन गांधी, राजेश आंबेकर, मंदार खंडकर, अनुलोम संस्थेचे रवींद्र भोवड, मंगेश मोभारकर, तनया शिवलकर, प्रकाश खापरे इत्यादी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

