दापोली : दापोली सायकलिंग क्लबचे सूरज भुवड आणि किरण भुवड यांनी पर्यावरणपूरक होळीच्या जनजागृतीसाठी मुंबई ते दापोली असा २५० किमीचा सायकल प्रवास केला.
कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी मुंबई, पुणे आणि इतर शहरातून गावी जाण्यासाठी लगबग सुरू होते. वेगवेगळ्या वाहनांनी प्रवास करत लोक गावी पोहोचतात. सूरज आणि किरण भुवड यांनी त्यासाठी सायकल हे वाहन निवडले. दापोली तालुक्यातील आंबवली गावातील सूरज भुवड (वय २५) व किरण भुवड (वय १८) शिक्षणानिमित्त मुंबईत वास्तव्याला असतात. त्यांनी २५० किमीचा सायकल प्रवास एका दिवसात पूर्ण केला. त्यांचा मार्ग अंधेरी, पनवेल, कोलाड, माणगाव, महाड, लाटवण घाट, पालगड, दापोली असा होता. गेल्या २३ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता अंधेरीहून सुरू झालेला सायकल प्रवास दुसऱ्या दिवशी म्हणजे काल (दि. २४ मार्च) सकाळी १० वाजता आंबवली येथे संपला. या सायकल प्रवासात ठिकठिकाणी स्वागत, पाहुणचार आणि गप्पागोष्टी झाल्या. पर्यावरणपूरक होळी, नैसर्गिक रंग वापरून रंगपंचमी उत्सवाचा संदेश घेऊन निघालेल्या या दोघांना वाटभर सायकल प्रवासासाठी शुभेच्छा मिळाल्या. त्यामुळे सर्व शीण काही क्षणांतच नाहीसा झाला आणि अजून स्फूर्ती मिळाली, असे त्यांनी सांगितले.
सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवनात हे दोघेजण सायकलचा वापर अधिक प्रमाणात करतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य तंदुरुस्त बनले आहे. अनेक वर्षांपासून ते आजारी पडले नाहीत. ग्रामदेवताची कृपा आणि सर्वांच्या सदिच्छा यामुळेच हा सायकल प्रवास यशस्वी आणि सुखरूप झाला, असे त्यांचे मत आहे. सर्वांनी तंदुरुस्त आरोग्यासाठी सायकल चालवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

