पाण्याने होळी पेटवून समाजप्रबोधन

खेड : समाजाचे प्रबोधन करण्यासाठी खेड येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी विज्ञानाचा उपयोग करून पाण्याने होळी पेटवली.

समाजातील अंधश्रद्धा दूर करायच्या असतील, तर चमत्कारामागे विज्ञान असते किंवा त्या व्यक्तींची हातचलाखी असते. हे लोकांना पटवून द्यावे लागेल. कोकणात शिमगोत्सव खूप मोठा सण असतो. या सणानिमित्ताने मुंबई, पुणे या ठिकाणचे लोक आपल्या मूळ गावी येतात. या सणाचे औचित्ये साधून खेड तालुक्यातील देवसडे गावामध्ये मुंबई मंडळ व ग्रामस्थ मंडळांतर्फे दरवर्षीप्रमाणे होळीच्या ठिकाणी सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बुवाबाजी संघर्ष प्रमुख संदीप गोवळकर यांनी देवसडे गावची होळी पाण्याने पेटवून त्यामागचे विज्ञान सांगितले. गंधकाम्लात (सल्फ्युरिक अॅसिड) थोडेसे पाणी घातले, तर मोठी उष्णता निर्माण होते. प्लास्टिकच्या बाटलीमध्ये ठेवण्यात आलेल्या गंधकाम्लात चमच्याने पाणी घालण्यात आले. त्यामुळे ते आम्ल पेटले आणि प्लास्टिकची बाटली त्यात जळाली. त्यामुळे लागलेल्या आगीचा उपयोग करून घेऊन होळी पेटविण्यात आली. जगातील सर्व आगी पाण्याने विझवल्या जातात. पण पाण्याने होळी पेटणार असल्याने हा चमत्कार पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. त्यांना हे विज्ञान समजावून सांगण्यात आले.

भोंदूबाबा, भगत, मांत्रिक अशाच विज्ञानाचा वापर करून आजपर्यंत आपल्या फसवत आले आहेत. आपण चिकित्सा करायला पाहिजे. आपण विज्ञानाची साधने वापरायला शिकलो, पण वैज्ञानिक दृष्टिकोन वापरायला शिकलो नाही. आपल्या आजूबाजूला घडणारे चमत्कार वैज्ञानिक कसोटीवर तपासले पाहिजेत, असे अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गोवळकर यांनी यावेळी सांगितले. अंनिस खेड शाखेचे कार्याध्यक्ष सचिन शिर्के यांनी प्रबोधनात्मक गीत गाऊन व्यसनमुक्तीबाबत लोकांचे प्रबोधन केले.

यावेळी कुणबी समाजोन्नती संघ (मुंबई) शाखा खेड ग्रामीणचे खजिनदार व देवसडे गावचे ग्रामीण अध्यक्ष सुधीर वैराग, ग्रामीण सचिव संतोष कदम, मुंबई मंडळाचे अध्यक्ष सुनील कदम, सचिव रवींद्र शिगवण, ग्रामपंचायत सदस्य स्वाती वैराग, सल्लागार संजय कदम, मुंबई महिला मंडळ अध्यक्ष वैशाली कदम, ग्रामीण महिला अध्यक्ष निर्मला कदम यांचे मोलाचे योगदान लाभले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply