हुतात्मा सैनिक स्मृतिस्थळाचे देवरूख येथे उद्घाटन

देवरूख : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शहीद जवान स्मारकामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ६६ शूर हुतात्मा सैनिकांची नावे असलेल्या स्मृतिस्थळाचे उद्घाटन झाले.

हतात्मा भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांना २३ मार्च १९३१ रोजी ब्रिटिश सरकारने फाशी दिली होती. त्यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून त्याच दिवशी स्मृतिस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.

निवृत्त लेफ्टनंट जनरल विश्वास भट आणि बालाकोट एअर स्ट्राइकचे रचनाकार निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. राजेंद्र निंभोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पडला. लेफ्टनंट जनरल डॉ. निंभोरकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन आणि मानवंदना देऊन स्मृतिस्थळाचे उद्घाटन केले. त्यानंतर माटे-भोजने सभागृहात झालेल्या समारंभात दोघा प्रमुख पाहुण्यांसह निवृत्त कॅप्टन यशवंत कदम, वीरपत्नी सुनंदा महाडिक, माजी सैनिक अमर चाळके, सदानंद भागवत, कृष्णकुमार भोसले आणि शिरीष फाटक उपस्थित होते. हुतात्मा सैनिकांचे कुटुंबीय, माजी सैनिक आणि देशप्रेमी नागरिक बहुसंख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.

प्रास्ताविकात संस्थाध्यक्ष सदानंद भागवत म्हणाले, शिक्षण संस्थांची जबाबदारी फक्त लौकिक शिक्षण देण्याची नसून, त्याचबरोबर राष्ट्रमूल्य, राष्ट्रविचार, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रनिष्ठा निर्माण करण्याचे शिक्षणही देणे आवश्यक आहे. यासाठीच शहीद स्मारक व परमवीरचक्र दालनासारखे प्रकल्प हाती घेतले आहेत. संस्थेतील उपयुक्त व महत्त्वपूर्ण प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली.

माजी सैनिक अमर चाळके यांनी सैन्यदल व तरुणांसाठी अग्निवीर योजना हितावह असल्याचे नमूद करताना इतर देशांतील सक्तीच्या सैनिक प्रशिक्षणाबाबतची माहिती विशद केली. हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबीयांच्या वतीने प्रशांत थोरात यांनी संस्थेबद्दल ऋण व्यक्त केले.

देवरूख शिक्षण प्रसारक मंडळातील विविध शैक्षणिक आस्थापनांमधील विद्यार्थ्यांनी संकलित केलेला सैनिक कल्याण निधीचा चेक संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी लेफ्टनंट जनरल विश्वास भट यांच्याकडे सुपूर्द केला. लेफ्टनंट जनरल भट यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी संकलित केलेला निधी हा अमूल्य ठेवा आहे. हे कौतुकास्पद आहे. अग्निवीर योजनेबाबत त्यांनी सविस्तर विवेचन केले. अधिकाधिक तरुणांनी देशसेवा करण्यासाठी सैन्यामध्ये दाखल होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

लेफ्टनंट जनरल डॉ. राजेंद्र निंभोरकर यांनी देशाची सद्यःस्थिती आणि संरक्षण क्षेत्रापुढील आव्हाने विशद केली. बालाकोटा सर्जिकल स्ट्राइकबाबत बोलताना सांगितले की, ‘सरप्राइज, टाइम आणि एक्झिक्युशन’ या त्रिसूत्रीचा आधार घेऊन कृतीत आणलेले डावपेच व यशस्वी केलेली मोहीम असे तिचे वर्ण करता येईल. याबाबत सविस्तर आढावा घेताना रोमांचक प्रसंग डोळ्यांसमोर उभा केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी केले. संस्था कार्यवाह शिरीष फाटक यांनी आभार मानले.

रत्नागिरी जिल्ह्यातील ६६ हुतात्मे

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply