रत्नागिरी : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित शिवज्योत दौडीला रत्नागिरीत चांगला प्रतिसाद मिळाला.
शिवजयंतीनिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेतर्फे रत्नदुर्ग किल्ल्यावरून पहाटे ६ वाजता श्री भगवती मातेचा आशीर्वाद घेऊन शिवज्योत दौडत मारुती मंदिर येथे आणण्यात आली. त्यानंतर मारुती मंदिर येथील अश्वारूढ मूर्तीची पूजा आरती, दुग्धाभिषेक करून शिवरायांना ढोल-ताशांच्या गजरात मानवंदना देऊन आजची शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. माजी आमदार बाळासाहेब माने यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती मूर्तीची पूजा करण्यात आली. दुधाचा अभिषेक करण्यात आला.
फाल्गुन वद्य तृतीया शके १९४५ म्हणजे शिवछत्रपतींची जयंती. या दिवशी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेतर्फे शिवजन्मोत्सव सोहळा आणि शिव ज्योत दौडीला चांगला प्रतिसाद मिळाला. मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले जीवन अर्पण करणारे अदम्य साहस आणि स्वाभिमानाचे प्रतिक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त धारकऱ्यांनी अभिवादन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना माजी आमदार बाळ माने म्हणाले, आपण सर्वांनी भारतमातेच्या पोटी जन्म घेतला आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले, त्याला ३५० वर्षे होत आहेत. आपण सारे त्यांचे वारसदार आहोत, त्यामुळे छत्रपतींचे विचार आपण वर्तमानात आणि भविष्यातही आचरणात आणले पाहिजेत. त्यांचे विचार सतत तेवत ठेवण्यासाठी, राष्ट्र हितासाठी तरुणांचे योगदान हवे, असेही ते म्हणाले.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

