आदिशंकराचार्य म्हणजे भारताचे तन, मन, जीवन

रत्नागिरी : जगद्गुरू शंकराचार्य म्हणजे भारताचे तन, मन, जीवन आहेत, असे गौरवोद्गार कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलसचिव प्रा. कृष्णकुमार पाण्डेय यांनी काढले.

नागपूरच्या संस्कृत विश्वविद्यालयाचे रत्नागिरीतील भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्र आणि गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचा संस्कृत विभाग यांच्या सहयोगाने जगद्गुरू आदिशंकराचार्य यांच्या विचारांवर आधारित एकदिवसीय चर्चासत्र आज पार पडले. त्यावेळी उद्घाटन प्रसंगी प्रा. पाण्डेय बोलत होते. जगद्गुरू आदिशंकराचार्यांनी आपल्या जीवनकार्यातून भारताच्या भाषिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातील एकात्मता दृढ केली. त्यांनी आपल्या परिक्रमेतून भारतातील कानाकोपऱ्यात चैतन्य निर्माण केले, असेही ते म्हणाले. भारताचा आत्मा, परंपरा, एकता, बल, अखंडता, तप, दर्शन, संस्कृती, संस्कार, सभ्यता, संयम, श्रद्धा, उदारता, स्वरूप, तत्त्व, वैभव, ज्ञान, कीर्ती, आत्मा, वाणी, गर्व, चिंतन हे जगद्गुरू आदिशंकराचार्य हे आहेत. त्यांनी देशाच्या पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर या चार दिशांना स्थापन केलेली चार पीठे, त्यांना देण्यात आलेले वेद आणि त्यांची केलेली सूत्रबद्ध योजना आदिशंकराचार्यांची दूरदृष्टी स्पष्ट करते.

आदिशंकराचार्यांनी स्थापन केलेला पूर्वेचा जगन्नाथपुरीचा गोवर्धन मठ, दक्षिणेचा शृंगेरी मठ, पश्चिमेचा द्वारकेचा शारदा मठ आणि बद्रिकाश्रमाचा ज्योती मठ यांचा उल्लेख डॉ. पाण्डेय यांनी केला. रत्नागिरीतील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे, भगवान परशुराम आणि आचार्य बाळकृष्ण दीक्षित या चार महान विभूतींचा त्यांनी आदरपूर्वक उल्लेख केला.

चर्चासत्राला गोगटे- महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे व्यासपीठावर होते. नवी दिल्लीतील भारतीय भाषा समितीच्या आर्थिक साहाय्याने हे चर्चासत्र प्रथमच झाले. चर्चासत्राचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्र महाराजांच्या पाठशाळेतील वेदाध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मंत्रोच्चार करत वातावरण मंगलमय केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिनकर मराठे यांनी केले सूत्रसंचालन प्रा. कश्मिरा दळी यांनी केले. डॉ. कल्पना आठल्ये यांनी आभार मानले.

उद्घाटन कार्यक्रमानंतर व्याख्याते श्रीनिवास पेंडसे यांनी आदिशंकराचार्यांची महती सांगितली, तर नंतरच्या सत्रात प्रा. अंजली बर्वे यांनी शंकराचार्यांच्या स्तोत्रांचे महत्त्व स्पष्ट केले. त्यानंतर नारायणी मंडळाच्या महिलांनी शंकराचार्यांच्या काही स्तोत्रांचे गायन केले.

समारोप समारंभात डॉ. कल्पना आठल्ये आणि डॉ. पाण्डेय यांनी चर्चासत्राच्या अनुषंगाने शंकराचार्यांच्या विचारांचा आढावा घेतला. संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी आभार मानले.

चर्चासत्राला उपकेंद्रातील प्राध्यापक, कर्मचारी, रत्नागिरी जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील ६० हून अधिक संस्कृत तसेच आदिशंकराचार्यप्रेमी उपस्थित होते.

प्रा. कृष्णकुमार पाण्डेय यांनी मांडलेली भूमिका

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply