Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आसावरी शेट्ये यांचे निधन

Advertisements

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या येथील ज्येष्ठ नेत्या आणि रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सदस्या आसावरी शेट्ये (वय ६२) यांचे पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

मुंबई दूरदर्शनवर कलाकार म्हणून कारकीर्द सुरू केल्यानंतर प्राथमिक शिक्षिका म्हणून त्या मुंबईतून रत्नागिरी जिल्ह्यात आल्या. कालांतराने त्या राजकारणात सक्रिय झाल्या. रत्नागिरी पंचायत समितीच्या त्या पाच वर्षे सदस्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्य स्तरापर्यंत विविध पदांवर त्यांनी काम केले. रत्नागिरी जिल्हा महिला पतपेढीच्या त्या संचालिका होत्या. महिला बचत गटांच्या उत्कर्षासाठी त्यांनी काम केले. महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या रत्नागिरीतील स्थानिक कार्यकारिणीच्या त्या सदस्य होत्या.

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या त्या सक्रिय सदस्य होत्या. बालरंगभूमीसाठी त्यांनी काम केले. रत्नागिरीत मुलांसाठी नाट्य शिबिरांचे आयोजन करणे, बालनाटकांचे दिग्दर्शन, संयोजन करून त्यांनी रत्नागिरीत बालरंगभूमीची चळवळ पुढे नेण्यात मोलाची कामगिरी बजावली. बालरंगभूमीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेच्या त्या अध्यक्षा होत्या. मुलांसाठी मूर्तिकला शिबिरांसारखे विविध उपक्रमही त्यांनी राबविले. करोनाच्या लॉकडाऊनच्या काळात त्यांनी ऑनलाइन बाल-नाट्य कार्यशाळा आयोजित केली होती. पुण्यातील ज्येष्ठ नाट्यकर्मी देवदत्त पाठक आणि अहमदनगरचे ज्येष्ठ नाट्यकर्मी देवीदास सोहनी यांनी त्यावेळी मार्गदर्शन केले. बालरंगभूमीतर्फे ऑनलाइन बाल-नाट्यकला स्पर्धाही त्यांनी आयोजित केली होती.

आसावरी शेट्ये नियमित वैद्यकीय तपासणीसाठी पुण्यात गेल्या होत्या. तेथेच त्यांचे काल, दि. २५ एप्रिल रोजी सायंकाळी निधन झाले. आज त्यांच्यावर पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version