रत्नागिरी : रत्नागिरी तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुहास वामन तथा कुमार शेट्ये (७० वर्षे) यांचे आज (२७ डिसेंबर) दुपारी दोन वाजून १६ मिनिटांनी रत्नागिरीतील लोटलीकर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला. शिरगाव ग्रामपंचायतीचे ते दीर्घ काळ सरपंच होते. या काळात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना गावात राबविण्यात त्यांचा पुढाकार होता.
आठ मार्च ही कुमार शेट्ये यांची जन्मतारीख. सुरुवातीच्या काळात त्यांनी मासळीच्या ट्रकवर ड्रायव्हर म्हणून केले होते. त्यांना सामाजिक कार्यातही मोठा रस होता. ड्रायव्हर म्हणून काम करतानाही त्यांच्या या कार्याचा अनुभव अनेकांना आला. त्यामुळेच शिरगाव आणि परिसरासह रत्नागिरी तालुक्याच्या विविध भागांमध्ये हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समाजांमधील नागरिक त्यांचे चाहते होते. मच्छिमारी क्षेत्रातही त्यांनी चांगले काम केले. मच्छिमारी सहकारी सोसायट्याच नव्हे, तर सामान्य मच्छिमारांच्या हितासाठी त्यांनी कार्य केले. सामाजिक कार्यातूनच त्यांचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी संपर्क आला. त्यांचे अनुयायी म्हणून ते काँग्रेस पक्षात दाखल झाले.
सामाजिक काम करत असतानाच रत्नागिरी तालुका पंचायत समितीची निवडणूक त्यांनी लढवली आणि ते जिंकून आले. पुढच्या पाच वर्षांमध्ये ते रत्नागिरी तालुका पंचायत समितीचे सभापतीही होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्यांच्याकडे पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदासह विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचेही ते कार्यकारिणी सदस्य होते. तसेच, प्रदेश उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले. अखेरपर्यंत त्यांची निष्ठा शरद पवार यांच्याशी होती. अलीकडे त्यांची प्रकृती नाजूक बनली होती. त्यांना मधुमेह आणि हृदयविकाराचाही त्रास होता. त्यासाठी रत्नागिरीसह मुंबई आणि पुण्यात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पुण्यातील उपचार झाल्यानंतर ते काही दिवसांपूर्वी रत्नागिरीत आले होते. रत्नागिरीच्या डॉक्टर लोटलीकर यांच्या रामनाथ हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने एक सहृदय राजकीय नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
कुमार शेट्ये यांनी एकदा अपक्ष म्हणून आणि एकदा काँग्रेसचे अधिकृत सदस्य म्हणून अशी दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवली होती. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपदही त्यांनी काही काळ भूषविले होते. तसेच दीर्घ काळ ते पक्षाचे सरचिटणीस होते. हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समाजांमधील अनेक भगिनींना ते कित्येक वर्षे कोणताही गाजावाजा न करता दिवाळीमध्ये भाऊबीज भेट देत असत.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

