विधानसभेचे निवृत्त प्रधान सचिव न्या. भास्करराव शेट्ये यांचे निधन

रत्नागिरी : रत्नागिरीचे सुपुत्र, विधानसभेचे निवृत्त प्रधान सचिव आणि निवृत्त न्यायाधीश भास्कर नारायण शेट्ये (वय ८९) यांचे आज (३१ ऑगस्ट) दुपारी मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले.

भास्करराव शेट्ये यांचे शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण रत्नागिरीत झाले. त्यानंतर त्यांनी वकिलीची पदवी घेतली. काही काळ वकिली केल्यानंतर त्यांनी न्यायाधीश म्हणून सांगली, पुणे, नाशिक, राधानगरी, कोल्हापूर, धुळे, चाळीसगाव, पालघर, पणजी आदी ठिकाणी अनेक वर्षे काम केले. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र विधानसभेचे प्रधान सचिव म्हणून निवड झाली. तेथे त्यांनी दहा वर्षे कामकाज पाहिले. विधानसभा सचिव म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांची नव्यानेच निर्माण झालेल्या महाराष्ट्र-गोव्याचे बँकिंग लोकपाल म्हणून निवड झाली. बँकिंग लोकपाल म्हणून त्यांनी तीन वर्षे काम पाहिले. निवृत्तीनंतर त्यांचे रत्नागिरीत वास्तव्य होते.

ते गगनगिरी महाराजांचे निस्सीम भक्त होते. त्यांना महाराजांचा अनेक वर्षे जवळून सहवास लाभला होता. निवृत्तीनंतर त्यांनी विविध सामाजिक संस्थांमध्ये काम केले होते. कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक-सदस्य आणि विश्वस्त म्हणून ते अनेक वर्षे काम करीत होते. न्यायप्रिय, शिस्तप्रिय म्हणून ते प्रसिद्ध होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा त्यांना जवळून सहवास लाभला होता. त्यांना विविध नामवंत संस्थांचे पुरस्कार लाभले होते. मुंबईतील प्रसिद्ध लाड फाउंडेशनच्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

गेले काही महिने ते मुंबईत आपल्या मुलाकडे वास्तव्याला होते. तेथेच आज दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी शामल, ज्येष्ठ चिरंजीव मुंबई उच्च न्यायालयातील अॅड. सचिंद्र शेट्ये, धाकटे चिरंजीव तारांगण क्षेत्रात काम करणारे अभिजित शेट्ये, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

(कोकण टुडे वृत्तसेवेवरून साभार)

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply