ज्येष्ठ पत्रकार डॉ. एम. डी. शेकासन यांचे निधन

संगमेश्वर : गेली ४५हून अधिक वर्षे आपल्या लेखणीने समाजाभिमुख पत्रकारिता चळवळ जागृत ठेवणारे ज्येष्ठ पत्रकार आणि समाजवादी विचारसरणीचे कार्यकर्ते डॉ. एम. डी. शेकासन (७४) यांचे आज (नऊ ऑक्टोबर २०२०) रत्नागिरीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील कोंडिवरे हे मूळ गाव असलेल्या शेकासन यांचे कोकणातील समाजवादी चळवळीत मोठे योगदान होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी हिरीरीने भाग घेतला होता. आचार्य अत्रे यांच्या दैनिक मराठासाठी ते कोकणातून वार्तांकन करत असत. त्या काळी आजसारखी कोणतीही आधुनिक साधने नव्हती, तरी मिळेल त्या मार्गाने आपल्या बातम्या मुख्यालयाला पाठवण्यात ते यशस्वी ठरले.

नंतरच्या काळात दैनिक नवशक्तीसाठी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे वार्तांकन केले. तिथे काही वर्षे काम केल्यानंतर त्यांनी कोकणच्या पत्रकारितेत आणि राजकारणात ठसा उमटवणारे नाना जोशी यांच्या दैनिक सागरसाठी काम केले. नाना आणि त्यांचे शेवटपर्यंत मैत्रीचे संबंध होते. त्या वेळी संगमेश्वरला पूर आला की महामार्ग बंद व्हायचा. चिपळूणला पूर असला, की सागरच्या कार्यालयात बातमी पोहोचवणे अवघड व्हायचे; मात्र डॉ. शेकासन यांनी प्रसंगी पायी चालत जाऊन आपल्या बातम्या मुख्यालयात पोहोचवल्या. यानंतर गेली अनेक वर्षे ते जिल्हा पातळीवरील दैनिकात कोणतीही अपेक्षा न ठेवता बातमीदारी करत होते. अगदी अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी पत्रकारितेचा वसा सोडला नाही. केवळ संगमेश्वर तालुकाच नव्हे, तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर त्यांनी सडेतोड लेखन केले.

संगमेश्वर तालुका पत्रकार संघाचे ते संस्थापक सदस्य होते. समाजवादी चळवळीत सक्रिय सहभाग असल्याने मधू दंडवते, नाथ पै यांच्यापासून सर्व नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते. सुरुवातीला जनता पक्षाचे काम करणाऱ्या शेकासन यांनी नंतर जनता दलासाठी काम केले. त्यानंतर बरीच वर्षे ते काँग्रेससाठी सक्रिय होते; मात्र पत्रकारिता आणि राजकारण यांची त्यांनी कधीही सांगड घातली नाही. १९७८ ते १९८२पर्यंत ते संगमेश्वर पंचायत समिती सदस्य होते.

काल (आठ ऑक्टोबर) रात्री त्यांना मधुमेहाचा जास्त त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तत्काळ रत्नागिरीत दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना आज सकाळी हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्याने त्यांचे निधन झाले. आज संध्याकाळी कोंडिवरे येथील दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात भाजप अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जाकिर शेकासन आणि काँग्रेसचे युवा नेते हारिस शेकासन हे दोन सुपुत्र व परिवार आहे. संगमेश्वर तालुका पत्रकार संघातर्फे त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply