लाल‌ मातीच्या रक्ताला चेतना देणारा कवी : डॉ. वसंत सावंत (सिंधुसाहित्यसरिता – १५)

डॉ. वसंत सावंत (११ एप्रिल १९३५ – २३ डिसेंबर १९९६)

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा १५वा लेख… कवी वसंत सावंत यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे कल्पना मलये यांनी…
………
अशा लाल मातीत जन्मास यावे
जिचा रंग रक्तास दे चेतना
इथे नांदते संस्कृती भारताची
घरातून दारात वृंदावना

कोकणच्या लाल मातीच्या सौंदर्यावर कविता करणारे कविवर्य डॉक्टर वसंत सावंत यांचा जन्म ११ एप्रिल १९३५ रोजी झाला. त्यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण फोंडा येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठली. मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना प्राध्यापक रमेश तेंडुलकर, प्राध्यापक अनंत काणेकर, प्राध्यापक डॉक्टर स. ग. मालशे यांसारखे काव्यप्रतिभा फुलवणारे प्राध्यापक म्हणून गुरू त्यांना लाभले. रेल्वेमध्ये कारकुनी करत असतानाच त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सुरू ठेवले होते.

१९६३ साली सावंतवाडी संस्थानचे हिज हायनेस शिवरामराजे भोसले यांनी पंचम खेमराज महाविद्यालयाची स्थापना केली. स्वतः राजेसाहेबांनी कवी वसंत सावंत यांना या ठिकाणी बोलावून घेतले. १९६३ सालापासून डॉ. वसंत सावंत प्राध्यापक म्हणून या महाविद्यालयात आले. डॉ. वसंत सावंत यांच्या शब्दांत सांगायचे झाले, तर ‘सावंतवाडी हे गाव म्हणजे परमेश्वराला पडलेले अपुरे स्वप्न होते.’

या ठिकाणी कवी वसंत सावंत यांची काव्यप्रतिभा अधिकाधिक बहरत गेली. त्यांच्या कवितांमध्ये निसर्ग भरभरून वाहिलेला आहे. त्यांची तुलना वर्डस्वर्थ या निसर्गकवीसोबत केली जाते. झाडांच्या पानांवर कविता लिहिली जाते आणि वडाच्या पारंब्यांसारखी कविता विस्तारते, असे म्हणणारे हे कवी. वसंत सावंत निसर्गवेडे होते. बैल, सुतारपक्षी, रंग या त्यांच्या कवितांना अभ्यासक्रमात स्थान मिळाले. ‘बैल’ कविता बारावीच्या पाठ्यपुस्तकात होती. या कवितेवर अनेकांनी वेगवेगळ्या अंगाने लेखन केले आहे. बैल हे कृषी संस्कृतीचे महत्त्वाचे जित्राब. परंतु या बैलाची तुलना मनुष्य स्वभावाशी करून वसंत सावंत यांनी कवितेला एक वेगळा आयाम दिला.

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून फिरणारा कलंदर बैल
उभ्या शिंगाचा कोल्या रंगाचा
घळणीच्या लाल मातीत कळणीस येणारा
चौखूर उधळतो आहे माझ्या रक्ताच्या कणाकणातून

डॉ. वसंत सावंत यांची लेखणी निसर्गासाठी होती. निसर्गातल्या प्रतीकांसाठी होती, तेवढीच अध्यात्माकडे झुकणारी होती. त्यांचे वडील वारकरी संप्रदायाचे होते. त्यामुळे त्यांच्यावर हे आध्यात्मिक संस्कार झाले. त्यातूनच ‘वाई’सारख्या कविता जन्माला आल्या. वसंत सावंत यांची ग्रंथसंपदा फार मोठी आहे. ‘स्वस्तिक’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. त्यानंतरचा ‘उगवाई,’ त्यानंतर ‘देवराई,’ ‘माझ्या दारातले सोनचाफ्याचे झाड’ आणि ‘सागरेश्वर.’ ‘वसा’ हा त्यांचा शेवटचा दीर्घ काव्यसंग्रह.

‘प्रवासवर्णन स्वतंत्र वाङ्मयप्रकार’ या त्यांच्या शोधनिबंधासाठी त्यांना डॉक्टरेट मिळाली. ३२ वर्षे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. अध्यापनाचे कार्य करत असताना त्यांनी आपले साहित्यिक कार्यदेखील तेवढ्याच जोमाने सुरू ठेवले. १९७२ साली त्यांनी दक्षिण रत्नागिरी साहित्य संघ स्थापन केला. या साहित्य संघामार्फत कोजागरी संमेलन भरवण्यास सुरुवात केली. हे कोजागरी साहित्य संमेलन आजतागायत सुरू आहे. या संमेलनाला त्यांनी अनेक दिग्गज कवींना निमंत्रित केले.

वसंत सावंत यांची लेखणी जेवढी निसर्गासाठी बहारदार होती, तेवढीच ती परखड होती, कोकणाच्या प्रगतीसाठी तळमळणारी होती.

परंतु ही बंद घरे
कुलूप घातलेली दारे
प्रगतीचे कधी वारे
आले ना

यांसारख्या कवितादेखील त्यांनी लिहिल्या. साहित्य क्षेत्रातील एकंदर परिस्थितीबाबत टोकदार भाष्य करणारी ‘संत तुकाराम’ ही त्यांची कविता कवितासंग्रहात समाविष्ट नसली, तरी तिचा वेगळेपणा आपल्याला तिच्याकडे नेतो. ‘आज तुकाराम असता तर त्यालाही दुरुस्त केले असते’ अशी कविता लिहून त्यांनी आपला परखडपणा सिद्ध केला. आंबोलीच्या सौंदर्यावर लुब्ध होऊन ‘आनंदगौरी’सारखी कविताही त्यांनी लिहिली.

जेव्हा आंबोली गर्द धुक्यात बुडालेली असते,
तेव्हा माझा आत्मा ढग होऊन तरंगत असतो

अशी रचना करणाऱ्या डॉक्टरांनी कृष्णा गोसावी नावाच्या एका सामान्य माणसावर ‘पटेल डोळे गेले पण माणसं दिसतात मला’ अशी काव्यरचना करून त्याचा सन्मान केला. एक संवेदनशील कवीच हे करू शकतो.

डॉक्टर वसंत सावंत यांच्या कवितांमध्ये लय होती गेयता होती. ज्या काळात सावंतवाडीसारख्या एका गावात वर्तमानपत्रे, नियतकालिके, पोहोचत नव्हती, अशा वेळेस त्यांची कविता प्रगल्भ असणे ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचा ‘वसा’ हा कवितासंग्रह ओवी स्वरूपात आहे. हा कवितासंग्रह प्रकाशित होण्यापूर्वी त्यांनी तो मधुभाई कर्णिक यांच्याकडे अभिप्रायार्थ दिला. त्याच सुमारास सावंत आजारी पडले. आणि मधुभाईंच्या सूचना तशाच राहिल्या. तो कवितासंग्रह प्रकाशित झाला.
मधुभाईंनी म्हटल्याप्रमाणे एखादा पैलू न पडलेला हिरासुद्धा भरपूर चकाकतो. २३ डिसेंबर १९९६ रोजी कवी डॉक्टर सावंत यांचे आजाराने निधन झाले.

कवी वसंत सावंत यांच्या नावे उत्कृष्ट काव्यसंग्रहासाठी कोकण मराठी साहित्य परिषद पुरस्कार देते. वसंत सावंत यांना महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसुत पुरस्कार १९७४ साली प्राप्त झाला. यशवंतराव चव्हाण पुरस्कार, नामदेव पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी वसंत सावंत यांना सन्मानित केले गेले. फोंड्यासारख्या घाटाच्या पायथ्याशी असलेल्या गावात जन्म घेतलेल्या कवीने फोंड्यासोबतच सावंतवाडीचा निसर्गदेखील आपल्या कवितांमधून भरभरून पोहोचवला.

वसंत सावंत जरी आज आपल्यात नसले, तरी निसर्ग तोच आहे. वसंत सावंत यांच्या कविता वाचल्यानंतर असं वाटतं, की कवी वसंत सावंत आजही आहेत.

फुलांनी मला घेरले माळरानी
मी असा गोप वेषात हिंडतो

– कल्पना धाकू मलये
(लेखिका, कवयित्री; मुख्याध्यापिका, जि. प. शाळा कणकवली क्र. ५ आणि ४)
पत्ता : शिवाजीनगर, मु. पो. ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग – ४१६६०२
मोबाइल : ९६७३४ ३८२३९
…….
(डॉ. वसंत सावंत यांच्या काही कविता सावंतवाडीच्या मोती तलावाच्या काठावर कोरून ठेवण्यात आल्या आहेत. त्या कवितांचे कोकण मीडियाच्या संग्रहात असलेले फोटो सोबत देत आहोत.)


…..

……
सिंधुसाहित्यसरिता या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. या उपक्रमाची संकल्पना ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांची आहे. अधिक माहितीसाठी, सूचनांसाठी, तसेच अभिप्रायासाठी त्यांच्याशी ९४२१२६३६६५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.)
……
(‘कोमसाप’च्या मालवण शाखेतर्फे राबविल्या गेलेल्या ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply