दिवा-रत्नागिरी, कोकणकन्या एक्स्प्रेस रद्द

नवी मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी जिल्ह्यात दिवाणखवटी स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे काल बंद पडलेल्या वाहतुकीमुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत त्यामध्ये आज, १५ जुलै रोजी धावणारी दिवा रत्नागिरी पॅसेंजर आणि रात्री सुटणारी मुंबई मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

कोकण रेल्वे मार्गावरची दिवाणखवटी येथील दरड दूर करण्याचे काम आता पूर्ण झाले आहे. वाहतूक लवकरच सुरू होणार आहे. ती शक्यता लक्षात घेऊन कोकण रेल्वेने गाड्यांचे वेळापत्रक ठरविले आहे. काही रद्द केल्या आहेत. काही गाड्या अन्य मार्गाने वळविल्या आहेत. या गाड्यांमध्ये आजपासून १८ जुलैपर्यंत सुटणाऱ्या वेगवेगळ्या गाड्यांचा समावेश आहे.

आज, १५ जुलै रोजी सायंकाळी सुटणारी 50103 क्रमांकाची दिवा रत्नागिरी पॅसेंजर आणि रात्री मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून मडगावकरिता सुटणारी कोकणकन्या एक्स्प्रेस ही 20111 क्रमांकाची गाडी पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.

याशिवाय 12620 क्रमांकाची मंगळुरू एलटीटी मत्स्यगंधा एक्स्प्रेस, 12201 क्रमांकाची एलटीटी-कोचुवेली एक्स्प्रेस, 12133 क्रमांकाची मुंबई मंगलोर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. उद्या, १६ जुलै रोजी सुटणारी 12134 क्रमांकाची मंगलुरू मुंबई एक्स्प्रेस, बुधवार, १७ जुलै रोजी सुटणारी 16346 क्रमांकाची तिरुवनंतपुरम एलटीटी मत्स्यगंधा एक्स्प्रेस, १८ जुलै रोजी सुटणारी 12202 क्रमांकाची कोचुवली-एलटीटी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय 12484 क्रमांकाची अमृतसर कोचुवली एक्सप्रेस गाडी काल सुटली असून ती आज पनवेलहून रत्नागिरी मार्गे न येता पनवेल येथून लोणावळा पुणे मिरज लोंढा मार्गे वळविण्यात आली आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply