रत्नागिरी : एमआयडीसीच्या क्षेत्रात ३ गुंठे जागा शासकीय पत्रकार भवनसाठी देण्यात येत आहे. त्यासाठी चालू वर्षी एक कोटी रुपये देण्यात येतील, अशी घोषणा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री श्री. सामंत यांनी सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. त्यांनी विभागनिहाय आढावा घेतला. ते म्हणाले, शासकीय पत्रकार भवनसाठी एमआयडीसीने ३ गुंठे जागा दिली आहे. ती जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे करून सार्वजनिक बांधकाम विभागाने आराखडा तयार करावा. त्यासाठी यावर्षी एक कोटी निधी दिला जाईल. अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात शहरातील विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी १० कोटींचे सुसज्ज ऑडिटोरियम उभे करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजन करावे. वन विभागाने अडीच कोटीमधून खैर वृक्षाची रोपे करावीत. सद्यःस्थितीत असणारी एक लाख रोपे शेतकऱ्यांना मोफत देण्यासाठी त्यांची नोंदणी करून घ्यावी. जिल्ह्यात खैर लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.
ते म्हणाले, दोन कोटीमधून आयटीआयचे नूतनीकरण करावे. गोमाता संरक्षणासाठी नवीन रुग्णवाहिका दिली जाईल. जयगड आणि रत्नदुर्ग किल्ला संवर्धनासाठी प्रत्येकी दोन कोटी निधी दिला जाईल. त्याबरोबरच प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या मतदारसंघातील नदीमधील गाळ काढण्यासाठी प्रत्येकी ५० लाखाचा निधी देण्याची सूचनाही जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी केली. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी स्मार्ट बनविण्यासाठी तसेच वाहने आदींसाठी ३ कोटीस मंजुरी दिली. पाली, संगमेश्वर, कळंबणीसह जिल्ह्यातील सर्वच ग्रामीण रुग्णालयांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांना मंजुरी दिली. प्रांताधिकाऱ्यांनी रत्नागिरी क्लब निर्मिती करावी. त्यामधील अद्ययावत जिमसाठी ५० लाख रुपये देण्याची सूचनाही त्यांनी केली.
बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, पालकमंत्र्यांचे खासगी सचिव योगेश महांगडे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे आदी उपस्थित होते.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

