रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिकांची सहकारी संस्थेतर्फे रत्नागिरीत जागतिक छायाचित्रण दिन १९ ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा झाला.
कॅमेरा पूजन आणि फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी विषयावरील उद्बोधक व्याख्याने असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अजय बाष्टे व पदाधिकारी, छायाचित्रकार यांनी कॅमेरापूजन केले. छायाचित्रकार ओम पाडाळकर आणि व्हिडिओग्राफर फहीम पटेल यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
फहीम पटेल यांनी वेडिंग फिल्म मेकिंग, कलर ग्रेडिंग, डॉक्युमेंटरी फिल्म आणि व्हिजन याविषयी भरपूर माहिती दिली. प्री वेडिंगसाठी ठिकाण निवडताना सुंदर जागा, साहित्य, प्रकाशमानता आणि संकल्पना याविषयी मार्गदर्शन केले. प्री-वेडिंग शूटसाठी वधू-वरांच्या पोशाखांची निवड करताना त्यांची रंगसंगती, संकल्पनेशी सुसंगती आणि एकंदर दिसण्याचा विचार करावा, असे पटेल यांनी सांगितले. या तांत्रिक माहितीचा उपयोग व्हिडीओग्राफर्सना होणार आहे, अशा प्रतिक्रिया सर्वांनी व्यक्त केल्या.
ओम पाडाळकर यांनी विवाहाच्या छायाचित्रणाविषयी इत्थंभूत माहिती देऊन एआय तंत्रज्ञानाचा वापर आणि छायाचित्रण कलेत अधिक सुधारणा कशी करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. भारतीय लग्नातील फोटोग्राफी अत्यंत महत्त्वाची आणि अविस्मरणीय गोष्ट आहे, असे सांगून त्यांनी कौटुंबिक फोटो, सजावट, वधू-वरांचे पोशाख, वेळेचे व्यवस्थापन, फ्रेमिंग याबाबत त्यांनी खूप माहिती दिली. पारंपरिक लग्न सोहळ्यात छायाचित्रे काढताना कोणती काळजी घ्यावी, फ्रेमिंगमध्ये योग्य कोन, लायटिंग यांचा वापर करून कलात्मक छायाचित्रण कसे करावे, छायाचित्रांची अल्बममध्ये मांडणी, व्हिडिओमध्ये गाण्यांची मांडणी, रंगांचा मेळ याबाबतही पाडाळकर यांनी मार्गदर्शन केले. सोशल मीडियाचा प्रभावी वापर, कॅमेरा उपकरणे आणि लेन्सेस, नियम आणि अटी कार्यक्रमापूर्वी ठरवून घ्याव्यात, चेहऱ्यावरची भावनिकता याला महत्त्व द्या, असे पाडाळकर यांनी सांगितले.



कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

