Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

काटकसरीने घर चालविणाऱ्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना – एकनाथ शिंदे

Advertisements

रत्नागिरी : ‘माझी लाडकी बहीण ही योजना सरकारने अतिशय शुद्ध मनाने राबवली आहे. सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला काटकसरीने घर चालवतात. त्यांना हातभार लावण्यासाठी ही योजना आणली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी रत्नागिरीतील चंपक मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, महिला सक्षम झाल्या, तरच देश सक्षम होईल. त्यांना दिलेले पैसे अर्थव्यवस्थेत येतील आणि त्या माध्यमातून त्यांच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आता राज्याची आर्थिक ताकद वाढत चालली असून, भविष्यात लाडकी बहीण योजनेची दीड हजारांची रक्कम तीन हजार किंवा त्यापेक्षाही जास्त होऊ शकते. या योजनेसह सरकारच्या महिलांसाठी अनेक योजना आहेत. त्यातून महिलांना लखपती झालेले पाहायचे आहे, अशी इच्छा मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. सगळीकडे नजर पोहोचत नाही तिथपर्यंत महिला दिसत आहेत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर झाला नाही एवढा आनंद या योजनेचे हे चित्र पाहिल्यावर होत आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

या योजनेच्या वर्षभराच्या अंमलबजावणीसाठी ३३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, ही योजना कायमस्वरूपी आहे. विरोधकांनी कितीही अकांडतांडव केले, तरी योजना बंद होणार नाही. आमचे सरकार देणारे आहे, घेणारे नाही. आम्ही जे शब्द देतो, ते पाळतो. जे होणार नाही ते बोलत नाही. जे करू शकणार आहोत, तेच बोलतो, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली. एका बाजूला या योजनेवर टीका करून, दुसरीकडे विरोधकांकडून योजनेचे श्रेय घेण्याचे प्रकार होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

बदलापूरमध्ये चिमुरड्या मुलीच्या बाबतीत घडलेली घटना दुर्भाग्यपूर्ण असून, सर्व दोषींना शिक्षा होण्यासाठी सर्व काही करण्याचे आदेश तातडीने देण्यात आले आहेत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. मुलीबाळींच्या अब्रूशी खेळणाऱ्यांचे हात कलम केले जाण्याचा इतिहास महाराष्ट्राला आहे. त्यामुळे या घटनेतील दोषीलाही फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली; मात्र या घटनेवरून विरोधक करत असलेले आंदोलन, तेथे दाखवले जात असलेले माझी लाडकी बहीण योजनेचे बोर्ड हे सगळे विकृत मानसिकतेचे राजकारण आहे. घाणेरडे राजकारण करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांनी लोकसभा निवडणुकीवेळी गैरसमज पसरवले; मात्र जनता सुज्ञ असून, कोण सच्चा आणि कोण सावत्र भाऊ आहे, हे बहिणींना माहिती आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची भूमिका महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यात अनेक योजना असल्या, तरी माझी लाडकी बहीण ही योजना अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचली आणि त्यांना भावली. अशासकीय कर्मचाऱ्यांनाही लाभ देणारी ही एकमेव योजना आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यामुळे ती सर्वांपर्यंत पोहोचली. योजनेचा लाभ थेट महिलांनाच मिळावा, म्हणून संयुक्त खाते चालणार नाही, अशी अट ठेवण्यात आली होती. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री या मानलेल्या तीन भावांनी बहिणींना रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशीपासून ओवाळणी द्यायला सुरुवात केली, असे प्रतिपादन महिला-बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यावेळी केले.

ही योजना बंद करण्यासाठी विरोधक कोर्टात गेले, गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला; पण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या महिलांनी खरे काय ते दाखवून दिले आहे. योजनेचा लाभ देण्यात बँकांमुळे अडथळा आला, तर त्यांची गय केली जाणार नाही. अशा प्रकारची ही देशातील पहिली योजना असून, महिला भगिनींनी आपले आरोग्य चांगले राखण्यासाठीही या पैशांचा उपयोग करावा, असे पालकमंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले.

यावेळी आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माझी लाडकी बहीण योजनेसह अन्य विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे वितरण करण्यात आले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version