पतंजली योग समिती परिवारातर्फे ११वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी : योगऋषी स्वामी रामदेवजी महाराजांच्या आशीर्वादाने संचलित पतंजली योग समिती व परिवाराच्या वतीने आयोजित अकराव्या जागतिक योगदिन कार्यक्रमाला रत्नागिरीकरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. माळनाका येथील देसाई बॅंक्वेट हॉलमध्ये कार्यक्रम साजरा झाला. दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन रत्नागिरीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील गोसावी यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र पाटील, पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी अ‍ॅड. विद्यानंद जोग, किसान सेवा समितीचे जिल्हा प्रभारी भारत सावंत व आयुर्वेदाचार्य विवेक इनामदार उपस्थित होते. (व्हिडिओ बातमीच्या शेवटी)

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील गोसावी यांनी सांगितले, की योग ही अनुभूतीची गोष्ट आहे व ती एक जीवनशैली आहे. ती आपण अनुसरावी. यातून आपल्याला जीवन जगणे सुसह्य होईल.

राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले, की योग ही देणगी भारताने विश्वाला दिली आहे. भारताने युनोकडे २१ जून जागतिक योग दिनाचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार योग दिन जगभरात साजरा होत आहे. योग ही प्राचीन जीवनशैली आहे. नैराश्य व थकव्यावर मात करता येते. मन, मेंदू, मनगट बळकट करण्यासाठी योग सर्वोत्तम असल्याचे जगाने मान्य केले आहे.

रा. भा. शिर्के प्रशाला, नानल गुरुकुल व जीजीपीएस शाळांमधील विद्यार्थ्यांनी या वेळी योगासने, सूर्यनमस्कारांची प्रात्यक्षिके सादर केली. या विद्यार्थ्यांनी कठीण आसने व शारीरिक लवचिकता दाखवून सर्वांना थक्क केले. आयुर्वेदाचार्य विवेक इनामदार यांचे योग आयुर्वेद व जीवनशैली यावर भाषण केले. किसान सेवा समितीचे भारत सावंत व सौ. अंजली मलुष्टे यांनी योग प्रचार गीत सादर केले. त्यानंतर जागतिक योग दिनाच्या प्रोटोकॉलमधील आसने व मार्गदर्शन अ‍ॅड. जोग यांनी केले. रसिका नारकर, आरोही पंडित व युक्ता पंडित यांनीही मंचावर व उपस्थितांनीही आसने सादर केली.

स्वामीजींचे परमशिष्य, केंद्रीय मुख्य डॉ. परमार्थ देव यांच्या रत्नागिरी दौऱ्यात मेहनत घेतल्याबद्दल अ‍ॅड. जोग, नंदकिशोर जोशी यांचा सत्कार श्री. गोसावी यांच्या हस्ते करण्यात आला. सहयोगी योग शिक्षक पूर्वा पावसकर, प्रीती काळे, उमा घवाळी यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. योगशिक्षक श्रीकांत ढालकर यांना ए. डी. फाउंडेशनचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्ररत्न पुरस्कार जाहीर झाला. त्याचा सोहळा आज पुण्यात होणार होता. परंतु हा पुरस्कार संस्थेने पाठवून दिला. श्री. गोसावी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. सौ. नीता साने यांनी सूत्रसंचालन केले. अधिवक्ता परिषदेच्या कोकण प्रांताच्या अ‍ॅड. प्रिया लोवलेकर यांनी आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply