सायकली चालती पंढरीची वाट!; रत्नागिरीहून प्रथमच निघाली सायकलवारी

रत्नागिरी : ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ अशा अभंगांचा गजर करत देहूतून संत श्री तुकाराम महाराज आणि आळंदीतून संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांच्या वारीने आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला प्रस्थान केले आहे. दर वर्षी लाखो वारकरी या पायी वारीत सहभागी होतात. यंदा रत्नागिरीतून प्रथमच पंढरपूरला सायकलवारी निघाली आहे. आज (२० जून) सकाळी रत्नागिरी शहरातील श्री विठ्ठल मंदिरातून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे नऊ सायकलिस्ट पंढरपूर वारीसाठी रवाना झाले. काकड आरती झाल्यानंतर या सायकलिस्ट्सना मंदिराकडून श्रीफळ आणि प्रसादपुष्प देऊन सायकलवारी यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद देण्यात आले.

या वेळी विठ्ठल मंदिर देवस्थानचे पदाधिकारी विजय पेडणेकर, प्रमोद रेडीज यांच्यासह रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य उपस्थित होते. मंदिरातून सायकलवारीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. रत्नागिरी ते पंढरपूर हा ३०० किलोमीटरचा प्रवास हे सायकल वारकरी दोन दिवसांत पूर्ण करणार आहेत. २२ जूनला भागवत एकादशीच्या दिवशी राज्यभरातील वारकरी सायकल रिंगण सोहळा आणि संमेलन करणार आहेत. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे महेश सावंत, विशाल भोसले, गजानन भाताडे, नारायण पाटोळे, अमित पोटफोडे, राकेश होरंबे, विकास कांबळे, अक्षय पोटफोडे, आरती दामले हे सदस्य वारीमध्ये सहभागी झाले आहेत. वारी मार्ग : हातखंबा, पाली, साखरपा, मलकापूर, कोकरूड, शेडगेवाडी, कराडमार्गे उंब्रज येथे पहिला मुक्काम होईल. २१ जूनला उंब्रज येथून पुढच्या प्रवासाला सुरुवात होईल. त्यानंतर मसूर, पुसेसावळी, मायणी, दिघंजी, महूद, पंढरपूर मुक्काम.

सायकलवारीची संकल्पना नाशिक सायकल क्लबने सुरू केली. त्यांचे ४०० सदस्य सायकल चालवत नाशिकहून पंढरपूरला जायचे. त्यातूनच पुढे या सायकलवारीचा जन्म झाला. सायकलवारीचे यंदाचे चौथे वर्ष आहे. पहिल्या वर्षी सायकलवारीचे आयोजन पंढरपूर सायकल क्लबने केले होते. दुसऱ्या वर्षी नाशिक, तिसऱ्या वर्षी बारामती आणि यंदा लातूर सायकल क्लबने आयोजन केले आहे. यंदा प्रथमच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य त्यात सहभागी झाले आहेत.

प्रत्येक वर्षी पंढरपूर सायकल क्लब सर्व सायकलिस्टना सहकार्य करत आहे. २१ जूनला सर्व सायकलस्वार पंढरपूरला पोहोचतील व २२ जूनला सकाळी सहा वाजता नगर प्रदक्षिणा, सायकल रिंगण होईल. त्यानंतर प्रत्येक सायकल क्लबतर्फे चर्चा कार्यक्रम होईल. विशेष कार्य करणाऱ्या क्लबचा सत्कार करण्यात येऊन सायकल क्लबला सन्मानपत्र दिले जाईल. महाप्रसादानंतर सांगता होईल.

या वारीबाबत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सायकलिस्ट विशाल भोसले यांनी सांगितले की, मी गेल्या वर्षीसुद्धा सायकलवारीत सहभागी झालो होतो. ४८ सायकल ग्रुपमधून १५०० सायकलिस्ट पंढरपूरला गेले होते. यंदा साधारण ९० हून अधिक ग्रुप आणि २५०० सायकलिस्ट होण्याचा अंदाज आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply