हायपोग्लायसेमियाकडे दुर्लक्ष नको; जाणून घ्या लक्षणे, कारणे, उपचार

जागतिक मधुमेहदिनाचे औचित्य साधून ठाण्यातील ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. आशिष सरवटे यांची विशेष साप्ताहिक लेखमाला कोकण मीडियाने सुरू केली आहे. त्या लेखमालेचा हा पाचवा भाग…

आपल्या रक्तातील साखरेची पातळी कमी व्हावी, अशी प्रत्येक मधुमेही रुग्णाची इच्छा असते; मात्र ती अचानक कमी होणे किंवा आवश्यकतेपेक्षा खूप कमी होणे त्रासदायक ठरते. अशा प्रकारे साखर कमी होण्याला हायपोग्लायसेमिया म्हणतात. हा शब्द मधुमेही रुग्णांना फारसा नवा नाही; मात्र त्याची कारणे, लक्षणे आणि उपचार यांबद्दल सर्वांना सविस्तर माहिती असतेच असे नाही. ती माहिती आपण जाणून घेऊ या.

मधुमेही रुग्णांची रक्तातील साखर जेव्हा ७० mg/dlपेक्षा कमी होते, तेव्हा त्याला हायपोग्लायसेमिया म्हणतात. हायपोग्लायसेमिया आणि हाय शुगर म्हणजे साखर खूप कमी होणे किंवा खूप वाढणे या गोष्टी मधुमेहींसाठी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काळजी घेतली नाही तर शुगर वाढू शकते, तसेच ती घटूही शकते.
हायपोग्लासेमियाची लक्षणे
आपले शरीर नेहमी वाईट व चांगल्या गोष्टीचे बदलांचे संकेत देत असते. लो शुगर अर्थात साखर कमी होऊ लागली, की आपले शरीर विविध संकेत देऊ लागते. ते कोणते ते पाहू या. (उर्वरित लेख जाहिरातीच्या खाली)

सामान्य लक्षणे (Early symptoms)

  • शरीर थरथर कापणे (कंप जाणवणे)
  • घाम येणे
  • खूप भूक लागणे.
  • अशक्तपणा जाणवणे
  • चक्कर येणे
  • डोके दुखणे
  • हृदयाचे ठोके वाढणे.
  • हात कापणे

गंभीर लक्षणे

  • गोंधळून जाणे
  • अस्पष्ट बोलणे
  • चिडचिडेपणा
  • बेशुद्ध होण्याची सुरुवात, डोळे उघडे ठेवणे कठीण होणे
  • आकडी येणे

घातक लक्षणे/परिणाम

  • हृदयक्रिया बंद पडणे
  • मेंदूला कायमचे नुकसान
  • मृत्यू

या घातक परिणामांमुळे हाय शुगरपेक्षा लो शुगर जास्त घातक वाटते. कारण कधीतरी वैद्यकीय मदत मिळेपर्यंत पेशंट कोमात जाऊ शकतो किंवा मृत होऊ शकतो. दीर्घ काळ मधुमेह असणे किंवा तो दीर्घ काळ नियंत्रणात नसेल, तर काही मधुमेही रुग्णांना हायपोग्लासेमियाची लक्षणे दिसत नाहीत. त्याला हायपोग्लायसेमिक अनअवेअरनेस असे म्हणतात.

हायपोग्लासेमियाची कारणे

  • विसरल्यामुळे औषधांचा डबल डोस घेणे.
  • दुसऱ्या रुग्णाच्या गोळ्या घेणे.
  • चुकीच्या सुईने इन्सुलिन घेणे.
  • उपवास करणे.
  • खूप वेळ न खाणे.
  • भरपूर शारीरिक श्रम होणे.
  • लिव्हर किंवा किडनीचे आजार
  • आजारी असणे.
  • उलटी व जुलाब होणे.

हायपोग्लासेमियावरील उपचार
हाय आणि लो शुगर याची बरीचशी लक्षणे सारखी असू शकतात. त्यामुळे आपण गोंधळून जाऊ शकतो. जमले तर पहिल्यांदा मधुमेही रुग्णाने स्वतः किंवा सोबतच्या इतर व्यक्तींनी रक्तातील साखर ग्लुकोमीटरवर तपासावी. त्यामुळे निदान होऊ शकते. हे जमले नाही, तर ‘मला मधुमेह आहे व साखर कमी होणे शक्य आहे,’ असा विचार करून पटकन साखर/गूळ/मध/पिठीसाखर जे सहजपणे उपलब्ध असते, ते खाऊन बघावे. त्यामुळे जर होणारा त्रास थांबला आणि बरे वाटू लागले, तर आपली रक्तातील साखर कमी झाली आहे, असे समजावे. त्यानंतर त्वरित चांगला नाश्ता करावा. म्हणजे साखर परत खाली जाणार नाही व लो शुगरचा धोका कमी होतो. त्यानंतर ग्लुकोमीटर किंवा लॅबमध्ये पुन्हा साखर तपासावी व आपली साखर १००-२५०च्या मध्ये आहे ना, याची खात्री करावी. आपले शरीर स्थिरावले, की आपण विचार करावा आपल्याला असे का झाले. त्यानंतर वर सांगितलेल्या लक्षणांमध्ये आपल्याला कारण सापडेल. हे सगळे होत असताना जमले तर आपल्या डॉक्टरांना भेटावे किंवा फोन करून त्यांचा सल्ला घ्यावा.

– डॉ. आशिष सरवटे, ठाणे येथील डायबेटॉलॉजिस्ट

(दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी डॉ. सरवटे रत्नागिरीत निष्कर्ष डायग्नॉस्टिक्समध्ये येतात. एरव्ही ठाण्यात त्यांचे क्लिनिक आहे.)


Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply