डायबेटीसमध्ये सर्वांत दुर्लक्ष होते पायांकडे!

जागतिक मधुमेहदिनाचे औचित्य साधून ठाण्यातील ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. आशिष सरवटे यांची विशेष साप्ताहिक लेखमाला कोकण मीडियाने सुरू केली आहे. त्या लेखमालेचा हा सहावा आणि शेवटचा भाग…

मधुमेहाच्या ट्रीटमेंटमध्ये सर्वांत दुर्लक्षित भाग म्हणजे पायाची काळजी. मधुमेह अर्थात डायबेटीसमुळे शरीरातील नसा (नर्व्ह्ज) साखरेमुळे बधिर होतात व निकामी होतात, तेव्हा त्याला न्यूरोपॅथी असे म्हटले जाते. त्यामध्ये डोक्यापासून पायापर्यंत सर्व नसांचा समावेश असतो. २० टक्के मधुमेही रुग्णांमध्ये पायाची न्यूरोपॅथी त्यांना मधुमेहाचे निदान होते तेव्हापासून असते.
दर ३० सेकंदांना जगात एक तरी मधुमेही रुग्ण आपला पाय गमावत असतो. त्यातील ८० टक्के रुग्णांचे पाय नीट काळजी घेतली तर आपण वाचवू शकतो. पायाच्या न्यूरोपॅथीमध्ये पायांची आग/सुन्नपणा/पाय दुखणे/पायांना मुंग्या येणे/पायातून चप्पल निसटणे यांसारखी लक्षणे असतात. काही मशीन आणि यंत्रांच्या साह्याने आपण पायाच्या न्यूरोपॅथीची तीव्रता कळते. यामुळे मधुमेही रुग्णांवर उपचार करणे सोपे जाते.

महत्त्वाच्या बाबी

  • रक्तातील साखरेचे नियंत्रण ठेवणे.
    ध्रूम्रपान व मद्यपान टाळणे.
    नियमित व्यायाम करणे.
    HbA1C सातच्या खाली ठेवणे.
    रक्तदाब (बीपी) नियंत्रणात ठेवणे.

मधुमेहींनी पायांची काळजी कशी घ्यावी?

  • पाय गरम पाण्यात ठेवू नयेत. दीर्घकाळ मधुमेह असलेल्या रुग्णांच्या पायांच्या नसा बधिर झालेल्या असतील, तर संवेदना कमी झालेली असते. त्यामुळे पाण्याचे तापमान पायाला जाणवते त्यापेक्षा जास्त असू शकते आणि त्यातून पायाला जखम होऊ शकते. म्हणून पाय गरम पाण्यात न ठेवणे इष्ट.
    गरम पाण्याचा शेक घेऊ नये.
    अनवाणी चालू नये.
    तळपाय मऊ राहतील असे पाहणे. त्यासाठी तेल व लोशन लावावे.
    पायाला छोटीशी जखम झाली तरी आपल्या डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
    रोज रात्री पाय तपासा. म्हणजे जखम झालेली असल्यास लवकर लक्षात येईल.
    पायांना जखमा होऊ नयेत यासाठी बंद बूट किंवा सँडल्स घाला.

– डॉ. आशिष सरवटे, ठाणे येथील डायबेटॉलॉजिस्ट

(दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी डॉ. सरवटे रत्नागिरीत निष्कर्ष डायग्नॉस्टिक्समध्ये येतात. एरव्ही ठाण्यात त्यांचे क्लिनिक आहे.)

(लेखमाला समाप्त)


Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply