Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या वडिलांचे देहदान

Advertisements

रत्नागिरी : रत्नागिरीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांचे वडील अच्युत शिवराम आठल्ये (वय ८९ वर्षे) यांचे २७ जानेवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर देहदान करण्यात आले. रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आज (२८ जानेवारी) त्यांचा देह दान करण्यात आला. तत्पूर्वी, काल त्यांचे नेत्रदान करण्यात आले. या महाविद्यालयातील हे १७वे देहदान आहे.
अच्युत आठल्ये यांचा जन्म १३ जुलै १९३७ रोजी झाला. सध्या रत्नागिरीतील उद्यमनगरमधील गुरुराज हाउसिंग सोसायटीमध्ये वास्तव्याला असलेल्या आठल्ये यांचे मूळ गाव लांजा तालुक्यातील शिपोशी. त्यांनी ४० वर्षे ‘एलआयसी’मध्ये प्रामाणिक सेवा बजावली. वाचनाची त्यांना खूप आवड होती. सामाजिक बांधिलकीतून त्यांनी विविध वाचनालयांना अनेक पुस्तके भेट दिली होती. समाजकार्याची आवड, साधे जीवन व विचारशील व्यक्तिमत्त्व ही त्यांची ओळख होती. त्यांचे पुत्र डॉ. अनिरुद्ध हे रत्नागिरीचे जिल्हा आरोग्य अधिकारी असून, त्यांच्या स्नुषा डॉ. रश्मी या रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अच्युत आठल्ये यांच्या देहदानामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोलाची मदत होणार असून, त्यांचा हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी व अनुकरणीय आहे. देहदान आणि नेत्रदानाबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता वेळोवेळी व्यक्त केली जाते; मात्र आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या वडिलांचे देहदान आणि नेत्रदान करून प्रत्यक्ष कृतीतून ही जागरूकता निर्माण करण्याचे कार्य केल्याची भावना व्यक्त होत आहे.

अच्युत आठल्ये यांच्या देहदानावेळी त्यांचे पुत्र डॉ. अनिरुद्ध यांच्यासह कन्या, जावई, अन्य नातेवाईक, तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कुमरे आणि जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. देहदानाची प्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव, तसेच शरीररचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, राज पेडणेकर व श्रेयस जोशी यांनी देहदान प्रक्रियेत सहकार्य केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version