संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राचा रविवारी पाचवा वर्धापन दिन

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या रामटेक (नागपूर) येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्राचा पाचवा वर्धापन दिन आणि नूतनीकृत योगभवनाचे उद्घाटन रविवारी, दि. २ ऑगस्ट रोजी होणार आहे.

संस्थेच्या रत्नागिरीतील अरिहंत मॉल (तिसरा मजला) येथील उपकेंद्रात रविवारी सकाळी १० वाजता हा समारंभ होणार आहे. सर्वांसाठी निःशुल्क नियमित योग वर्गासाठी नूतनीकृत योगभवनाचे उद्घाटन करण्यात येणार असून, यामुळे रत्नागिरीकरांना नियमित योगाभ्यासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अतुल वैद्य भूषविणार असून उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत प्रमुख अतिथी म्हणून समारंभाला उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनाचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी उपस्थित राहणार आहेत. विश्वविद्यालयाचे कुलसचिव डॉ. रोशन अलोने, विश्वविद्यालयाच्या साहित्य विभागाच्या अधिष्ठाता प्रा. कविता होले, वेद व व्याकरण विभागाचे अधिष्ठाता प्रा. हरेकृष्ण अगस्ती, तसेच परीक्षा नियंत्रक डॉ. जयवंत चौधरी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

गेल्या पाच वर्षांत रत्नागिरी उपकेंद्राने संस्कृत शिक्षण, भारतीय ज्ञानपरंपरेचे संवर्धन, योग शिक्षण व प्रसार, प्रकाशन, संशोधन, प्रशिक्षण तसेच विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांद्वारे उल्लेखनीय कार्य केले आहे. या यशस्वी वाटचालीत संस्कृतप्रेमी, योगशिक्षक, योगसाधक, विविध संस्था, पदाधिकारी व नागरिकांचे लाभलेले सहकार्य लक्षात घेऊन त्यांच्या योगदानाचा गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

कार्यक्रमात उपकेंद्राच्या पाच वर्षांच्या कार्याचा आढावा सादर करण्यात येणार असून, ‘कोकणातील विद्वानांचे संस्कृत साहित्यातील योगदान’, ‘Interdisciplinary Research in Dharmaśāstra’ आणि ‘सनातन धर्म या ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे. तसेच रत्नागिरी उपकेंद्र आणि श्रीमान भागोजी शेठ कीर विधी महाविद्यालयात सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

यावेळी उपकेंद्राला सातत्याने सहकार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्ती डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. आशीष बर्वे, डॉ. दिनेश रसाळ, डॉ. माधवी जोशी, डॉ. शशांक पाटील, डॉ. विवेक भिडे, ॲड. रुची महाजनी, प्रमोद कोनकर, श्रीकांत रांगणेकर, अनंत आगाशे, प्रभात भालेकर आणि संजय घोसाळे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. शासकीय अध्यापक महाविद्यालय, संस्कृत भारती (दक्षिण रत्नागिरी), गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, प्राइड इन्स्टिट्यूट, जयसिंगपूर, श्री आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य वेदपाठशाळा, नाणीजधाम, रिगल कॉलेज-गुहागर, रविकीर्ती संस्कृत अध्ययन केंद्र-सांगली, स्वामी ब्रह्मानंद संस्कृत प्रबोधिनी तपोभूमी कुंडई (गोवा), कै. गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळा, वेदपाठशाळा रत्नागिरी, गणपतीपुळे देवस्थान, पावस संस्थान, स्वाध्याय परिवार, संस्कृत शिक्षक संघ, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, अमित अकादमी, रामानुजन क्लासेस आणि सुसंस्कृतम् – संस्कृत भाषा अध्ययन व अध्यापन केंद्र, कोल्हापूर या संस्थांचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

रत्नागिरीतील सर्व संस्कृतप्रेमी, योगशिक्षक, योगसाधक, योगप्रेमी, विविध संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी तसेच नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमांचा लाभ घ्यावा, तसेच उपकेंद्राच्या यशस्वी पंचवार्षिक वाटचालीचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply